भारतासह जगभरात रमजान ईद उत्साहात साजरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
जगभरात ईद उत्साहात साजरी
जगभरात ईद उत्साहात साजरी

 

जगभरात आणि भारतात  रमजान ईद, म्हणजेच ईद-उल-फित्र, मोठ्या उत्साहात साजरी झाली. रमजानच्या पवित्र महिन्याचा शेवट आणि शव्वाल महिन्याची सुरुवात या सणाने झाली. हा सण शांतता, एकता आणि करुणेचा संदेश घेऊन आला. मुस्लिम समाजाने मस्जिदींमध्ये आणि मोकळ्या जागांवर सामूहिक नमाज पढून या आनंदाच्या दिवसाची सुरुवात केली.  

भारतात ईदचा उत्साह
भारतात रमजानचा महिना 2 मार्च 2025 पासून सुरू झाला होता. 30 मार्चच्या रात्री चंद्र दिसल्यानंतर 31 मार्चला ईद साजरी करण्याची घोषणा झाली. देशभरात या सणाचा उत्साह पाहायला मिळाला. सकाळी मस्जिदींमध्ये आणि इदगाहवर नमाजासाठी भाविकांची गर्दी उसळली. वाराणसीत जामा मस्जिदीत नमाजासाठी जागा कमी पडली, तिथे अनेकांनी पायऱ्यांवरच नमाज अदा केली. भोपाळमध्येही नमाजानंतर लोकांनी एकमेकांना गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. दिल्लीत चांदनी चौकातल्या जामा मस्जिदीत हजारो लोकांनी नमाज अदा केली.
 

मुंबईसह महाराष्ट्रभरात मस्जिदींमध्ये आणि इदगाहवर शांतता आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना झाल्या. नमाजानंतर सर्वांनी एकमेकांच्या घरी जाऊन मिठाई, शिरखुरमा आणि बिर्याणी यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेतला गेला. ईदच्या पूर्वसंध्येला  बाजारात खरेदीचा उत्साह दिसला होता. नवे कपडे, दागिने आणि भेटवस्तूंची खरेदी करताना लोकांचा आनंद ओसंडून वाहत होता.पुण्यात कॅम्प परिसरातल्या बाबाजान चौकात ईदच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली. डिझायनर सूट्स, मेकअपचा सामान आणि मेहंदीच्या कोनांसाठी महिलांची लगबग पाहायला मिळाली.

ईद साजरी करताना भारतात हिंदू-मुस्लिम एकतेचे अनेक प्रसंग पाहायला मिळाले.अनेक ठिकाणी हिंदूंनी नमाजला जाणाऱ्या मुस्लिमांवर फुलांचा वर्षाव केला. तर काही ठिकाणी पाणी आणि सरबत वाटपात त्यांनी पुढाकार घेतला. ईदच्या दिवशी सोशल मिडीयावर देशभरातली अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. या हृदयस्पर्शी कृतींनी दोन्ही समाजांमधली बंधुभावाची भावना अधोरेखित झाली. 

जगभरात ईदचा रंग
मक्का आणि मदिनेत यंदा रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळाला. सौदी अरेबियात 29 मार्चला चंद्र दिसल्यानंतर 30 मार्च 2025 रोजी ईद साजरी झाली. मक्केतल्या मस्जिद अल-हरम आणि मदिनेतल्या मस्जिद अल-नबवीमध्ये सामूहिक नमाजानंतर लोकांनी एकमेकांना गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. नवे कपडे परिधान करून मिठाई आणि खजुरांचा आस्वाद घेतला गेला. मक्केतल्या काबा परिसरात आणि मदिनेत प्रेषित मुहम्मद यांच्या समाधी येथे जगभरातील भाविकांची गर्दी उसळली. 

युरोप आणि अमेरिकेतही मुस्लिम समाजाने ईद साजरी केली. लंडनमधल्या मस्जिदींमध्ये नमाजानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. न्यूयॉर्कमध्येही मस्जिदींमध्ये नमाज पढून लोकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 

मस्जिद अल-अक्सा, गाझा, इराण आणि सिरियामध्ये मात्र ईद साजरी करताना अनेक अडचणी आल्या. मस्जिद अल-अक्सामध्ये 31 मार्चला हजारो पॅलेस्टिनींनी नमाज पढला, पण इस्रायली पोलिसांनी काही निर्बंध लादले होते. गाझामध्ये युद्धामुळे रमजान आणि ईदचा आनंद फिका पडला. रफाह भागात ड्रोनचा आवाज ऐकू येत असताना लोकांनी नमाज पढला. इराण आणि सिरियातही राजकीय अस्थिरतेमुळे उत्साह मर्यादित राहिला. सिरियात अल-असद राजवटीचा पाडाव झाल्यानंतर पहिल्यांदाच ईद साजरी झाली, पण आर्थिक संकटामुळे अनेकांना सण साधेपणाने साजरा करावा लागला. या ठिकाणी शांतता आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यावरच भर दिसला.

ईदचा खरा अर्थ
ईद हा फक्त धार्मिक सण नाही, तर एकता आणि प्रेमाचा उत्सव आहे. रमजान महिनाभर उपवास, प्रार्थना आणि आत्मचिंतन करून मुस्लिम समाज या सणाला सामोरं जातो. नमाजानंतर लोक एकमेकांना भेटतात, मिठाई देतात आणि दानधर्म करतात. सदका अल-फित्र दानामुळे गरजूंनाही ईद साजरी करता येते.  या सणातून करुणा, एकता आणि परस्परांबद्दल आदर वाढतो. भारतात वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. जगभरातही हा सण शांतता आणि बंधुभावाचा संदेश देतो.  

भारतात ईद साजरी करताना स्थानिक संस्कृतीचा प्रभावही दिसतो. मिठाईत शिरखुरमा आणि सेवई यांच्यासोबतच बिर्याणी आणि कबाब यांचा समावेश असतो. कपड्यांमध्येही पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ पाहायला मिळतो. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही केलं गेलं. ईदचा हा सण जगभरात आणि भारतात प्रेम, शांतता आणि एकतेचा संदेश घेऊन आला. या सणाने सर्वांना एकत्र आणत मानवी मुल्ये बळकट केली.
 
जगभरात पाहायला मिळाला ईदचा उत्साह 
 
 
केप टाऊनमध्ये शेकडो मोठ्या पातेल्यांमध्ये ईदनिमित्त जेवण तयार करताना मुस्लीम कार्यकर्ते. [रॉजर बॉश/एएफपी]  
 
 
 
नायजेरियातल्या लागोस शहरात ईद-उल-फित्रच्या नमाजचे नेतृत्व करणारा इमाम. [संडे अलंबा/एपी फोटो]  
 
 
म्यानमारमधल्या मांडाले शहरात नष्ट झालेल्या मस्जिदींजवळ ईदची नमाज अदा करत दुआ करताना नागरिक. [साई ऑंग मेन/एएफपी]  
 
 
तेहरानच्या उत्तर भागातल्या पंजतन मस्जिदमध्ये ईद-उल-फित्रची नमाज अदा करण्यासाठी एकत्र आलेल्या महिला. [एएफपी]  
 

 
गाझामधल्या देयर अल-बलाह येथे ईद-उल-फित्रची नमाज अदा करताना पॅलेस्टिनी नागरिक. [अब्देल करीम हाना/एपी फोटो]
 

 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter