पणजी : गोव्यात नाताळनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
नाताळ आणि गोवा यांचे अतूट नाते आहे. जगभरातील अनेकांची पावले नाताळ आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याकडे वळतात. सध्या गोव्याचा किनारी भाग अशा जगभरातील पाहुण्यांनी गजबजून गेला आहे. नात्ताळनिमित्ताने मध्यरात्री चर्चमध्ये झालेला घंटानाद आणि उत्साहवर्धक संगीत यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
महिनाभरापासून तयारी
नाताळ जवळ आल्याची चाहूल गोव्यात महिनाभर आधीच लागते. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून नाताळनिमित्ताने सजविण्यात येणारे गोठ्यांचे देखावे, घरांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य, विद्युत रोषणाईचे साहित्य या सर्वांनी गोव्याची बाजारपेठ फुलून गेली आहे. त्याचप्रमाणे नाताळनिमित्ताने अनेक ठिकाणी विशेष मेजवान्यांचेही आयोजन करण्यात आले आहे. येथील किनारी भागात पाठ्यर्थ्यांची धूम सुरू असून, नाताळनिमित्त मध्यरात्रीपर्यंत संगीत वाजवण्यास सरकारने परवानगी दिली आहे.
घरांना रंगरंगोटी
गोव्यात सर्वत्र घरांना रंगरंगोटी करण्यात आल्याने संपूर्ण गोवा सुशोभित दिसत आहे. चर्च आणि घरे रंगीबेरंगी दिव्यांनी सजली आहेत. झगमगणाऱ्या रोषणाईत ख्रिसमस झाडे आणि तारकांची शोभा वेगळीच दिसत आहे. मोठ्या चर्चमध्ये प्रार्थना सभांसाठी तयारी पूर्ण झाली आहे. मध्यरात्रीच्या प्रार्थनेसाठी (मिडनाइट मास) येथे विशेष तयारी करण्यात येते. गोव्यातील समुद्रकिनारेही सणाच्या झगमगाटाने उजळले आहेत. येथे पर्यटकांसाठी लाइव्ह म्युझिक, डान्स शो, फूड फेअर आणि फटाक्यांची आतषबाजी यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.