उत्तर प्रदेशातील अयोध्येत शरयू नदीच्या काठी दिवाळीनिमित्त भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दीपोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यानं नवा विक्रम प्रस्थापित केला असून त्यांची नोंद गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या दीपोत्सवाचे डोळे दिपवणारे फोटो समोर आले आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून अयोध्येती शरयू नदीच्या काठावर दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदा हा दिपोत्सव भव्य स्वरुपात करण्याचा प्रण योगी आदित्यनाथ यांनी केला होता. यानिमित्त २५ लाखांहून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. तसंच यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली.
पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दीपोत्सवाचं कौतुक केलं असून हे सर्वकाही अद्भुत, अतुलनीय आणि अकल्पनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या भव्य-दिव्य दीपोत्सवासाठी अयोध्यावासियांना अनेक शुभेच्छा. लाखो दिव्यांनी रामलल्लाच्या पावन जन्मस्थळावर पार पडलेल्या या सोहळ्यानं सर्वांना भावूक केलं आहे.
अयोध्या धाममधून निघालेला हा प्रकाशपुंज देशभरातील माझ्या कुटुंबियांसाठी नवा जोश, नवी ऊर्जा भरणार आहे. माझी प्रार्थना आहे की भगवान श्रीरामानं समस्त देशवासियांना सुख-समृद्धी आणि यशस्वी जीवनाचा आशीर्वाद प्रदान करावा, असं मोदींनी म्हटलं आहे.
योगींनी द्विट करत वर्ल्ड रेकॉर्डची केली घोषणा
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत अयोध्येतील दिपोत्सवानं नवा विक्रम केल्याची घोषणा केली. त्यांनी म्हटलं की, दीपोत्सव २०२४ च्या मंगल प्रसंगी राममय अयोध्या धाममध्ये २५ लाखांहून अधिक दीप प्रज्वलित करण्यात आले. अशा प्रकारे एकाच वेळी सर्वाधिक पणत्या प्रज्वलित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळं याचा विश्वविक्रमच झाला आहे, याद्वेर सनातन संस्कृतीचा जयघोष करण्यात आला.
त्याचबरोबर आई शरयू नदीच्या काठी एकाच वेळी १,१२१ भाविकांनी नदीची आरती करत देखील विश्वविक्रम केला आहे. यावेळी पूज्य संत आणि धर्माचार्यानी देखील आपला आशीर्वाद दिला.