अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन) आणि ईद ए मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती) या दोन्ही सणांमधील साम्य म्हणजे त्या त्या सणादिवशी निघणाऱ्या भव्य मिरवणुका. विशेषतः पुण्यासारख्या शहरांमध्ये हे दोन्ही सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. यंदाच्या वर्षी हे दोन्ही सण एकाच दिवशी म्हणजे २८ सप्टेंबरला येत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मिरवणुकांची वेळ जवळपास सारखीच असते. त्यामुळे हे उत्सव कसे साजरे होणार, याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील मुस्लीम संघटनांनी एकत्र येत महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांकडून आणि पोलिस प्रशासनाकडून त्यांचे कौतुक होत आहे.
ईद ए मिलादुन्नबीच्या मिरवणुकीबाबत मुस्लिम समुदायातील वेगवेगळ्या सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या पुढाकारातून एक कमिटी बनवण्यात आली. या कमिटीच्यावतीने सोलापुरात बैठक आयोजित केली होती. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ ऑक्टोबरला मिलादुन्नबीचा जुलूस (मिरवणूक) काढायचा, असा समन्वयवादी निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शहरातील विजापूर वेस, शास्त्रीनगर, नई जिंदगी व नवे घरकूल येथील जुलून कमिट्यांनी मिळून हा निर्णय घेतला.
कमिटीची प्राथमिक चर्चेची बैठक झाल्यानंतर शहरकाझी सय्यद अमजदअली यांच्यासह ईमाम व पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने ईदच्या मिरवणुकीबाबत झालेल्या निर्णयाची माहिती पोलिसांना दिली. या बैठकीत मिरवणुकीचे नियोजन कशा पध्दतीचे असेल यावर चर्चा झाली.
या निर्णयाचे कौतुक करत मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक विजयकुमार शाबादी म्हणाले, “सोलापूर शहरात अनेक समाजाचे लोक शांततेने एकोप्याने राहतात. एकमेकांच्या सण उत्सवासाठी परस्परांना सहकार्य करण्याची इथे पंरपरा आहे. त्या परंपरेला साजेसा हा निर्णय आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.” तर, “या निर्णयामुळे नागरिकांना दोन्ही उत्सवाचा आनंद घेता येणार आहे. ईदच्या मिरवणुकीच्या आयोजनाबाबत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबतही आम्ही समन्वय साधणार आहोत,” असे शहर काझी सय्यद अमजदअली व उत्सव कमिटीचे अध्यक्ष मतीन बागवान यांनी सांगितले.
- प्रकाश सनपूरकर
मुस्लीम समाजाच्या अशाच निर्णयासंदर्भातील ह्याही बातम्या वाचा 👇🏻