गुवाहाटीतील 'श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र' मैदानावर पार पडलेल्या ‘झिकीर गाव आहक’ कार्यक्रमातील खास क्षण
गुवाहाटी येथील 'श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र' मैदानावर नुकताच सौहार्द आणि बंधुभावाचा दुर्मीळ क्षण अनुभवायला मिळाला. याठिकाणी सुमारे एक हजारहून अधिक हिंदू-मुस्लिम कलाकारांनी एकत्र येत झिकीर (आसामी संस्कृतीतील इस्लामी भक्तीगीत) सादर केले. ‘मोर मनात भेदभाव नाय ओ अल्लाह’ (माझ्या मनात भेदभाव नाही, हे अल्लाह) या झिकीरच्या ओळींप्रमाणेच येथील वातावरण आसामी मुस्लिम समाजातील सलोख्याचा संदेश देणारे होते.
आसाममधील सामाजिक-सांस्कृतिक संघटना असलेल्या अखिल आसाम गोरिया परिषदेने ९ एप्रिलला ‘झिकीर गाव आहक’ (चला झिकीर करूया) या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील विविध भागांतून आलेल्या एक हजारहून अधिक कलाकारांनी एका सुरात ‘मोर मनात भेदभाव नाय ओ अल्लाह’ हे गीत गायले आणि हा ऐतिहासिक क्षण साजरा केला.
या कार्यक्रमासोबतच राज्यस्तरीय झिकीर-झारी गायन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. अखिल आसाम गोरिया परिषदेचे अध्यक्ष अब्दुल हमीद म्हणाले, “आम्हाला उपक्रमाचा अभिमान आहे. सादिया ते धुब्रीपर्यंतच्या कलाकारांनी आज येथे येऊन असे सौहार्दाचे वातावरण निर्माण केले. त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. सतराव्या शतकातील संत अझान पीर यांनी लिहिलेले झिकीर हळूहळू आपल्या समाजातून लुप्त होत आहे. येत्या काळात आम्ही आसाम सरकारकडे बिहू आणि झुमोइर नृत्यांप्रमाणेच झिकीर सादरीकरणाचा जागतिक विक्रम नोंदवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करू. नव्या पिढीपर्यंत झिकीरचा प्रसार आणि प्रचार करण्याचा हा एकमेव मार्ग आहे.”
ते पुढे म्हणाले, “अझान फकिर यांचे झिकीर आणि झारी टिकले तरच आसामिया मुस्लिमांचे अस्तित्व टिकेल. झिकीर आणि झारी ही आसामिया मुस्लिमांची ओळख आहे. आसामच्या लोकपरंपरेतील ही गीते हळूहळू सामाजिक जीवनातून नाहीशी होत आहेत. त्यामुळे झिकीर-झारी जिवंत ठेवण्यासाठी ‘झिकीर गाव आहक’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मी आज सर्व आसामिया मुस्लिमांना आवाहन करतो की, ईद मिलन आणि अशा इतर आयोजित कार्यक्रमांमध्ये झिकीर गायन अनिवार्य करावे. इतर गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपूर्वी झिकीर सादर करावे.”
हा कार्यक्रम अखिल आसाम गोरिया जातीय परिषद, सादौ आसाम सय्यद कल्याण न्यास आणि सादौ आसाम गोरिया-मोरिया जातीय परिषद यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला, असे हमीद यांनी सांगितले. अखिल आसाम गोरिया परिषदेचे सरचिटणीस रहमसा अली यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “झिकीर गाव आहक कार्यक्रमात सर्व जाती, धर्म आणि भाषांमधील कलाकारांनी सहभाग घेतला. या उपक्रमांसाठी समाजातील विविध संघटना आणि हितचिंतकांचे बहुमोल सहकार्य मिळाले.”
प्रसिद्ध विनोदवीर आणि झिकीर कलाकार बुलबुल हुसेन उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, “आम्ही अनेक वर्षांपासून झिकीर आणि त्यासारखी गीते गात आलो आहोत. या कार्यक्रमात सहभागी होऊन मला आनंद झाला. १९८७ मध्ये मी ‘मोर मनात भेदभाव नाय ओ अल्लाह’ हे गीत गाऊन आसाम संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. अखिल असम गोरिया परिषदेच्या पुढाकाराने आज आयोजित हा सुंदर कार्यक्रम खरोखर कौतुकास्पद आहे."
ते पुढे म्हणाल्या, "येथे हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र झिकीर सादर केले, असे दृश्य मी यापूर्वी कधी पाहिले नाही. भविष्यातही आपण अशा सलोख्याचा आणि सौहार्दाचा आदर्श टिकवावा अशी माझी इच्छा आहे. यामुळे आपली नवी पिढी झिकीर-झारी, बिया नाम, आई नाम, धाई नाम यांसारख्या आपल्या संस्कृतीच्या अविभाज्य घटकांबद्दल जाणून घेईल.”
प्रसिद्ध गायक नेकिब अहमद हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, “या कार्यक्रमाला उपस्थित राहून मी खूप आनंदी आहे. बिहूच्या पूर्वसंध्येला अशा कार्यक्रमातून सलोखा आणि एकतेचा संदेश जातो. काल येथे बिहू आणि झिकीरच्या तालमी एकाच वेळी सुरू होत्या. अखिल आसाम गोरिया परिषदेने अशा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न केले. तसेच सर्व सहभागी, कलाकार मंडळी आणि संघटनांचेही मी आभार मानतो.”
झिकीरवर पीएचडी मिळवलेले डॉ. भुबनेश्वर डेका म्हणाले, “झिकीर हा शब्द अरबी ‘झिक्र’मधून आला आहे. याचा अर्थ आहे नामस्मरण करणे. अझान पीर आसाममध्ये आले त्यावेळी त्यांनी श्रीमंत शंकरदेव यांना सलोख्याचा संदेश देत आसामिया समाजाला सोबत घेऊन जाताना पाहिले. त्यांनी नव-वैष्णव संत सुधारकांच्या आदर्शांवरून प्रेरणा घेत काही बदलांसह झिकीर गीते रचली. झिकीर गीते अनेक पिढ्यांपासून फक्त तोंडी परंपरेने पुढे गेली. रेकिबुद्दीन अहमद यांनी अनेक झिकीर योग्य स्वरात गाऊन आपल्यासमोर आणली. जर आपण मनापासून झिकीर स्वीकारले, तर कुराण आणि हदीस वाचण्याची गरज नाही. कुराण आणि हदीसमधील सर्व काही झिकीरमध्ये आहे.”
ते पुढे म्हणाले, “सादर केलेले गीत एकता आणि बंधुभावाची भावना जागृत करेल. हे गीत मनापासून गायल्यानंतर कोणाच्याही मनात द्वेष राहू शकत नाही. सर्वांना समान वागणूक देणारेच खरे मुस्लिम. इथे उपस्थित राहून मला फार आनंद झाला. आसाम सरकारने हा उपक्रम राबवायला हवा होता. मात्र अखिल आसाम गोरिया परिषदेने आज या कार्यक्रमाद्वारे ते काम केले. मी यानिमित्ताने अखिल आसाम गोरिया परिषदेचे आभार मानतो. सर्वात सुखावणारी बाब म्हणजे हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन झिकीर गायन केले. याहून सुंदर काही असूच शकत नाही. शंकर-आझान शिकवण पुढे घेऊन गेलो तर कोणीही आपल्यात भेदभाव आणि द्वेषाचे बीज पेरू शकणार नाही.”