देशाच्या राजधानीत भरणार मराठी साहित्य प्रेमींचा मेळा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
साहित्य संमेलनाची माहिती देताना आयोजक संजय नहार
साहित्य संमेलनाची माहिती देताना आयोजक संजय नहार

 

यंदाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या शुक्रवार २१ फेब्रुवारीपासून नवी दिल्लीत  होणार आहे. या संमेलनात कवी संमेलन, मुलाखती, परिसंवाद आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे आयोजन करणाऱ्या सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

साहित्य संमेलनाचे उद्घाटन
तालकटोरा स्टेडिअममधील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत हे साहित्य संमेलन होईल. या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:३० वाजता विज्ञान भवनात होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.

सायंकाळी ६:३० वाजता संमेलनस्थळी उद्घाटनाचे दुसरे सत्र होईल. यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होईल. मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे आणि संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांची भाषणे होतील.
  
ग्रंथदिंडी आणि साहित्यिकांचा उत्साह
यावेळी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येईल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीला प्रारंभ होईल. यावेळी साहित्यिक, साहित्यप्रेमी आणि मराठी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. विविध कला पथकांचीही या दिंडीत सहभागी होण्याची योजना आहे.

कवी संमेलन आणि विविध सत्रे
पहिल्या दिवशी संमेलनाच्या सायंकाळच्या सत्रात कवी संमेलन होईल. महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील कवी यामध्ये सहभागी होणार आहेत.

२२ फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या विषयावर मान्यवरांची मुलाखत होईल. याशिवाय, ‘लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी’ , ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’ आणि ‘मधुरव’ या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल. तसेच यशवंतराव चव्हाण सभामंडपात ‘बहुभाषिक कवी संमेलन’ आणि ‘मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म’ अशा विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात येईल.

तिसऱ्या दिवशी शेवटचे सत्र
23 फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात ‘सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य’.  ‘नाते दिल्लीशी मराठीचे’ अशा कार्यक्रमांचे आयोजन होईल. यशवंतराव चव्हाण सभामंडपात ‘अनुवाद मराठीतून इतर भाषेत’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व सृजनशीलता’ या विषयांवर परिसंवाद होईल. संमेलनाच्या समारोप सत्रात ‘खुले अधिवेशन व समारोप’ आयोजित केले जाणार आहेत.

महादजी शिंदे एक्सप्रेस
साहित्य संमेलनासाठी पुणे येथून १९ फेब्रुवारीला विशेष रेल्वे दिल्लीसाठी होणार आहे. या रेल्वेचे नाव ‘महादजी शिंदे एक्सप्रेस’ ठेवण्यात आले आहे. प्रत्येक डब्याला गड आणि किल्ल्यांची नावे दिली आहेत. या विशेष रेल्वेमध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी भाषा मंत्री उदय सामंत असणार आहेत.

साहित्य संमेलनाचे महत्व
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे एक महत्त्वपूर्ण आयोजन आहे. यावर्षीचे संमेलन दिल्लीमध्ये होत असल्यामुळे संपूर्ण भारतभरातून साहित्यिक आणि साहित्यप्रेमी यामध्ये भाग घेण्यासाठी येणार आहेत. याव्यतिरिक्त, मराठी साहित्याच्या विकासासाठी विविध विषयांवर परिसंवाद, कवी संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्यातील समृद्धी आणि विविधतेला उत्तेजन मिळेल, अशी अपेक्षा आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter