जगातील मुस्लिमांची सर्वांत मोठी धार्मिक सुधारणेची चळवळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तबलीगी जमातच्यावतीने राज्यभर विविध ठिकाणी ‘उमुमी इज्तेमा’चे आयोजन करण्यात येत आहे. इज्तेमा म्हणजे धार्मिक संमेलन. त्यापैकी २ जानेवारी ते ३ जानेवारी दरम्यान अंबाजोगाई येथील चांदमारी ग्राऊंड येथे जिल्हास्तरीय इज्तेमा पार पडला. तब्बल दीडशे एकर परिसरात हे भव्य आयोजन करण्यात आले होते.
इज्तेमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून जवळपास दोन लाख मुस्लीम बांधव एकत्र आले आणि सर्वांच्या कल्याणासाठी व हितासाठी प्रार्थना केली. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालावे, प्रत्येकाने सज्जनता दाखवून सर्वांसोबत नम्रतेने वागावे आणि कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे मौलानांनी आवर्जून सांगितले. विशेष म्हणजे, इज्तेमामध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च न करता अत्यंत साधेपणाने काही जोडप्यांचे विवाह संपन्न झाले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.
या दोन दिवसीय इज्तेमासाठी बीड जिल्ह्यातून आणि आसपासच्या भागातून हजारो मुस्लिम बांधव एकत्र आले होते. इज्तेमाचा समारोप शुक्रवार मगरीबच्या (सायंकाळीची नमाज) नमाजनंतर सामुदायिक दुआने झाला. या इज्तेमातून सर्वांना सामाजिक सौहार्दासाठी प्रार्थना केली गेली.
मुस्लिमांसाठी गेवराईच्या आमदारांचे पत्र
गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात होणाऱ्या इज्तेमाची तयारी सुरू होती. इज्तेमासाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या वाहनांना टोल माफी करण्याबाबत बीड जिल्ह्यातील गेवराई मंतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी आय.आर.बी. टोल प्लाझाच्या व्यवस्थापकांना पत्राद्वारे विनंती केली.
याविषयी बोलताना इज्तेमाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य इस्माईल कादरी म्हणतात, “तबलीगी जमातच्यावतीने मुस्लिमांसाठी अंबाजोगाई येथे इज्तेमा घेण्यात आला होता. यासाठी आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून काम करत होतो. दरवर्षी इज्तेमासाठी बीडमध्ये लाखो मुस्लिम येत असतात.”
ते पुढे म्हणाले, “ यापैकी अनेकजण वाहनाने येतात. इज्तेमासाठी येणाऱ्या वाहनांना टोलमाफी मिळावी यासाठी आम्ही गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांना विनंती केली होती. मुस्लिम समाजाची मागणी आमदारांनी मान्य केली. त्यांनी लगेच आय.आर.बी. टोल प्लाझाच्या व्यवस्थापकांना यासंदर्भात पत्र पाठवले. यासाठी मी संपूर्ण मुस्लिम समाजाच्यावतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.” इज्तेमाला कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनीही सदिच्छा भेट दिली आणि उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
इज्तेमातून सामाजिक सौहार्द जपण्याची दुआ
बीड जिल्ह्यातील इज्तेमामध्ये मुस्लिम समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी मुस्लिम मौलवी आणि धर्मगुरू उपस्थित होते. यावेळी मौलाना सादीक म्हणाले, "मुस्लिमांसाठी ईमानची ताकद, इस्लामी शिष्टाचार महत्वाचा आहे. तसेच देशही मुस्लिमांसाठी महत्वाचा आहे. मुस्लिमांनी एकत्र येत सामाजिक सौहार्द जपले पाहिजे. एकत्र येऊन मुस्लिमांनी त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणेकडे लक्ष दिले पाहिजे.तरच समाजाची आणि देशाची प्रगती होईल."
याविषयी मौलाना जुनेद सुलतानी म्हणतात, “तब्लीगी इज्तेमा हे केवळ धर्मासाठी कलेले आयोजन नाही. इज्तेमातून मुस्लिमांचे जीवन सुधारवण्याचा, समाजात एकता प्रस्थापित करण्याचा आणि सर्व धर्मांबद्दल आदर निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो. तसेच याठिकाणी मुस्लिमांना इस्लामी शिक्षण आणि सामाजिक जबाबदारीविषयी मार्गदर्शन केले जाते.”
हजारो कार्यकर्ते देतात सेवा
इज्तेमासाठी येणाऱ्या हजारो, लाखो मुस्लिम समाज बांधवांच्या राहण्याची, खाण्याची जबाबदारी इज्तेमाचे आयोजन करणाऱ्या व्यवस्थापकांची असते. ही जबाबदारी पार पडण्यासाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता असते. या आवश्यकतेला कर्तव्य समजून हजारो मुस्लिम कार्यकर्ते इज्तेमासाठी त्यांची सेवा देतात. या सेवेमागचा उद्देश इज्तेमासाठी आलेल्या मुस्लिमांना कोणतीही अडचण होऊ नये, त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात असा असतो. विशेष म्हणजे मुस्लिमांच्या या भव्य संमेलनामुळे वाहतूकीचे आणि इतर प्रश्न निर्माण होऊन इतरांना त्रास होऊ नये याचीही विशेष खबरदारी हे स्वयंसेवक घेतात.
इज्तेमासाठी मुस्लिम समाजाचे अचूक व्यवस्थापन
बीड येथे झालेल्या इज्तेमासाठी मुस्लिम समाजाच्यावतीने चांदमारी ग्राऊंड येथे तब्बल १०० एकर जमिनीवर मंडप तयार करण्यात आला होता. तसेच येणाऱ्या सर्व मुस्लिमांच्या मुक्कामाची, खाण्या-पिण्याची, आरोग्याची आणि वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. इज्तेमाच्या व्यवस्थापनाने आलेल्या मुस्लिमांची काळजी घेण्यासाठी A, B, C, D प्रमाणे काही झोन निर्माण केले होते. प्रत्येक झोनला मर्यादित लोकांची जबाबदारी देण्यात आली होती. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी व्यवस्थापनाने वॉकीटॉकीचा वापर केला होता.
इज्तेमा म्हणजे काय?
तबलीगी जमातची स्थापना १९२७मध्ये मौलाना इलियास कांधलवी यांनी केली. तबलीग जमात जगातील मुस्लिमांची सर्वांत मोठी धार्मिक सुधारणेची चळवळ म्हणून ओळखली जाते. 'जमात' म्हणजे लोकांचा समूह. संघ. तब्लीगी जमातचे वार्षिक संमेलन म्हणजे इज्तेमा होय. दरवर्षी देशभरातील विविध भागांत या इज्तेमाचे आयोजन करण्यात येते. इस्लामने सांगितलेली नैतिक मुल्ये मुस्लिमांमध्ये अंगी बाणावीत त्यांच्यामध्ये नैतिक आणि धार्मिक सुधारणा करणे हा इज्तेमाचा उद्देश असतो.
- फजल पठाण