अनंत चतुर्दशी व मोहंमद पैगंबर यांची जयंती एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे त्या दिवशी प्रशासनावर ताण आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथील मुस्लिम समाजाने घेतलेल्या निर्णयाने तो ताण मोकळा झाला आहे. त्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूक न काढता ती दोन दिवसांनी एक ऑक्टोबरला काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे.
मिरवणुकीचे आयोजक साबिरमियॉ मुल्ला यांनी त्याची माहिती दिली. त्यामुळे सामाजिक सलोख्यासह ऐक्याचेच प्रतीक म्हणून निर्णयाचे प्रशासनासह नागरिकांनी स्वागत केले आहे. अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद म्हणजेच पैगंबर जयंती एकाच दिवशी गुरुवारी (ता. २८) आहे. प्रशासनही त्यावर विचार करत होते.
मात्र, मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंतीची शाही दरबार मिरवणूक त्या दिवशी न काढता ती एक ऑक्टोबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पैगंबर जयंती उत्सव साजरा करणाऱ्या आयोजकांची बैठक झाल्याचे साबिरमियॉ मुल्ला यांनी सांगितले. त्याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली आहे.
शहरातील प्रत्येक समारंभात, उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने एकत्र येऊन सहभागी होतात. यावर्षी उत्सव मोठ्या दिमाखात सुरू आहे. मात्र, अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद एकाच दिवशी येत आहेत. त्यावर निर्णय काय घ्यायचा हा विषय होता. मात्र, त्यावर तोडगा काढण्यात आला आहे. पैगंबर जयंती उत्सव समितीचे श्री. मुल्ला यांनी त्या दिवशीची मिरवणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्पष्ट केले.
एक ऑक्टोबरला पैगंबर जयंतीची शाही दरबार मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता जामा मशिद येथून सुरू होईल. प्रतिवर्षाप्रमाणे मिरवणूक मार्गावरून मिरवणूक शहरातून काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याच्या आवाहनही या वेळी करण्यात आले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -