छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'जय शिवाजी, जय भारत' पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेचा प्रारंभ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणेच्या वसतिगृह मैदानापासून झाला.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिपादन केले. ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार, अठरापगड जातींना सोबत घेऊन सामान्य माणसाच्या कल्याणाकरिता, महिलांच्या कल्याणाचा, सन्मानाचा विचार आपणदेखील आपल्या जीवनामध्ये स्वीकारणार आहोत हा संकल्प युवकांनी करावा. यासाठी ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा उपक्रम उपयुक्त ठरेल."
ते पुढे म्हणाले, "ज्यावेळी भारतात अनाचार, अंधकार होता आणि भारतातील अनेक राजे-रजवाडे मुघलांचे मांडलिकत्व पत्करायला उत्सुक होते, मुघलांच्या अधिपत्याखाली काम करीत होते. अशा वेळी जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या सामान्य मावळ्यांना एकत्र करून त्यांना रयतेचे राज्य तयार करण्यासाठी लढाई करण्याची प्रेरणा दिली."
केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी देखील आपले विचार मांडले. ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाच्या स्वाभिमानासाठी कसे लढता येते, आदर्श शासन कसे चालवता येते, देशाच्या सन्मानासाठी मान न झुकविता कसे लढता येऊ शकते हा वारसा दिला आहे."
ते पुढे म्हणतात, "शिवाजी महाराजांनी एक आदर्श लोकशाही व्यवस्था, अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून दिली होती. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक विकास कसा करता येऊ शकतो हे दाखवून दिले. त्याचप्रमाणे आपली लोकशाही आणि संविधानाचे जतन करण्यासाठी आणि देशाला वैभवाच्या उच्च स्थानी नेण्यासाठी आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी यासाठी ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे."