देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार वाढत चालला आहे. अवघ्या काही दिवसांमध्येच देशातील जेएन.1 रुग्णांची संख्या ही 752 झाली आहे. तसंच कोविडच्या या नव्या व्हेरियंटने चार जणांचा बळी घेतला आहे. मात्र या सगळ्यात, WHO ने एक दिलासादायक माहिती दिली आहे.
कोरोनाचा नवा व्हेरियंट हा इतर व्हेरियंटपेक्षा जास्त धोकादायक असल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे सध्या उपलब्ध असणारी कोविड लस ही या व्हेरियंटपासून आपला बचाव करण्यास सक्षम असल्याची माहिती WHO ने दिली आहे. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
विविध राज्यांमध्ये गाईडलाईन्स
कोरोनाच्या या व्हेरियंटमुळे आतापर्यंत केरळमध्ये दोघांचा, तर राजस्थान आणि कर्नाटकात प्रत्येकी एका रुग्णाचा बळी गेला आहे. JN.1 या व्हेरियंटमुळे केंद्र सरकार देखील सतर्क झालं असून, सर्व राज्यांना अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यासोबतच कोविड-19 च्या स्वॅब नमुन्यांना जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्याचे निर्देशही राज्यांना दिले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 3.420 एवढी आहे.
ओडिशा सरकारने वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींना गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे. यासोबतच मिझोरम सरकारनेही ख्रिसमस आणि नववर्ष साजरं करताना कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.