अहमद हुसेन व मोहम्मद हुसेन : गझल गायकीतील दोन तेजस्वी तारे
Story by Chhaya Kavire | Published by Chhaya Kavire • 10 Months ago
अहमद हुसेन व मोहम्मद हुसेन
राजस्थान आपल्या संस्कृती आणि कलेसाठी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहे. इथली संगीत परंपरा भारतीय शास्त्रीय संगीताची उज्ज्वल परंपरा समर्थपणे पुढे घेऊन जाणारी आहे. जयपूरचे अहमद हुसेन आणि मोहम्मद हुसेन हे बंधु आपल्या गझलगायकीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. राजस्थानातील प्रसिद्ध गझल आणि ठुमरी गायक उस्ताद अफजल हुसैन यांच्या घरी फेब्रुवारी १९५१ मध्ये अहमद आणि डिसेंबर १९५३ मध्ये मोहम्मद यांचा जन्म झाला.
१९५९ मध्ये जयपूरच्या आकाशवाणीवरुन दोन्ही भावांनी गायनाच्या कारकिर्दीला सुरवात केली. आज गझल जगतात उस्ताद अहमद आणि मोहम्मद हुसेन यांची नावं मोठ्या आदराने घेतली जातात. आजवर या दोघांचे ५० हून अधिक अल्बम रिलीज झालेत. १९७० मध्ये आलेला 'गुलदस्ता' पहिला अल्बम प्रचंड लोकप्रिय ठरला. त्याविषयी हुसेन बंधू सांगतात की, "या अल्बममधील 'मैं हवा हूँ कहाँ वतन मेरा' ही गझल लोकांना खूप आवडली. हा अल्बम इतका लोकप्रिय झाला की आम्हाला मागे वळून पाहायची कधी गरजच भासली नाही." हुसेन बंधूंना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. गझलगायकीतील योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकारने या दोन्ही कलाकारांचा पद्मश्री पुरस्कारने सन्मान केला. अहमद हुसेन आणि मोहम्मद हुसेन यांच्या आवाजाला 'आवाज मराठी'चा सलाम!
गझल गायकीसाठी पद्मश्री मिळवणाऱ्या हुसेन बंधूंविषयी जाणून घ्या या विशेष व्हिडिओतून