जगभारत अजमेर शरीफ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याच्या ८१३व्या उरुसाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मुघलिया परंपरेनुसार २५ तोफांच्या सलामीसह ध्वजविधीचा कार्यक्रम धुमधडाक्यात पार पडला. १९४७ पासून चालत आलेल्या परंपरेनुसार यंदाही भारताचे पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय आणि अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आणि भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्याकडे चादर सुपूर्द केली आहे. ही चादर प्रथम निजामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्यात नेण्यात आली आहे. तर आज अजमेरच्या दर्ग्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवलेली ही चादर चढवली जाणार आहे.
२०१४ मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला दहा वेळा चादर अर्पण केली आहे. यंदा अकराव्या वेळी त्यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला चादर पाठवली आहे. गेल्या वर्षी उरुसानिमित्त पंतप्रधान मोदींच्या वतीने तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि जमाल सिद्दीकी यांच्यासह मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शिष्टमंडळाने दर्ग्याला चादर अर्पण केली होती.
ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर उरुसादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते चादर अर्पण करण्याची प्रथा गेल्या अनेक काळापासून सुरू आहे. मात्र यावर्षी पंतप्रधान मोदींनी अजमेर शरीफला चादर पाठवू नये अशी मागणी हिंदू संघटनांनी पत्राद्वारे मोदींकडे केली होती. परंतु असे असले तरीही मोदींनी चादर पाठवण्याचा निर्णय घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवरून या उरुसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. “ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उरूसनिमित्त विनम्र अभिवादन. हा उरुसानिमित्त सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान घेऊन येवो.”
हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्सवरून याबाबत माहिती दिली. “हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या दर्गावर 'चादर' अर्पण करून आशीर्वाद मिळवला. हे आध्यात्मिक स्थान आपल्या सर्वांना विश्वास आणि करुणेची शाश्वत शक्ती देते. त्यांचे आशीर्वाद आपल्याला सेवा, सौहार्दपूर्ण जीवनासाठी मार्गदर्शन करतील” असे त्यांनी म्हटले आहे.
हिंदू सेनेने पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात काय म्हटले आहे
हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे की, चादर पाठवण्यास आपला आक्षेप नाही, मात्र घटनात्मक पदावरील व्यक्तीने चादर पाठवली, तर त्याचा थेट परिणाम कोर्टात सुरु असलेल्या खटल्यावर होईल. त्यामुळेच विष्णू गुप्ता यांनी पत्र पाठवून परिस्थिती निवळत नाही, तोपर्यंत चादर न पाठवण्याची विनंती केली आहे. विष्णू गुप्ता पुढे म्हणतात की, जोपर्यंत अयोध्या प्रकरण कोर्टात सुरू होते, तोपर्यंत पीएम मोदी रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला गेले नव्हते. त्यामुळे आताही त्यांनी प्रकरण कोर्टात असेपर्यंत चादर पाठवू नये.
याबाबत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणतात की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाच्याही दबावाखाली येऊ नये. त्यांना चादर पाठवायची असेल, तर त्यांनी नक्कीच पाठवावी. अजमेर शरीफला फक्त एकाच धर्माचे लोक जात नाहीत. तिथे मुस्लिमांपेक्षा गैर-मुस्लिम जास्त जातात.”
महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंनीही पाठवली चादर
अजमेर दर्गा शरीफ येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा उरुसाला सुरुवात होण्यापूर्वी गेल्या आठवड्यात, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चादर पाठवली होती. खादिम सय्यद जिशान चिश्ती यांच्याकडे ही चादर सुपूर्द करण्यात आली होती.