बैठ्या कामामुळे भारतीयांची शारीरिक हालचाल कमी होऊन विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. २०२२ मध्ये देशातील जवळपास ५० टक्के प्रौढ व्यक्तींची शारीरिक सक्रियता अपुरी होती, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणात काढण्यात आला आहे.
‘द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ’ या नियतकालिकात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार शारीरिक सक्रियतेत महिलांचे प्रमाण अधिक म्हणजे ५७ टक्के असून पुरुषांचे प्रमाण ४२ टक्के आहे.
जगात अपुऱ्या शारीरिक सक्रियतेत उच्च उत्पन्न असलेल्या आशिया-प्रशांत प्रदेशानंतर भारताचा समावेश असलेल्या दक्षिण आशियाचा क्रमांक लागतो, अशी माहिती आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने दिली. जगभरात एक तृतीयांश प्रौढांची शारीरिक सक्रियता अपुरी असून त्यांची टक्केवारी ३१.३ इतकी आहे.
२००० मध्ये अपुरी शारीरिक सक्रियता असलेले भारतीय २२ टक्के होते. ही टक्केवारी २०१० मध्ये ३४ वर गेली. हीच गती कायम राहिल्यास २०३० मध्ये ६० टक्के भारतीय शारीरिकदृष्ट्या अपुरी सक्रियता असलेले असतील, असाही अंदाज संशोधकांनी वर्तविला आहे.
२००० ते २०२२ या काळातील १९७ देशांतील प्रौढांची शारीरिक सक्रियता मोजण्यासाठी संशोधकांनी लोकसंख्येवर आधारित सर्वेक्षणात १८ वर्षांवरील व्यक्तींच्या शारीरिक सक्रियतेच्या अहवालाचे विश्लेषण केले. त्याचप्रमाणे, ज्येष्ठांनी शारीरिक निष्क्रियता वाढत असल्याची कबुली दिल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे.
नेमका निकष काय?
दर आठवड्याला १५० मिनिटे मध्यम किंवा तीव्रतेचा व्यायाम अथवा शारीरिक हालचाल न करणाऱ्यांची किंवा आठवड्याला ७५ मिनिटे तीव्र शारीरिक व्यायाम न करणाऱ्यांची शारीरिक सक्रियता अपुरी आहे, असे समजले जाते. शारीरिक सक्रियता अपुरी असल्यास मधुमेह, हदयविकारासारख्या असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. ‘आयसीएमआर’ने २०२३ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार २०२१ मध्ये भारतात मधुमेहाचे दहा कोटी तर उच्च रक्तदाबाचे ३१ कोटी रुग्ण होते.
३१.३ टक्के - जगात अपुरी शारीरिक सक्रियता असलेले
५७ टक्के - भारतातील महिला
४२ टक्के - भारतातील पुरुष