माझे संपूर्ण बालपण सावे (जिल्हा : जळगाव, तालुका : एरंडोल) या छोट्याशा गावात गेले. बालपणी रमजान ईद जवळ आली की आमची उत्सुकता प्रचंड वाढायची. नवीन कपडे, चपला, अत्तर, सुरमा, दागिन्यांची खरेदी सुरू व्हायची. दोन्ही हातांवर आम्ही मुली आवर्जून मेंदी काढायचो. अतिशय कोमल आणि उल्हसित भावना रमजानविषयी असायच्या. घरी पाहुण्यांची लगबग सुरू व्हायची. तंतोतंत शब्दबद्ध करताच येणार नाहीत इतक्या सुंदर भावना असायच्या त्या. रमजानचा महिना सुरू झाला की घरातल्या साफसफाईच्या कामांना वेग यायचा. बाकी दिवस खेळत-खिदळत हिंडणारे आम्ही घरात आईला मदत करायला सज्ज व्हायचो आणि ही सगळी कामं संपली की रमजान ईदची चाहूल लागायची.
आपले बालपण आणि बालपणात आपण साजरे केलेले सण-उत्सव हे कधीच न विसरता येण्याजोगे असतात. ते मनाच्या एका कप्प्यात घर करून असतात नेहमीच. बालपणीच्या ईदच्या माझ्या भावनाही अशाच कधीही न विसरता येण्याजोग्या आहेत. माझ्या बालपणीची एक ईद मला आठवते. चंद्र बघण्यासाठी घरातील सगळी लहान मुले घराच्या छतावर जाऊन थांबायची. चांदण्यांमध्ये चंद्र शोधताना लहान मुले किलबिलाट करायची. त्या किलबिलाट करणाऱ्या पक्ष्यांमध्ये मीही एक असायची. आकाशात चंद्र शोधण्यात एक वेगळीच मजा वाटायची तेव्हा. आणि, चंद्र दिसला रे दिसला की घरच्यांना सांगायला आम्ही धाव घ्यायचो.
रमजानच्या महिन्यात अशी व्हायची दिवसाची सुरुवात
अम्मी, खाला, दादी अशा सगळ्या महिला सहरी बनवण्यासाठी पहाटे तीन-चार वाजण्याच्या आसपास उठायच्या. सेहरी म्हणजे पहाटे उपवास ठेवण्यापूर्वी केलेलं जेवण. आम्हा लहान मुलांना रोजा नसायचा; पण तरी सहरी करायला मिळायची. लहान असल्याचा फायदा! त्या काळी सहरीसाठी उठवायला गावात फकीर यायचा. आता हे फकीर दिसत नाहीत. मी चळवळीत सक्रिय व्हायच्या आधी, म्हणजे जवळपास १९८० पर्यंत, फकीर गावात येत असे. त्या फकिराला आम्ही अरमानदादा म्हणायचो. अरमानदादाच्या एका गाण्याने आमच्या दिवसाची सुरुवात व्हायची. साहिर लुधियानवी यांचे ते गीत माझ्या स्मरणात सदैव राहिले. चिरंतन आशादायी असे ते गीत आहे. त्या गीताचे बोल आहेत :
रातभर का है महमाँ अँधेरा
किस के रोके रुका है सवेरा
(ही रात्र दुःखाची असेल...वेदनेची असेल...तरीही ही रात्र संपणार आहे. कारण, हा अंधार फक्त एका रात्रीचाच पाहुणा आहे. सकाळी तो निघून जाईल. रात्रीचे दिवसात रूपांतर होण्यापासून कोणीही थांबवू शकलेले नाही, त्यामुळे दिवस उजाडणारच आहे). बालपणी मनात ठसलेल्या या ओळी आयुष्यभरासाठी मार्गदर्शक ठरल्या.
त्या ईदमध्ये साधेपणा होता; दिखाऊपणा नव्हता
मी मुस्लिम शेतकरी कुटुंबात वाढले. त्यामुळे दरवर्षी ईदमध्ये नवीन कपडे मिळायचेच असे नाही. पीक आले नाही तर किंवा काही अडचण आली तर नवीन कपडे घेणे आम्ही टाळायचो. मात्र, सणाचा आनंद खूप असायचा. साधेपणात सण साजरा व्हायचा. कोणी किती महागाच्या वस्तू ईदमध्ये विकत घेतल्या याची स्पर्धा त्या काळी नसायची.
सलोख्याने साजरी व्हायची ईद
आमचे गाव फार छोटे होते. त्यामुळे प्रत्येकाची नावानिशी, घराच्या पत्त्यानिशी ओळख असायची. सणांमध्ये वस्तूंची देवाणघेवाण व्हायची. या नात्यामध्ये एक वेगळीच आपुलकी असायची; त्यामुळे सणाचे एक वेगळेच आकर्षण होते. त्या काळी ईदमध्ये पूर्ण गाव सहभागी व्हायचे. लहानग्यांच्या मित्र-मैत्रिणी, चाचा, अब्बू यांचे मित्र, शेजारी असे सगळेच लोक घरी शीरखुर्मा प्यायला यायचे. त्यामुळे घरातल्या बायका भलेमोठे पातेले भरून शीरखुर्मा तयार करत असत. या शीरखुर्म्याच्या गोडव्यामुळे नात्यांनाही गोडवा लाभायचा! आता दोन समाजांमध्ये काहीसे अंतर निर्माण झाले आहे. मधल्या काळात स्थलांतराचेही प्रमाण खूप वाढले. शहरात आल्यावर माणसे माणसांपासून दुरावत जायला लागली. जाती-धर्माचे बाण अधिक टोकदार होत गेले. त्या काळी माझ्या हिंदू मैत्रिणींचाही ईदमध्ये मोठा सहभाग असायचा. रझियाच्या स्वयंपाकघरात आज काय बनतंय इथपर्यंत त्यांना माहिती असायची. आता हिंदू-मुस्लिम मुलींमध्ये मैत्री असलेली नाती फार कमी दिसतात. आता ही एकोप्याची भावना काहीशी कमी होताना दिसत आहे.
सालगड्यांना घरी जेवणाची मेजवानी
आमच्या शेतामध्ये जे सालगडी (वर्षभराच्या बोलीवर शेतात काम करणारे मजूर) होते त्यांना ईदच्या दिवशी घरी जेवणाला बोलावले जायचे. घरातली सगळी लहान पोरे त्यांना जेवण वाढायची. आमच्या घरात ही परंपराच होती. जाती-धर्माचा विखार कमी करणाऱ्या या पद्धती होत्या.
आम्ही अशी द्यायचो 'जकात'
इस्लामच्या धर्मग्रंथानुसार समाजातील गरीब, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांना ईदमध्ये 'जकात' दिली जाते. इस्लाममध्ये याला कर्तव्य मानले गेले आहे. तुम्ही जे कमावले आहे त्यातील एक भाग गरजू लोकांना देण्याचा नियम सुखवस्तू लोकांना बंधनकारक असतो. आम्ही शेतकरी कुटुंबातले. पीक विकले गेल्याशिवाय घरात पैसा यायचा नाही...पण तरीही आम्ही 'जकात' द्यायचो. मग, ईददरम्यान घरात घमेल्यांमध्ये अम्मी-अब्बू धान्य भरून ठेवायचे आणि गरजू लोकांना बोलावून आम्ही त्यांना ही 'जकात' द्यायचो. शेवटी, आर्थिक रूपात असो वा वस्तुरूपात असो; गरजूंपर्यंत मदत पोहोचली पाहिजे, असा यामागचा उद्देश असायचा.
माझ्या हिंदू मित्रालाही घरच्यांनी दिली 'ईदी'
बालपणीची रमजानमधील आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे ईदी. ईदी म्हणजे मोठ्यांनी घरातल्या छोट्यांना दिलेली भेटवस्तू. यात काहीतरी गिफ्ट किंवा पैसे दिले जायचे. माझ्या लहानपणी आम्हाला कमीत कमी एक रुपया आणि जास्तीत जास्त पाच रुपये मिळायचे; पण ही रक्कमही त्या वेळी खूप जास्त वाटायची. या रकमेत आम्ही सर्व वस्तू विकत घेऊ शकायचो. चाचा, बडे भाई, चाची हे सगळे 'ईदी' द्यायचे. रमजान ईदविषयी माझी आणखी एक विशेष आठवण आहे. मी तरुणपणी चळवळीशी जोडली गेल्यावर माझ्याबरोबर बिहारच्या आदिवासी भागात काम करणारा माझा एक मित्र रमजानदरम्यान घरी गावाकडे आला. तेव्हा माझ्या घरातल्या सगळ्या लोकांनी अगदी सहजपणे त्याला 'ईदी' दिली. 'तो चांगले काम करतो, त्यामुळे आपल्याला जे जे शक्य आहे ते ते आपण त्याला दिले पाहिजे', या भावनेतून त्यांनी त्याला भेटवस्तू दिल्या. अलीकडे हिंदू आणि मुस्लिम वस्त्या वेगवेगळ्या झाल्यामुळे एकमेकांचे सांस्कृतिक रीतीरिवाज लोकांना तितकेसे परिचित राहिलेले नाहीत.
भारताच्या विविधतेमध्ये एकात्मता आहे. रमजानबद्दल मी काही लिहिणे का आवश्यक आहे याचा विचार करत असताना मला वाटते की, मुस्लिम संस्कृतीचे आणि मुस्लिम समाजाचेही योगदान भारतीय संस्कृतीमध्ये आहे. ईद ही मानवतेविषयीची कोमल भावना आहे. माझ्या बालपणीची सांस्कृतिकतेतून सलोखा जपणारी रमजान ईद ते मिनाज लाटकर, हीनाकौसर खान या तरुण मुलींनी 'नब्ज़' या विशेषांकातून ईदची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जगासमोर सादर करत साजरी केलेली रमजान ईद...असा हा रमजानचा परिवर्तनशील प्रवास आहे. आम्ही बालपणी शीरखुर्मा वाटून ईद साजरी केली, तर आजच्या तरुणी ईदचे महत्त्व जगाला पटवून देणारे अंक वाटून ईद साजरी करत आहेत. सलोख्याचा हा सण आत्म्याला असा अतिशय सुखावून जाणारा असतो.
(शब्दांकन : छाया काविरे)
- रझिया पटेल
(लेखिका ज्येष्ठ संशोधक व सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)