महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोहरमचा सण पाळला जातो. ताजीये, पंजे बसतात, मिरवणुका निघतात. यात हिंदूंचा लक्षणीय सहभाग असतो. प्रत्येक शहराची मोहरमची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. यातून मराठी संस्कृती आणि मोहरम यांचे विशेष नाते तयार झाले. यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील मोहर्रमची माहिती देणारा हा लेख...
छत्रपती संभाजीनगर :
हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन हे मानवता, त्याग, बलिदान आणि शांतीचे प्रतीक आहेत. त्यांनी अन्याय, अत्याचाराविरुद्ध आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. त्यांचा मानवतेचा महान संदेश जगासाठी अतिशय मोलाचा आहे. मोहर्रम महिन्याच्या दहा तारखेला ‘आशुरा’ असतो. हजरत इमाम हुसैन यांचा करबलाच्या युद्धातील हा बलिदान दिन. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोहर्रम महिन्यात छत्रपती संभाजीनगरमधील शिया बांधवांतर्फे मजलिसचे आयोजन करून दहा मोहर्रम (आशुरा) या दिवशी मातमी जुलूस काढला जातो. शिया समाजाच्या या मजलिस व मातमी जुलूसला शहरात ४०० वर्षांचा इतिहास आहे.
शिया समाजातर्फे अंजुमन खादीमूल मासूमीनचे अध्यक्ष एजाज अली जैदी यांनी माहिती दिली, की मलिक अंबरच्या काळापासून म्हणजेच आदिलशाहीपासून छत्रपती संभाजीनगर शहरात शिया समाजाचे वास्तव्य आहे. देशात लखनौ येथे शिया समाजाचे मरकज (केंद्र) आहे. लखनौ, काश्मीर, हैदराबाद, मुंबईनंतर, पुणे येथे शिया समाजाची संख्या लक्षणीय आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर शहर शिया समाजासाठी महत्त्वाचे आहे. शहरातील बुढीलाईन भागातील आशुरखाना ‘जानी अमानी’ हा ऐतिहासिक मानला जातो. या आशुरखान्याचे संस्थापक जानी अमानी आहेत.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात दिवाण देवडी येथील ‘आशुरखाना’ व शिया समाजाच्या अंजुमन खादिमुल मासुमिनच्या माध्यमातून शहरात मातमी जुलूसची परंपरा आजतागायत कायम आहे. मोहर्रम महिना मिळून संपूर्ण २ महिने ८ दिवस ‘मजलिस’चे आयोजन केले जाते. यामध्ये ‘शहादतनामा’ बयान (प्रवचन) करण्यासाठी लखनऊ, हैदराबाद येथून जाकिरे अहलेबैत (मौलाना) शहरात येतात. शहरात जवळपास १५ हजारांपेक्षा जास्त शिया समाज असून बुढीलाईन भागात त्यांचे सर्वाधिक वास्तव्य आहे. जिल्ह्यात ही संख्या २५ हजारांच्या जवळपास आहे. दुखवटा असल्याने मोहर्रममध्ये बहुतांश जण काळे कपडे परिधान करतात.
या विषयी अंजुमन खादीमुल मासूमीनचे अध्यक्ष एजाज अली जैदी म्हणाले की, मी २०११ पासून माझ्या अध्यक्षतेत छत्रपती संभाजीनगर शहरात मातमी जुलूस काढला जात आहे. आम्ही सर्व जण एकत्र येऊन मजलिसचे आयोजन करतो. यामध्ये तरुणांची उपस्थिती लक्षणीय असते. आता या वर्षी शनिवार (ता.२९) जुलै मातमी जुलूस काढला जाणार आहे.
काय आहेत आशूरखाने, इमामवाडे?
इमामवाडा, आशूरखाना म्हणजे ज्या ठिकाणी शिया समाजाचे ‘आलम’ बसविले जातात. तेथे नियमित मजलिसचे आयोजन केले जाते. येथे मजलिसनिमित्त शिया समाजातील सर्वजण एकत्र जमतात. शहरात असे जवळपास १०० पेक्षा जास्त आशूरखाने व इमामवाडे आहेत.
असा आहे इतिहास
हजरत इमाम हुसैन यांचे वडील हजरत अली हे प्रेषित मोहंमद पैगंबर यांचे जावई. इमाम हुसैन यांची आई बीबी फातेमा आहे. बारा इमामांमध्ये हजरत हुसैन तिसरे इमाम आहेत. त्यावेळी अरबस्तानमध्ये यजीद हा लोकांवर अत्याचार करत होता. त्याच्यात मोठ्या प्रमाणात क्रूरता होती. सत्तेची लालसा असल्याने त्याने लोकांवर अत्याचार वाढविला. त्याविरुद्ध इमान हुसैन यांनी लढा दिला. इमाम हुसैन यांनी गरीब लोकांना साथ दिली. त्यावेळी यजीद याच्याकडून जनतेवर अत्याचार जास्त वाढल्याने कुणीही त्याविरुद्ध बोलत नव्हते.
इमाम हुसैन हे न्याय, समता आणि मानवतेचे पुरस्कारकर्ते असल्याने त्यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला. यासाठी इमाम हुसैन यांनी हक्क, मानवतेची लढाई लढली. करबला येथील युद्धात हजरत इमाम हुसैन यांना यजीद याने तीन दिवस उपाशी, तहानलेले ठेवले. मात्र इमाम हुसैन यांनी यजीदच्या भ्रष्ट आणि अत्याचाराविरुद्ध गुडघे टेकले नाहीत. नहरीचे पाणी बंद केल्याने त्यांच्या सहकारी सैन्य, महिला आणि लहान मुलांना पाणीसुद्धा मिळाले नाही. शेवटच्या श्वासापर्यंत इमाम हुसैन यांनी लढा दिला. या युद्धात इमाम हुसैन शहीद झाले. त्यांचा सहा महिन्यांचा मुलगा अली असगर यालाही शहीद करण्यात आले. महिलांना कैद करण्यात आले. यजीद हा मानवतेचा शत्रू होता. इमाम हुसैन यांची शहादत ‘दिलेरी की दास्तान’ आहे. त्यांचा त्याग, बलिदान कधीही न विसरता येण्यासारखे आहे. या स्मृतीत शिया मुस्लिम बांधव जगभर ‘आशुरा'च्या दिवशी मातमी जुलूस काढतात.
- शेखलाल शेख, संभाजीनगर