गणपती बाप्पाला साजशृंगार करणारा नाशिकचा अस्लम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
नाशिक : बाप्पाच्या मूर्तीस फेटा बांधताना असलम सय्यद
नाशिक : बाप्पाच्या मूर्तीस फेटा बांधताना असलम सय्यद

 

धार्मिक सौहार्द बिघडवणाऱ्या घटनांचे प्रमाण हल्ली वाढताना दिसत असले तरी एकमेकांच्या धर्माविषयी आदर आणि प्रेम असलेल्यांची संख्याही समाजात कायमच जास्त राहिलेली आहे. ही मंडळी आपल्या कृतीतून कळत नकळतपणे धार्मिक सौहार्दाचे दर्शन घडवत असतात. याचेच एक उदाहरण गणेशोत्सवानिमित्त नाशकात पाहायला मिळत आहे. 

नाशकात राहणारा अस्लम सय्यद विवाह सोहळे, राजकीय, सामाजिक, शासकीय कार्यक्रम यांमध्ये मान्यवरांना फेटे बांधण्याचे काम करतो. त्याच्या कुटुंबातील चार भाऊ आणि वडील असे पाच जण गेल्या अनेक वर्षांपासून फेटे बांधण्याचे काम करत आहेत. या व्यवसायातून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.  

तीन वर्षांपूर्वी अस्लमच्या एका मित्राने गणेशोत्सवात बाप्पाची स्थापना करण्यासाठी डोंगरी मैदान येथे मूर्ती खरेदी केली. त्या मूर्तीस अस्लम यास फेटा बांधून देण्यासाठी त्याने सांगितले. अवघ्या काही मिनिटात अस्लमने आकर्षक फेटा बांधला. त्याची कला पाहून सभोवतालचे गणपती स्टॉलधारक थक्क झाले. तेव्हापासून दरवर्षी तेथील विविध स्टॉलधारक अस्लमला बाप्पाच्या मूर्तीस फेटा बांधण्यासाठी बोलवतात. यंदाही डोंगरी मैदान येथे अस्लमने बाप्पांच्या विविध मूर्त्यांना फेटे बांधून दिले. गेल्या तीन वर्षांपासून तो हे काम उत्साहाने करत आहे. 
 
नाशकातील डोंगरी मैदान, हिरावाडी, ठक्कर डोम अशा विविध भागांत गणेश मूर्तींचे स्टॉल लागलेले असतात. तेथील मुर्त्यांना अस्लमकडून दरवर्षी फेटे बांधण्यात येतात. यावर्षी तर केवळ एकाच दिवसात त्याने तब्बल ३०० मूर्त्यांना फेटे बांधून दिले. बाप्पाच्या मूर्तीस अस्लमच्या फेट्याचा साज लागल्याने मुर्त्या अधिक आकर्षित वाटतात. त्याच्या या कलेचे हिंदू-मुस्लिम बांधवांकडून सर्वत्र कौतुक होते. 

पेशवाई, जिरे, कोल्हापुरी, महाराष्ट्रीयन, राजस्थानी, पगडी असे विविध प्रकारचे फेटे बांधणारा अस्लम सांगतो, “मी फेटा बांधलेल्या बाप्पाच्या मुर्त्या शहराच्या विविध भागात घरोघरी स्थापित होतात. याचा मला विशेष आनंद आणि समाधान आहे. श्रद्धेत आणि आनंदात कुठलीही जात-पात नसते. स्वतःसह इतरांचा आनंद यात सर्व काही आहे. याच हेतूतून बाप्पाच्या मूर्तीस फेटे बांधण्याचे मी काम करतो.” 

अस्लमसारखा तरुण आपल्या कला आणि कौशल्याच्या सहाय्याने सलोखा टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलेले त्याचे हे कार्य हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. 

- युनुस शेख, नाशिक  
 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻

 
 
 




 
 
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -