चराचरांत चैतन्य निर्माण करणाऱ्या गणेशोत्सवाच्या मंगलमय सोहळ्याला सुरुवात होत आहे. सकल सृष्टीचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सजली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी लाडक्या गणरायाच्या प्रतिष्ठापनेची तयारी पूर्ण झाली आहे.
श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी शनिवारी पहाटेपासून मुहूर्त आहे. त्यामुळे नागरिकांनी शुक्रवारीच (ता. ६) गणरायाची मूर्ती घरी घेऊन जाण्यास प्राधान्य दिले. पारंपरिक वेशात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात गणरायाला घरी घेऊन जाणारे आबालवृद्ध, असे चित्र शहरात सर्वत्र दिसत होते. गणरायाच्या मूर्तीसह पूजेसाठी आवश्यक असणारे साहित्य, फुले तसेच सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची रीघ लागली होती. उपनगरातील बाजारपेठांसह मंडई, तुळशीबाग आणि बोहरी आळीचा परिसर सायंकाळी गर्दीने फुलला होता.
सार्वजनिक मंडळांची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक
सार्वजनिक गणेश मंडळांनीही गणेशोत्सवाची जय्यत तयारी केली आहे. आदल्या दिवशी या तयारीवर शेवटचा हात फिरवण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. मिरवणूक काढत श्री गणरायाचे आगमन होणार असल्याने त्यासाठीचे रथ, पालख्या यांच्या सजावटीत सारेच मग्न होते. शहरातील मानाच्या गणपतींसह प्रमुख गणपती मंडळांमध्ये सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. तत्पूर्वी नेहमीच्या मार्गावरून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक निघणार आहे.
ब्रह्ममुहूर्तापासून दुपारपर्यंत मुहूर्त
‘‘श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी शनिवारी ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४.५० वाजेपासून दुपारी १.५१ वाजेपर्यंत मुहूर्त आहे. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, वार, योग, विष्टिकरण (भद्रा) तसेच राहूकाल वर्ज्य नाही. कोणतीही कोष्टके पाहण्याची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्हानंतरही करता येऊ शकेल’’, अशी माहिती ‘दाते पंचागकर्ते’ मोहन दाते यांनी दिली.
यंदा गणेशोत्सव ११ दिवसांचा : दाते
‘‘१७ सप्टेंबरला, मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. हा गणेश स्थापनेपासून ११वा दिवस असल्याने ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जाते, त्यांच्याकडे यंदा ११ दिवसांचा गणेशोत्सव असेल. आपल्याकडे जेवढ्या दिवसांचा गणेशोत्सव असेल तेवढे दिवस रोज श्रीगणेशाची सकाळी आणि संध्याकाळी पूजा, आरती अवश्य करावी. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते पाण्यामध्ये करावे असे धर्मशास्त्र सांगते. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून, पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र कृत्रिम तलावामध्ये, घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी,’’ असे मोहन दाते यांनी सांगितले.
यंदाच्या गणेशोत्सवातील महत्त्वाचे दिवस
७ सप्टेंबर - श्रीगणेश चतुर्थी
१० सप्टेंबर - गौरी आवाहन
११ सप्टेंबर - गौरी पूजन
१२ सप्टेंबर - गौरी विसर्जन
१७ सप्टेंबर - अनंत चतुर्दशी
पुणे शहरात घरगुती व गणेशोत्सव मंडळांकडून गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असतानाच, महापालिकाही बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. शहरातील स्वच्छता, विसर्जन घाट, हौद आदी सोई-सुविधांची तयारी महापालिकेने पूर्ण केली आहे.
शहरात गणेशोत्सव अधिकाधिक चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी महापालिका प्रशासनाकडूनही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येतात. महापालिकेच्या विविध विभागांसह क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर सोई-सुविधा देण्यात आल्या आहेत.
नदीकाठच्या परिसरातील विसर्जन
घाटांवरील दुरुस्ती, रंगरंगोटी, लोखंडी टाक्या, निर्माल्य कलश, विसर्जन हौद, विसर्जन घाटावरील विद्युत व्यवस्था, कचरा वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले आहे. सार्वजनिक स्वच्छता, विसर्जन मिरवणूक मार्गावरील स्वच्छता, कीटकनाशक फवारणी, अग्निशामक दलाकडून जीवरक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा, जनरेटर व्यवस्था, ध्वनीक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी, मलवाहिन्यांची गळती दुरुस्त करण्यावर भर देण्यात आला आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून शहरातील १७ विसर्जन घाटांवर व्यवस्था करण्यात आली आहे. संगम घाट, वृद्धेश्वर घाट, बापू घाट (नारायण पेठ), विठ्ठल मंदिर (टिळक चौक), ठोसरपागा घाट, राजाराम पूल घाट, चिमा उद्यान येरवडा, वारजे, कर्वेनगर, ओंकारेश्वर, पुलाची वाडी, खंडुजीबाबा चौक, गरवारे महाविद्यालयामागील बाजू, दत्तवाडी घाट, औंधगाव घाट, बंडगार्डन घाट, पांचाळेश्वर घाट या विसर्जन घाटांवर व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबरच महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील शाळा, मैदाने व सार्वजनिक ठिकाणी विसर्जनासाठी लोखंडी टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -