पुण्याच्या मंडईमध्ये १२० वर्षांपासून पूजा साहित्याचा व्यवसाय करणारे आतार कुटुंबीय

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 5 d ago
जमीर आतार आणि त्यांचे राज सुगंधी
जमीर आतार आणि त्यांचे राज सुगंधी

 

प्रज्ञा शिंदे

 

गणपती म्हटलं की सर्वांच्या मनात येतो, तो पुण्याचा गणेशोत्सव. यामध्ये प्रमुख दोन कारणे आहेत- सर्वात पहिलं कारण म्हणजे, सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातून झाली आणि दुसरं म्हणजे पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण पाच मानाचे गणपती आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा…

संपूर्ण महाराष्ट्रातून या गणपतींची आरास आणि देखावे पाहण्यासाठी लोक पुण्यात येत असतात. आलेले हे पाहुणे फक्त गणपतीच पाहत नाही तर ते खिळून राहतात पुण्याच्या प्रसिद्ध मंडईत. कारण या ऐतिहासिक मंडईमध्ये, अगदी पालेभाज्यांपासून साज शृंगारापर्यंत सर्व प्रकाच्या वस्तू मिळतात. वस्तूंमधील या विविधतेप्रमाणेच इथे पाहायला मिळते ती सामाजिक एकताही.

गणेशोत्सवातील सामाजिक सौहार्द आणि धार्मिक एकतेचाच वारसा मंडईतील जमीर आतार आणि कुटुंबीय एक शतकापासून जपत आहे. जाणून घेवूयात आतार कुटुंबियांच्या रूपाने पुण्यातील  धार्मिक सौहार्दाची ही अनोखी कहाणी...

पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले मंडई ही शहरातील व्यापारिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य अंग आहे.  इथे असंख्य दुकाने आणि शेकडो ग्राहक यांची कायम रेलचेल असते. गणपतीमध्ये तर इथे पाय ठेवायलाही जागा नसते. या मंडई चौकात आल्यानंतर, डाव्याबाजूला आणि फळांच्या दुकानाच्या अगदी समोर ‘राज सुगंधी’ नावाने सजावटींच्या वस्तूचे एक दुकान आहे. सर्व सणांसाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य याठिकाणी उपलब्ध असते.

 

 

१९०५ मध्ये सुरु केलेले हे दुकान आता १२० व्या वर्षात पदार्पण करत आहे. एक कटुंब गेल्या सहा पिढ्या हा परंपरागत व्यवसाय चालवत आहे. व्यवसायाच्या रुपानं हे कुटुंब पिढ्यान -पिढ्या  सामाजिक सौहार्दही जपत आहेत. हे कुटुंब आहे जमीर आतार यांचं! या व्यवसायाची सुरुवात कशी झाली आणि अजूनही सौहार्दाची ही परंपरा धार्मिक आतार कुटुंबाने कशी टिकवली, याविषयी  जमीर आतार यांनी ‘आवाज मराठी’शी दिलखुलास संवाद साधला. 

राज सुगंधीचे मालक जमीर आतार सांगतात, “आमच्या गेल्या पाच पिढ्या या व्यवसायात आहे. ज्याकाळी दळण-वळणाच्या काहीच सुविधा नव्हत्या, त्याकाळी आमच्या आजोबांची आजी हळदी- कुंकू टोपल्यात घेवून इथे बसायची.” 

पुढे ते म्हणतात, “आम्ही जरी मुस्लीम असलो; तरी हिंदू- मुस्लीम या धर्माच्या गोष्टी कधीच आमच्या व्यवसायात आणि माणुसकीत अडथळा म्हणून आल्या नाहीत.मी स्वतः ४० वर्षांपासून या व्यवसायात आहे. गणेशोत्सवाने जो सामाजिक सौहार्दाचा, एकत्रितपणे सण उत्सव साजरा करण्याचा आणि एकतेचा पायंडा पाडलाय तोच आम्ही पुढे चालवत आहोत.”

भारत देशात पूर्वीपासून सणउत्सव एकत्र साजरे करण्याची परंपरा आहे. या माध्यमातून सर्व जातीधर्मातील लोक एकत्र येत सामाजिक एकता जपत असतात. याच धर्मिक सलोख्याबद्दल सांगताना आतार म्हणतात, “महाराष्ट्रात धार्मिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न होत आहे. आपल्या भारताची सर्वधर्मसमभावाची, एकमेकांचा आदर करण्याची परंपरा आहे. त्याचे वारसदार बनून आपण एकता जोपासली पाहिजे.”

 

पुण्यातील गणेशोत्सवाबद्दल बोलताना ते म्हणतात, “पुण्यातील गणपती उत्सवात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात. गणपती मंडळामध्येही धार्मिक एकता आणि सामाजिक सौहार्द अनुभवता येते. संपूर्ण महाराष्ट्रातून इथे लोक येतात आणि १० दिवसहा उत्सव अगदी आनंदात पार पडत असतो, त्यामुळे फार समाधान मिळतं.” 

जमीर आतार हे स्वतः शारदा गणपती मंडळाचे चाळीस वर्षांपासून कार्यकर्ते आहेत. परंपरागत मंडई गणपतीच्या सेवेत ते सदैव कार्यरत असतात. दरवर्षी मंडई गणपतीच्या मिरवणुकीवेळी आतार कुटुंबाकडून एक मोठी अगरबत्ती गणपतीच्या सेवेत अर्पण केली जाते. ही अगरबत्ती चौदा तास तेवत राहते आणि माहौल सुगंधी करत राहते. 
 

 

 

आतार सांगतात, त्यांचे अनेक गिऱ्हाईक वर्षानुवर्षे त्यांच्याकडूनच सणाच्या सजावटीच्या वस्तू घेतात. पुढे ते म्हणतात, “हे गिऱ्हाईक जसं पिढ्यानपिढ्या आमच्याकडेच येत आहेत, तसंच आम्ही सुद्धा हा परंपरागत व्यवसाय आणि नाते सुरूचठेवले आहे.” 

सध्या तरुण पिढी अनेक धार्मिक अफवांना आणि गैरसमजांना बळी पडत आहे. परिणामी  भावी पिढीत परधर्मियांविषयी द्वेष वाढत आहे. जमीर आतार म्हणतात, “घराबाहेर पडताना किंवा समाजात वावरताना, सगळ्यांनी आपली जात-धर्म घरात ठेवून, उंबरठ्याबाहेर पडलं पाहिजे. मानवता धर्म हा सगळ्यात मोठा आहे. हे लक्षात ठेवलं पहिजे. भारतात सर्व धर्मांचे लोक राहतात, त्यामुळे परस्परांचा आणि त्यांच्या धर्मांचा आपण आदरच केला पाहिजे. त्यातच देशाचे हित आहे.”

जमीर आतार आणि त्यांचे कुटुंब देशातील  सांस्कृतिक आणि धार्मिक सौहार्दाचे जिवंत उदाहरण आहे. पिढ्यानपिढ्या उत्तम सुरु असलेला त्यांचा व्यवसाय ‘मुस्लिमांकडून सामान खरेदी करू नका’ असे फतवे काढणाऱ्यांच्या तोंडावर हिंदू भाविकांनी मारलेली सणसणीत चपराक आहे. एकमेकांना सोबत घेऊन चालणारा हाच खरा भारत आहे.  

आतार यांच्या परंपरागत व्यवसायात फक्त वस्तूंची विक्री होत नाही तर माणुसकीची आणि एकतेची जपणूकही होत आहे. जेव्हा धर्माच्या नावावर तणाव निर्माण होतो, तेव्हा अशा व्यक्तींमुळे समाजात सौहार्दाची बीजे रुजतात. आतार कुटुंबाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकता आणि सहिष्णुतेचा संदेश देत, हिंदू-मुस्लीम असे विभाजन न करता, एकत्र सण साजरे करण्याची परंपरा पुढे चालवली आहे. 

गणेशोत्सवासारख्या सणांतून सामाजिक एकतेची अशी अनेक उदाहरणे नजरेस पडतात.  भारताच्या विविधतेतील एकतेची ही मूर्तिमंत उदाहरणे आहेत. . ती जपली जावीत आणि आणखी भरभराटीस यावीत यसाठी आवाज मराठीकडून आतार कुटुंबियांना आणि त्यांच्या या कार्याला शुभेच्छा!

-प्रज्ञा शिंदे 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter