हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आशापीर बाबा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 24 d ago
आशापीर बाबा देवस्थान
आशापीर बाबा देवस्थान

 

भारतात इस्लामचे आगमन प्रेषित मुहम्मदांच्या काळातच सुफी संतासोबत झाले. देशातील खेड्यापाड्यांमध्ये हे सुफी संत पसरले व समता, मानवता आणि प्रेम यांची शिकवण देऊ लागेल. बहुतांश संत त्या त्या गावीच स्थायिक झाले, आणि तिथेच समाधिस्थ झाले. आपल्या जीवनकाळातच हे संत त्या त्या ग्रामीण संस्कृतीचा भाग बनून गेले. बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजानेही त्यांना भरपूर आदर आणि प्रेम दिले. सुफी संतांच्या निधनानंतर त्याच्या खानकाहमध्ये म्हणजे आश्रमातच त्यांची समाधी बांधली जाते. तिलाच दरगाह असे म्हटले जाते. 

मृत्यूनंतर सुफी संतांचे ईश्वराशी मिलन होते असे मानले जाते. त्यामुळेच सुफी संतांच्या पुण्यतिथीचा दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो. त्याला उर्स असे म्हणत. अपभ्रंश होऊन त्याचा उच्चार उरूस असा केला गेला. "उरुस" हा शब्द 'महफिल ए समा' मधील शेवटच्या नृत्यासाठी वापरला जातो. पुढे या सोहळ्यात अनेक बदल होत गेले. त्याला हिंदू देवस्थानाच्या जत्रांचे स्वरुप प्राप्त झाले. अशाच काही सुफी संतांच्या उरूसांची आणि त्यामुळे तिथे होणाऱ्या हिंदू-मुस्लीम सांस्कृतिक मिलाफाच्या कहाण्या आवाज मराठी  वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात.  नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या आशापीर बाबा (आश्‍वीनाथ महाराज) दर्ग्याचा उरूस सध्या सुरु आहे. त्याविषयीचा हा रिपोर्ट...

हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान आणि नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या निसर्गरम्य टेकडीवर आशापीर बाबा दर्ग्याचा उरूस तिसऱ्या श्रावण गुरुवारी म्हणजेच आज सुरू झाला. घोटेवाडी, निऱ्हाळे व संगमनेर तालुक्यातील पारेगाव या गावांच्या सीमेवर असलेल्या टेकडीवर आशापीर देवस्थान आहे. या दर्ग्याची जागृत दरगाह म्हणून सर्वदूर ख्याती आहे. दरवर्षी या ठिकाणी उरूसासाठी हजारो हिंदू-मुस्लिम बांधव दर्शनासाठी येतात. शिवाय वर्षभर या ठिकाणी भाविकांची वर्दळ असते.

मुस्लिम बांधव पाळतात श्रावण 
श्रावण महिन्यातील तिसरा गुरुवार हा आशापीरचा उरूसचा  दिवस. हिंदू-मुस्लिम भाविक नवसपूर्तीसाठी या ठिकाणी वर्षभर बोकडाची कुर्बानी देतात. मात्र, श्रावण महिन्यात तसेच हिंदूं बांधवांच्या पवित्र सणांच्या वेळी मुस्लिम बांधव या ठिकाणी मांसाहाराचा नैवेद्य दाखवत नाहीत. या कृतीतून मुस्लिम बांधव सामाजिक आणि धार्मिक सलोखा जपण्याचे काम करतात. आशापीर बाबा यांना उरूसच्या दिवशी केवळ गोड भात, गुळपोळी आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो. 

उरूसाच्या पार्श्वभूमीवर राज्य महामंडळाकडून विशेष गाड्यांची सोय  
आशापीर बाबा यांचा उरूस परिसरातील सर्वात मोठा उरूस आहे. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर आणि संगमनेर आगारामार्फत संगमनेर या ठिकाणाहून दिवसभर विशेष बस गाड्या सोडण्यात येतात. आशापीर बाबा देवस्थान आणि उरूस संगमनेर तालुक्याच्या हद्दीत येत असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस आणि  प्रशासकीय यंत्रणा उरूसच्या वेळी कार्यरत असतात. 

महाराष्ट्रसोबतच शेजारच्या राज्यातून देखील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात. उरूसच्या दिवशी आशापीरचा संपूर्ण डोंगर भाविक आणि गाड्यांनी फुलून जातो. उरूसच्या दिवशी किमान दोन ते अडीच लाख भाविक या गडावर उपस्थित असतात. घोटेवाडी पारेगाव येथील पारंपारिक तकतराव (सजविलेले रथ) मंदिराभोवती मिरवण्यात येतात. 

हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र करतात पूजा 
आशापीर बाबा येथे हिंदू बांधव हिंदू धर्म परंपरेनुसार, तर मुस्लिम बांधव त्यांच्या धार्मिक पद्धतीने नुसार पूजाविधी करतात. पूजा विधीच्या वेळी दोनही समाज बांधव एकत्र उपस्थित असतात.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter