तब्बल ४८ वर्षांपासून पठाण कुटुंबीयांनी जपली आहे वारीची परंपरा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 5 Months ago
संतराज दिंडीसोबत पठाण कुटुंबीय
संतराज दिंडीसोबत पठाण कुटुंबीय

 

दौंडच्या संगमयेथील संतराज महाराज संस्थानावर कुरुळी येथील पठाण कुटुंबाची अपार श्रद्धा आहे. १९७६ पासून आजपर्यंत हे कुटुंब पंढरीच्या पायी वारीची परंपरा जोपासत आहे. संतराज महाराज संस्थानाला प्रवासासाठी या कुटुंबाच्या वतीने चारचाकी गाडी दिली जाते. विशेष म्हणजे सर्व हिंदू व मुस्लिम सण, उत्सव, यात्रा या कुटुंबात साजरा केले जातात. सर्वधर्म समभावाची शिकवण जोपासण्याचे काम पठाण कुटुंबीय करीत आहेत.

पठाण कुटुंबातील स्वर्गीय मुबारक व दाऊद भाई पठाण यांनी सलग १६ वर्षे आषाढी वारीसाठी चोपदार म्हणून काम केले. वारीमध्ये पायी चालत हातामध्ये राजदंड घेत वारकऱ्यांना शिस्त लावण्यासाठी ते प्रयत्नशील होते. मुबारक भाई पठाण यांनी १९९३ला संगम येथील महादेव मंदिर व पांडुरंग मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एक लाख रुपये देणगी दिली होती. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा प्रमोद व त्यांची व पत्नी शबाना पंढरीच्या वारीची परंपरा जोपासत आहे. 
 
प्रमोदच्या वडिलांनी आपल्या मुलाने मुस्लिम धर्माप्रमाणेच हिंदूंचे सर्व सण, उत्सव साजरा करावेत म्हणून आपल्या मुलाचे नाव प्रमोद ठेवले. प्रमोद पठाण हे संतराज महाराज संस्थानचे संचालक असून, संस्थानच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये ते सहभागी असतात. तर, आषाढी वारीसाठी वेळापूर येथे अन्नदानासाठी कुरुळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पंक्तीमध्ये त्यांच्या कुटुंबियांचा सहभाग असतो. 
 
संगम येथील अखंड हरिनाम सप्ताहाची पंगत व महाशिवरात्रीचा फराळ यामध्येही पठान कुटुंबियाचे योगदान असते. आळंदी येथील शांतिनाथ महाराजांच्या मठामध्ये प्रतिवर्षी पठाण कुटुंबीयांच्या वतीने अन्नदान केले जाते. 

कुटुंबातील या परंपरेविषयी मुबारकभाईंचे चिरंजीव प्रमोद पठाण म्हणतात, "वडलांनी मुस्लिम सण- उत्सव साजरे करत हिंदू परंपराही जोपासल्या होत्या. पंढरीचा पांडुरंग हे त्यांचे अढळ श्रद्धास्थान होते. त्यांची परंपरा पुढे जोपासण्याचा मी प्रयत्न करत आहे. जोपर्यंत शरीर साथ देत आहे, तोपर्यंत पंढरीच्या पांडुरंगाची वारी करत राहणार आहे."

 


वारी विशेष : 'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेले हे लेखही जरूर वाचा - 

वारी नृत्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे राजूबाबा शेख

वारीदरम्यान पुण्यात घडले हिंदू मुस्लीम सौहार्दाचे दर्शन

एकोप्याचे बीज रुजवणारे संभुआप्पा-बुवाफन

एकनाथांच्या पैठणमधून वाहणारी सलोख्याची गंगा


 

महाराष्ट्रातील पहिले मुस्लिम चोपदार ‘मुबारक भाई पठाण’
पालखी सोहळ्यामध्ये चोपदाराला विशेष महत्त्व असते. चोपदाराने केलेल्या राजदंडाच्या इशाऱ्यावर संपूर्ण पालखी सोहळा हा मार्गस्थ व नियंत्रित होतो. वारकऱ्यांना शिस्त लावण्याचे कामही चोपदारच करतो. या पार्श्वभूमीवर संतराज महाराज संस्थानने १९८०ला पठाण कुटुंबीयातील स्वर्गीय मुबारक भाई पठाण यांना चोपदार म्हणून जबाबदारी दिली होती. सलग २१ वर्षे ही जबाबदारी मुबारकभाईंनी प्रामाणिकपणे सांभाळली. 
 
पायजमा कुर्ता व डोक्यावरती लाल टोपी असणारे मुबारकभाई वर्षभर संगम येथे धार्मिक कार्यक्रमात असायचे. मुस्लिम समाजातील पहिले पालखी चोपदार म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. आपल्या राजदंडाच्या इशाऱ्यावर त्यांनी कित्येकदा पालखी सोहळा सुखकर केल्याच्या आठवणी अनेक वारकरी सांगतात.
 
~ प्रकाश शेलार
 
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -