काश्मीरच्या समृद्ध लोककला आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अनोखा संगम पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळाला. ‘सरहद, पुणे’ आणि ‘महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कं.लि.’ यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात ‘अजमते-ए-काश्मीर’ या १३व्या काश्मीर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, संगीत, काश्मिरी लोककला आणि पारंपरिक वाद्यांच्या सादरीकरणाने रंगतदार ठरलेल्या या महोत्सवात रसिकांनी भरभरून आनंद लुटला. तीन तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या कार्यक्रमात काश्मिरी शहनाई वादनाने सुरुवात झाली. पारंपरिक काश्मिरी ढोलक आणि शहनाईच्या सुरावटीत ‘सारे जहाँ से अच्छा’ या गीताची विशेष झलक रसिकांनी अनुभवली.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कं.लि.चे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉ. संजीवकुमार शर्मा, मुख्य अभियंता अनिल कोळप, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
काश्मिरी आणि मराठी संस्कृतीची जुगलबंदी
या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका शमिमा अख्तर यांच्या सुरेल गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांनी पारंपरिक काश्मिरी गीते, भजन, तसेच मराठी अभंग ‘माझे माहेर पंढरी’ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. काश्मिरी नृत्य, लोकगीते आणि नाटिकांच्या अनोख्या सादरीकरणामुळे या महोत्सवाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. काश्मिरी ‘रौफ’ नृत्य, संतूर, रबाब आणि ठुमर नारी यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. याशिवाय,सरहद शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक गीतांवर बहारदार नृत्य सादर केले. महाराष्ट्र आणि काश्मीरच्या नृत्य-गायन संस्कृतीचा मिलाफ रसिकांसाठी खास आकर्षण ठरला.
काश्मिरी नाटिकेच्या सादरीकरणाने भावविभोर वातावरण
काश्मिरी कलाकारांनी इंग्रजांच्या राजवटीला विरोध करणाऱ्या काश्मिरी जनतेच्या संघर्षावर आधारित नाटिका सादर केली. भाषेतील फरक असूनही रसिकांनी कलेच्या सादरीकरणातून त्या नाटिकेचा गहिरा आशय अनुभवला.
काश्मिरी भांड पथकाने केला समारोप
कार्यक्रमाची सांगता भांड पथकाच्या नृत्यसादरीकरणाने झाली. झगमगत्या पारंपरिक पोशाखात काश्मिरी कलाकारांनी गीतांसह लोकनृत्य सादर केले. काश्मिरी वाद्यांच्या तालावर पुणेकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सांची मोरे आणि श्वेता जाधव यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. पुणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अनोख्या काश्मीर-महाराष्ट्र सांस्कृतिक मिलाफाचा मनमुराद आनंद लुटला.