संत ज्ञानदेव, नामदेवांनंतर दोन-अडीचशे वर्षांनी त्यांच्या सलोखा, बंधुभावाच्या कार्याला पुन्हा उजाळा देण्याचं काम नाथबाबा अर्थात संत एकनाथांनी केलं. पैठणसारख्या सनातनी, कर्मठांच्या बालेकिल्ल्यात राहून स्त्री-शूद्रांचा कैवार घेऊन, देशभाषेचा आवर्जून पुरस्कार करून त्यांनी भागवत धर्माचा समतेचा झेंडा फडकवला. अर्थात, तोही अत्यंत शांत आणि विनम्रपणे. त्या अर्थानं शांतिब्रह्म एकनाथांनी 'शांतीत क्रांती' केली. नाथबाबांच्या त्या ऐतिहासिक भूमीतील सलोख्याची ही कहाणी...
पैठण हे गाव सातवाहन राजांमुळं, संत एकनाथांमुळं, पैठणी साडीमुळं आणि जायकवाडीच्या धरणामुळं आपण ओळखत असतो. पण या पैठणात गल्लोगल्ली एकेक भारी भारी गोष्टी दडलेल्या आहेत. 'सलोख्याची वारी'च्या निमित्तानं त्या शोधत फिरत असतानाच भेटले सैयद याह्या कादरीसाहेब.
पैठणमधला अंमळ प्रसिद्धच; पण त्यामागची कथा फारशी माहीत नसलेला सय्यद सादात दर्गा पाहायला जायचं म्हटलं, तेव्हा ज्येष्ठ सहकारी चंद्रकांत तारू यांनी ठेवणीतल्या चाव्या फिरवल्या आणि पैठणातली एक से एक हुनरबाज माणसं दिवसभर भेटत गेली. त्यातलेच एक जानी शख्सियत होते हे कादरीसाहेब.
पालथी नगरीच्या खालच्या अंगाला असलेल्या दवासाजच्या ओट्यावरून आम्ही त्यांना गाडीत बसवून घेतलं. अरुंद गल्ली- बोळातल्या दर्गे-मशिदी-सोफे पाहत आम्ही साळीवाड्यालगत सय्यद सादात दर्याकडं आलो. बहामनी-निजामी काळातल्या कमानी, दगडी चिरेबंदी आणि चुनेगच्ची मनोरे असलेल्या दर्यात जाताना देवळाचे कोरीव खांबही जागोजाग चिणलेले दिसत होते. आत प्रवेशताच अंगणाच्या मधोमध रोवलेल्या तुटक्या खांबावरची 'घटपल्लव' नक्षी नजरेआड होणं शक्यच नव्हतं.
सय्यद सादात दर्गातील कुराणाच्या आयती कोरलेल्या शिलालेखाला स्पर्श केल्यास आजार बरे होतात, अशी श्रद्धा आहे.
'आप है हजरत इद्रीस हुसैनी सय्यद सादात दूल्हा। यहां हमारी हिंदू-मुस्लिम की ऐसी परंपरा है, की इधर से 'नाथ' है, इधर से 'आप' है। नाथ महाराज के दर्शन को जो लोग आते है, वो सादात दूल्हा में भी आते है। जो इधर आते है, वो नाथ मंदिर भी जाते है। हमारे यहां ये हमेशा से चला आ रहा है ये सिलसिला। मैं तो अस्सी बरस से देख रहां हूँ; की जितने भी लोग यहां आते है, बोलते है की 'आप' भी हमारे नाथ महाराज है।"
काझी कलिमुल्ला सिद्दीकी आणि सय्यद याह्या कादरी
कादरीसाहेब आपल्या खास दखनी बोलीत सगळा इतिहास सांगू लागले…
"मालूम ये हुआ, के दोनों एक ही साथ के है। नाथ महाराज और सादात दूल्हा। ये हमेशा साथ-साथ रहते थे। कानिफनाथ ने यहाँ चौबीस साल पानी भरे। उसके बाद एक दिन वो बोले, की हमारी छुट्टी कर देओ, तो हजरत ने कहाँ की जाओ। तो वो फिर मढी चले गए। रमजानी बाबा उनका नाम है। वहाँ भी बडी जत्रा भरती है।" या संवादातून अजूनही मूळ विषय सुरू होत नाही म्हटल्यावर मी अब्दुल कदीर यांच्याकडे वळलो.
सादात दूल्हा दर्यात येणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीबद्दल आणि दर्गातल्या मुसलमानांकडून होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. पण हे साहेबसुद्धा सादात दूल्हातून कानिफनाथांच्या मढीला जाणाऱ्या कावडी आणि परंपरांबद्दलच सांगत बसले. शेवटी गाडी वारकऱ्यांवर आली आणि दोघेही मग सुरू झाले. हिंदी-उर्दू-मराठीची खिचडी चाललेली होती नुसती.
"सगडे दिंड्या इथं येतात. एक सगड्यात मोठी दिंडी येती. त्याच्यामध्ये पोलिसपाटील, पोलिसचा बंदोबस्त असतो आणि पैठणचा पूर्ण रोड फुल होऊन जातो, इतके लोक इथं येतात. ते इथं दर्यात थांबतात. पुरानी भाईचारे की ये परंपरा है हिंदू-मुस्लिम की। भोत साताठसो सालसे ये चले आरा। सब मिल जुल के रहते।”
वारीवरून गाडी पुन्हा कानिफनाथांनी चोवीस वर्ष पाणी भरलेल्या दगडी रांजणाकडं आली. मग दर्गाचे आचारी सैयद ताहेर सैयद कैसर हुसैन तिथं आले. त्यांनी सांगितलं, “सैयद सादात निजामुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह इनका नाम है। हिंदू-मुसलमान सब इनकू मानते। ये बडा गुम्बद देखरे? उपरका कलश पूरा सोने का है। जबसे वहाँपर है, कभी उसको निकाला नही। वैसे के वैसे चमक है।" यांचीही गाडी रुळावर येईना झाली. मुद्दा सोडून माहात्म्य सांगत बसायचा दोष आपल्याकडे सार्वकालिक आणि सार्वजनिकच असावा, हे आता पानभर वाचत आल्यावर तुम्हालाही जाणवलं असेल.
मग बोलू लागले राष्ट्रवादी काँग्रेसचे पैठण शहरातले युवा नेते काझी कलीमुल्ला सिद्दीकी. "वैसे भी पैठण एक ऐतिहासिक शहर है। इसका भौत पुराना इतिहास है। इसवी सन पूर्व दोन हजार साल इतना पुराना इसका इतिहास है। तो यहाँ पर जैसे साधुसंत आए, वैसे सूफी भी आए। यहाँ पर एक बहोत बडा दर्गा है, जिसका नाम है मौलाना साहब। सूफियों में जैसे चार सिलसिले चलते आए। कादरिया सिलसिला है, चिश्तीय, सहरवर्दी, नक्षबंदी वगैरा। ये बुजुर्गाने दीन, साधु संत होते है, वैसे मुसलमान धर्मगुरू ये चार इसमें चले। इस्लामका प्रचार प्रसार इन्होंने किया। और हमेशा ही इन्होंने सब को साथ लेकर चलने का प्रयास किया। इसलिये हिंदू-मुसलमान सबका ये श्रद्धास्थान है। दर असल इन्होंने सेवा के माध्यम से लोगों के दिलों पे हुकूमत की। के लोग आज भी इनको दिल से मानते। हालात की लोग इनके बारे में डिटेल नहीं जानते, लेकिन आज भी उनका दिल इधर खींचा चला आता है। हमारे यहाँ के एकनाथ महाराज जो थे, तो वो हमेशा एक-दूसरे के सहवास में रहे हुए लोग है; के जो चौदा सौ पालखी खुल्दाबाद शरीफ के अंदर आई थी। उसके बाद जो बुजुर्गाने दीन चिश्तिदया सिलसिला से आगे चले, और यहाँ से आगे जो है तो इस्लाम फैला। तो दरअसल ये लोग खिदमत में रहें। खिदमत में रहने का ये था, की इनको दिली सुकून मिलता। जैसे कानिफनाथ यहाँ पर आए, पानी भरे। यहाँ पर इनके सहवास में बहोत सारे लोगों को चैन और शांती मिली।"
हे पुन्हा वारीच्या विषयापासून दूर जाणं होतं. पण इस्लामच्या प्रसाराचं त्या काळातलं दख्खनेतलं प्रमुख केंद्र ठरलेल्या खुलताबादच्या 'चौदा सौ पालखी'चा काझी साहेबांनी केलेला उल्लेख मला विशेष वाटला. चौदाव्या शतकात दिल्लीच्या निजामुद्दीन औलिया यांनी ७०० सूफी अनुयायांसह पाठवलेल्या दौलताबादच्या शाह मुन्तजिबुद्दीन (जर जरी जर बक्ष) यांच्या मृत्यूनंतर दख्खनेत इस्लामच्या प्रसारासाठी बुऱ्हाणुद्दीन गरीबशहा या त्याच्या थोरल्या भावाला खुलताबादच्या खिलाफतीची जबाबदारी देऊन पाठवलं होतं.
मुहंमद बिन तुघलकानं जेव्हा आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणली, तेव्हा बुऱ्हाणुद्दीन औलिया आणखी ७०० सूफी अनुयायांसह दिल्लीहून दौलताबादला येऊन राहिले. त्यांना चिश्ती परंपरेतले २१ वे ख्वाजा मानलं जातं. त्यांनी खुलताबादला मुख्य ठाणं करून १४०० अनुयायांसह दख्खनेत इस्लामचा प्रसार केला. (१३४४ साली वारलेल्या या सूफी संताच्या स्मरणार्थ खानदेशच्या फारूखी राजांनी १३९९ साली 'बुऱ्हाणपूर' शहर वसवलं.) त्या 'चौदा सौ पालखी' परंपरेतल्या शाह मोईजुद्दीन उर्फ मौलानासाहेब यांचा मोठा दर्गा पैठणला आहे. त्यांच्यानंतर काही काळाने सादात दूल्हा इथं आले.
मीही थोडा इतिहास वाचूनच गेलो होतो. सादात दूल्हा उर्फ निजामुद्दीन यांचा जन्म १४व्या शतकाच्या अखेरीस इराणमधल्या सिस्तान इथं झाला. त्यांच्या पित्याचं नाव मोहफमुद्दीन इद्रीस. असं सांगतात, की निजामुद्दीनला मातेच्या उदरातच कुराण मुखोद्गत होतं. मदरशात दाखल होताच पहिल्याच दिवशी त्यानं अख्खं कुराण तोंडपाठ म्हणून दाखवत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याची प्रसिद्धी वारेमाप वाढली, तसं जगणं कठीण झालं आणि देशाटन करत करत तो दिल्लीमार्गे दौलताबादला आला.
त्यावेळी तिथं दिल्लीच्या निजामुद्दीन औलियाचा शिष्य अलाउद्दीन जिया याचा बोलबाला होता. त्याच्या खानकाहमध्ये राहून याने मल्लविद्या, युद्धकलेसह सगळ्या विद्या आत्मसात केल्या. कालांतराने त्याला अहमदाबादच्या खाजा रुक्नोद्दीनकडून खिलाफतीची वस्त्रं आली आणि 'सय्यदुस्सादात' (सय्यदश्रेष्ठ) म्हणून त्याची नियुक्ती पैठण प्रांताच्या खलिफापदी झाली. काही काळ बिडकीन मुक्कामी राहून तिथं दालवाडीच्या पीर अम्मनच्या मठात मशीद बांधली. पैठणला आल्यावर अनेक चमत्कार त्यांनी दाखवले. चार मुलांकरवी वंशपरंपरा आणि शिष्यपरंपरा निर्माण करून इस्लामच्या प्रसारात मोठं योगदान दिलं. सेतूमाधवराव पगडी यांच्यासह सूफी पंथाच्या अनेक अभ्यासकांनी यावर लिहिलं आहे.
पुन्हा मी वारकऱ्यांच्या मुद्द्द्यावर आलो. मग काझी म्हणाले, "इथं वारकरी एकाच श्रद्धेनं येतात. कानिफनाथ बाबा किंवा संत एकनाथ जर इथं येत होते, यांच्या सहवासात राहत होते; तर आम्ही पण इथं येऊ. वारकरी इथं येतात. या दर्यातच राहतात. आम्ही त्यांच्यासाठी शिधापाण्याची व्यवस्था करतो. गावचे पोलिसपाटील इथं तळ ठोकून असतात. नाथषष्ठी यात्रेत मोठी गर्दी होते. पैठणहून पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीच्या वेळीसुद्धा वारकरी दर्शनाला येतात. तीन दिवस मुक्काम करतात. चुली मांडून स्वयंपाक करतात. आम्हीही ही परंपरा पुढं कायम चालू ठेवली आहे."
इथंच दर्गासमोर जुनीच पण लाकडी खांबांवर तोललेल्या माळवदाची मशीद आहे. दिंडीच्या इथल्या मुक्कामात दर्यातच भजन-कीर्तन चालतं. पण नमाजाची वेळ झाली, की वारकरी भजनं थांबवतात. नमाज झाली, की पुन्हा भजन-कीर्तन सुरू होतं. तीन-चार दिवस इथं पाय ठेवायला जागा नसते. पण आजवर इतक्या वर्षात कधी हिंदू-मुसलमानांत यावरून वाद झाला नाही. कादरीसाहेब सांगत होते, "पोलिसपाटील दिवसातून तीनदा येतात. वारकऱ्यांना हवं नको पाहतात. शांततेत सोहळा पार पाडण्याचं आवाहन करतात. आम्हीही म्हणतो, की हे आमचेच लोक आहेत. तुम्ही यायचीदेखील गरज नाही. पण ते नेमानं येऊन त्यांचं काम करतात. पहले के पोलिसपाटील भी आते थे। अब उनके बच्चे है।"
हे 'पहले के' पोलिसपाटील म्हणजे इथं होऊन गेलेले थोर इतिहास संशोधक बाळासाहेब पाटील. पैठण नगरीचं पाटीलपण त्यांच्याकडे पूर्वापार चालत आलेलं. या घराण्याला गावात मोठा मान आहे. परंपरेबरोबरच आपल्या कर्तृत्वानं आणि मनमिळाऊपणानं त्यांनी तो कमावलेला आहे. इथल्या राज्य पुरातत्त्व विभागाच्या वस्तुसंग्रहालयाला बाळासाहेब पाटलांचं नाव देण्यात आलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचं हस्ताक्षर शोधून काढणाऱ्या या बाळासाहेब पाटलांनी पैठणचा प्राचीन इतिहास जगासमोर आणण्याचं फार मोठं काम हयातभर केलं. त्यांचे सुपुत्र चंद्रशेखर पाटील इथले नगराध्यक्षही राहिले. त्यांना भेटायला वाड्यावर गेलो. पण त्यांच्याऐवजी भेट झाली, त्यांचे धाकटे बंधू जयवंतराव पाटील यांची. मुंबईला राज्य अबकारी खात्यात अधिकारी असलेले जयवंतराव इतिहास, कला, संस्कृती आणि साहित्याचे दांडगे अभ्यासक. नाथांचे अभंग, गवळणी, भारूडं त्यांना मुखोद्गत. हाल सातवाहनाच्या 'गाहा सत्तसई'तल्या कितीतरी 'गाहा' ते लीलया म्हणून दाखवतात. संतकवी अमृतराय महाराजांचे कटाव, त्यावर अशोक रानड्यांचं विवेचन, सातवाहनांच्या कथांपासून नाथांच्या 'हिंदू-तुर्क संवाद', 'हिंदू-शुक संवादांबद्दल बोलता बोलता पाटलांच्या वाड्यातल्या ओसरीत घातलेल्या सतरंजीवर दोनेक तास सहज उलटले.
सलोख्याच्या वारी' बद्दल सांगितलं, तेव्हा त्यांनी पैठणच्याच 'बहिरा जातवेद पिसा'ची कथा सांगितली. आधी हिंदू होते, मग मुसलमान झाले, मग बौद्ध झाले, कुठं मन रमलं नाही, मग पुन्हा हिंदू झाले. असं करत सगळेच धर्म आपलेसे केले त्यांनी. तसंच आणखी एक 'नेजा महाराजां'ची कथा सांगितली.
फार वर्षांपूर्वी गोदाप्रवाहात एक लांब काठी वाहत आली. त्यावर चाँदतारा ठोकलेला होता. नदीत मासेमारी करणाऱ्या कहार समाजाच्या नावाड्यांनी तो बांबू काढला. त्याला कापायचा प्रयत्न झाला, तेव्हा रक्त आलं. लोक घाबरले, वगैरे दंतकथाही सांगितल्या जातात. या काठीचा मशिदीत सांभाळ करतात मुसलमान, तिची यात्रा काढतात हिंदू कहार, ती मिरवणुकीत तोलतात भोई आणि पूजेचा मान पोलिसपाटलाचा. दर्शनाला संगळ्याच जातीचे लोक जातात. असा सगळ्या लहानमोठ्या जातींचा हा 'नेजा महाराज' पैठणमधलं समन्वयाचं आणखी एक प्रतीक.
आता इतकं झाल्यावर नाथ बाबांकडं न आलो, तर सगळा गाव खुंदळूनही सरपंचाला न भेटल्यासारखंच की! पण पैठणला जायला सकाळी निघालो तेव्हा मित्र अॅड. स्वप्नील जोशी सोबत होते. त्यांच्या घरी गुरुचरित्राचं पारायण सुरू होतं. वडिलांचा या काळात घराबाहेर न पडण्याचा, गाडीवर न बसण्याचा, पायताण न घालण्याचा नेम. नसता त्यांनाही सोबत न्यावं, असं वाटत होतं. पैठणात पोचल्या पोचल्या कृष्णकमळ तीर्थावर जाऊन नाथांच्या समाधीचं दर्शन घेतलं. पैठणला येणं नेहमीचं; पण काही शोधायला, नवं पाहायला पहिल्यांदाच आलो होतो.
यापूर्वी नाथांच्या वंशजांमध्ये सालपाळीच्या वादावरून झालेल्या मारामाऱ्या पाहिल्या होत्या. त्यावर सगळ्यांना भेटून, सगळ्यांच्या भूमिका जाणून वेगवेगळ्या ठिकाणी बरंच काही लिहिलं होतं. पण समतेचा आणि समाजक्रांतीचा वारसा सांगणाऱ्या एकनाथांचे वंशज सोवळे, पालखी, पादुका, दानपेट्या आणि सालपाळ्यांच्या भांडणात एकमेकांची डोकी फोडताना पाहिले, तेव्हा मन खट्टू झालं होतं. इथून पुढं कुणाच्या दहाव्या-तेराव्यालाच यावं लागलं तर पैठणला यावं, नसता इथं काही 'राम' नाही, असं वाटायचं. या वेळी मात्र तसं झालं नाही. नाथांचा काळ, त्यांचा सनातन्यांशी झडलेला संघर्ष, तरीही त्यांची समन्वयाची भूमिका आणि आज त्या भूमिकेचं केवळ कीर्तन- प्रवचनांतून सांगण्यापुरतं उरलेलं आणि आचरणातून कधीच संपलेलं अस्तित्व, याबद्दल जोशीबुवांशी पोहे खात-खात चर्चा सुरू होती.
संत एकनाथांच्या कार्याबद्दल गं. बा. सरदार म्हणतात, “संत ज्ञानेश्वर-नामदेवांच्या पुण्याईनं अवघ्या समाजजीवनाचा कायापालट झालेल्या भागवत धर्माची पाळंमुळं समाजजीवनात खोलवर रुजण्यापूर्वीच देवगिरीच्या यादवांचं राज्य लयाला गेलं आणि दक्षिणेत मुसलमानी अंमल सुरू झाला. पुढं पाच-पन्नास वर्षांत आजूबाजूची इतर हिंदू राज्यं नामशेष होऊन सगळा महाराष्ट्र यवनाक्रांत झाला. परधर्मीय आक्रमणाच्या अनपेक्षित आघातानं मराठा समाज (इथं महाराष्ट्रीय समाज असं त्यांना अपेक्षित आहे.) जो एकदा दिङ्मूढ झाला, तो नंतरच्या शे-दीडशे वर्षांत त्यानं पुन्हा डोकं वर काढलं नाही.
राजसत्तेचा आधार सुटल्यामुळे सामाजिक जीवनाचं क्षेत्र फारच आकुंचित बनलं. 'दहा- पाच हजार पाईक पोशील किंवा पाच-चार हजार बारगीर बाळगील, अशा तोलाचा मराठा क्षत्रिय शक तेराशेपासून शक पंधराशेपर्यंत एकही नव्हता.' (संदर्भ : राधामाधवविलासचंपू) ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतील नामदेवप्रभृति संत कालवश झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या अंतःकरणात धर्माभिमानाची ज्योत प्रज्वलित करील, असा एकही महान भगवद्भक्त उदयाला आला नाही. वीरपुरुषांची परंपरा खुंटली. धर्मप्रसाराची ऊर्मी ओसरली. वाङ्मयाची प्रेरणाही संपुष्टात आली. अधूनमधून बारीक-सारीक आध्यात्मिक प्रकरणे लिहिली जात होती. क्वचित पौराणिक कथाकाव्यांचीही रचना होत होती. पण मराठी भाषेला ललामभूत होईल, असा एकही विचारप्रवर्तक ग्रंथ या काळात निर्माण झाला नाही.
दोन- अडीच शतकांच्या या 'शिलावस्थे' नंतर महाराष्ट्रात होऊ लागलेल्या राजकीय उलथापालथीत लोकांना धर्मग्लानीच्या काळातील औदासीन्य नाहीसं होऊन आपला धर्म, भाषा, वाङ्मय, संस्कृती याबद्दल आत्मीयता वाटू लागली. या सांस्कृतिक पुनरुजीवनाचे आद्यप्रवर्तक म्हणजे संत एकनाथ. ज्ञानेश्वरांचं खंडित झालेलं कार्य अधिक उठावदार आणि व्यापक स्वरूपात चालू करून पैठणसारख्या सनातन्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांनी भागवत धर्माची विजयपताका फडकविली. कर्मठांच्या राजधानीत स्त्री- शूद्रांचा कैवार घेऊन त्यांनी देशभाषेचा आवर्जून पुरस्कार केला." (संदर्भ : संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती, लोकवाङ्मय गृह)
अशा या एकनाथांनी उभ्या आयुष्यात कधी जन्मजात भेदभावाला थारा दिला नाही. कार्यनाश होऊ नये म्हणून प्रसंगी नमतं घ्यावं लागलं, तरी त्या काळच्या धर्ममार्तंडांना पुरतं माघारी लोटणाऱ्या नाथांचं उभं आयुष्य समाजमनातील सलोखा जपण्यातच गेलं. त्यांची, तापलेल्या वाळवंटात रडणारं महाराचं मूल कडेवर घेण्याची कथा असो, की ब्राह्मणांआधी अस्पृश्यांना श्राद्धाचं भोजन घालण्याची; त्यांच्या 'शांतिब्रह्म'त्वाच्या तर एकाहून एक कथा रंगवून सांगितल्या गेल्या. पण जयवंत पाटील म्हणाले, "आम्ही नाथांना 'शांतिब्रह्म' म्हणतो हेच मुळात चूक आहे. एकनाथ आपल्या कृतीनं 'क्रांतिब्रह्म' ठरले आहेत." विस्तारभयास्तव त्या सगळ्या कथांची इथं उजळणी करत नाही. पण यानिमित्तानं वाचताना नाथांच्या लोकसंग्रहाच्या गुणाची प्रचिती येत होती. पैठणमध्ये वेगवेगळ्या लोकांशी बोलतानाही तेच जाणवत होतं. 'स्वधर्माचं आचरण कशासाठी करायचं? तर ते लोकसंग्रहासाठी' हेच नाथांच्या भागवतात श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतो...
त्रिभुवनामाजी सर्वथा।
उद्धवा मज नाही कर्तव्यता।
तो मी लोकसंग्रहार्था।
होय वर्तता निजधर्मी ।।
गुरुपरंपरेने दत्तपंथाचे आणि वंशपरंपरेने वारकरी संप्रदायाचे आचरण करणाऱ्या एकनाथांनी विषमता आणि वर्णाभिमान सोडून सगळ्यांना आपलं म्हटलं. याबद्दल प्रा. भगवान काळे म्हणतात, "नाथांच्या या कार्यामुळे जातिभेद दूर सारला जाऊन आध्यात्मिक क्षेत्रात लोकशाही निर्माण झाली. वेदमंत्राला नाममंत्राचा प्रभावी पर्याय देऊन मुक्तीचा सोपा मार्ग बहुजन समाजासाठी खुला केला अन् सर्व जातिधर्मात त्यामुळे संत-महंतांची, सत्पुरुषांची संख्या वाढली. चहुदिशांनी निरक्षरांच्या मुखातून अभंगवाणी, अक्षरगंगा वाहू लागली. मराठी सारस्वतात चमत्कार घडला."
नाथांबद्दल मला आकर्षण वाटण्याचं आणखी एक कारण त्यांचं भाषाप्रभुत्व आणि भाषालालित्य हेही आहेच. संस्कृताचा बडेजाव नाकारत प्राकृतात ग्रंथरचना करण्याचं काम त्यांनी केलं हे खरंच. पण त्यातही वासुदेव, आंधळा, वाघ्या, भुत्या, फकीर, गारुडी, डोलारी, पिंगळा, कोल्हाटी, भट, महार, मुसलमान अशा सगळ्यांच्या भाषांमध्ये त्यांनी काव्यरचना केली. एकाहून एक सरस भारूडं लिहिली. लोकांना शिकवली. गण-गवळणी गाताना स्त्रिया आजही ज्या आनंदाने आणि मनमुक्तपणाने भजनाचा फड रंगवतात, ते पाहून लोकांना आत्मिक आनंद देण्याची किल्ली सापडलेला नाथबाबा हा अभिनवच गुरू त्या काळी होऊन गेला, हेच जाणवत राहतं.
नको फिरू रानी, वनीं तू दुर्धर ।
सोपी आहे वाट, पंढरीची ।।
असं नाथांचे पणजोबा भानुदास महाराजांनी म्हणून ठेवलंच आहे. नाथांनी ती वारीची परंपरा फक्त सुरू ठेवली नाही, तर मराठवाड्याच्या काळ्या वावरात अशी काही जोमानं पिकवली की तिचा बहरलेला पारिजात हरेक अंगणात फुलं परिसू लागला. गोदामायच्या दोन्ही काठानं फुललेल्या या भागवत संप्रदायाचा मळा पुढं झालेल्या संत, महंत, सत्पुरुषांनी तसाच उजवत ठेवला. डॉ. मधुकर क्षीरसागर म्हणतात, "मराठवाड्यात असा एकही पार नाही, जिथं भावार्थ रामायणाचं पारायण झालं नसेल."
संत नामदेवांचा फड, वासकरांचा फड, ठाकूरबुवांचा फड, बंकटस्वामींचा फड, जळगावकरांचा फड, चातुर्मास्ये महाराजांचा फड, अशा कित्येक फडांवरून हरिनामाची दुंदुभी अखंड वाजत राहते. वैकुंठवासी मल्लाप्पा वासकर, बंकटस्वामी, साधू महाराज, रंगनाथ महाराज परभणीकर, मारोतराव महाराज दस्तापूरकर, धुंडा महाराज देगलूरकर, ज्ञानेश्वर माउली चाकरवाडीकर अशा धुरीणांनी गेली शे-दोनशे वर्षं या क्षेत्रात मराठवाड्याचं नेतृत्व केलं.
आजही पैठणहून पंढरपूरला जाणाऱ्या नाथांच्या पालखीमागे खूप साऱ्या दिंड्या चालत असतात. त्यात संत चोखामेळा यांच्या दिंडीचा मान झेंड्याच्या मागे पहिला असतो, असं ह. भ. प. रघुनाथबुवा पालखीवाले यांनी सांगितलं. २०१३ पर्यंत रथाच्या मागे साधारण सहा दिंड्या चालायच्या. आता ही संख्या २७-२८ झालीय. विदर्भातून १५ दिवस आधी निघून पाच दिंड्या पैठणला येऊन नाथ महाराजांबरोबर पुढे चालतात, असे ते म्हणाले.
मुसलमान मंडळींकडून येतो शिधा
नाथांची पालखी मोठ्या शहरांतून जात नाही. लहान-मोठ्या गावांमधून जाते. सगळ्या समाजाचे लोक या दिंडीचं स्वागत करतात. मुस्लिम समाजबांधवही यात मागे राहत नाहीत. रायमोहे गावात मुस्लिम लोक नाथ महाराजांची सेवा करतात. दिंडीला पंढरपूरमध्ये उपयोगाला यावा, म्हणून जो काय शिधा-दाणा लागतो, तो ते पुढं पोहोच करतात. पाटोद्याच्या पुढच्या एका मुक्कामी मुसलमान उत्स्फूर्तपणे नाथ महाराजांचं स्वागत करून अन्नदान करतात. पुढे डिघोळ गावातले हरिजन वस्तीतले लोक सगळ्या दिंडीला जेवू घालतात. त्या अन्नाचं स्वतः नाथवंशज त्यांच्या फडावर जाऊन पूजन करतात. ब्राह्मण, मराठा, वंजारी, हरिजन असा सगळा समाज या दिंडीत सोबत असतो.
पैठणच्या नगरसेविका रेखाताई कुलकर्णी या रघुनाथबुवांच्या थोरल्या भगिनी. त्या भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षही आहेत. त्यांनीही एक आठवण सांगितली. "नाथषष्ठीला महाराष्ट्रभरातून सुमारे १० लाख भाविक पैठणला येतात. गावोगावच्या दिंड्या येतात. या वेळी पैठणच्या मार्गावर ढोरकीनच्या दर्यात एका दिंडीची उतरण्याची सोय केली जाते. ते लोक वारकऱ्यांची सगळी व्यवस्था करतात. पैठणलाही नवनाथ मंदिराजवळ मौलाना दर्गा, सय्यद सादात दर्यात हाच मामला पाहायला मिळतो. नाथांचे वारकरी म्हटल्यावर जातिधर्माची सगळी बंधनं गळून पडताना आम्ही दरवर्षी पाहतो. घरीही आमचे वडील किंवा इतर ज्येष्ठ मंडळी दुर्लक्षित, उपेक्षित समाजातल्या भक्तांना 'भक्तराज' म्हणत."
'पालखीवाले प्रासादा'त रघुनाथबुवा आणि रेखाताईंशी बोलत असताना नाथांच्या देवळात येणारे भाविक, वारकरी येऊन पालखीचं दर्शन घेऊन रघुनाथबुवांना नमस्कार करून जात होते. तोच धागा पकडून रेखाताई म्हणाल्या, "आत्ता येऊन पाया पडून गेलेली एक व्यक्ती तुम्ही पाहिलीत. आता मला माहिती आहे म्हणून; पण तुम्हाला त्यांची जात कळाली का? इतके आम्ही आणि वारकरी एकरूप होऊन गेलो आहोत. हीच समानता आहे. नाथांची हीच शिकवण आहे. आम्ही आमच्या परीने तोच वारसा पुढे चालवतोय."
नारळ आणि प्रसादाचा आंबा देऊन रघुनाथबुवांनी आम्हाला निरोप दिला. पाच वर्षांपूर्वी या वाड्यात आलो होतो, तेव्हा इथलं सालपाळीच्या वादानं तापलेलं वातावरण पाहिलं होतं. ते आठवलं. नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांचे पुत्र पुष्कर महाराज यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं. पण त्यांची आमची वेळ काही दिवसभरात जुळली नाही. पोलिसपाटलांच्या वाड्यावर जयवंतरावांची झालेली भेट तर कायम स्मरणात राहील. परत आल्यावर नाथांचं वाङ्मय पुन्हा चाळलं.
लोकांमध्ये भाबडेपणाने आढळणाऱ्या समजुती आणि येथील सूफी संतांचा ऐतिहासिक कागदपत्रे आणि संदर्भामधून मिळणारा दाखला यात फार तफावत आहे. तसंही आता दर्गे फक्त झाडू-फटके, अंगारे-तोडगे यापुरतेच मर्यादित राहिलेत. त्यामुळे या ठिकाणी त्या सर्व इतिहासाची चर्चा अप्रस्तुत आहे. काही का असेना, दंगेधोपे करण्याऐवजी सगळे समाज सलोख्यानं एकत्र नांदत आहेत. आपापल्या समजुती, श्रद्धा घेऊन आणि परस्परांच्या श्रद्धांचा मान राखून जगत आहेत, हेही नसे थोडके !
- संकेत कुलकर्णी