जगात विविध दुर्धर आजार आहेत. यात कर्करोग हा गंभीर आजार असून या आजारावर कोणतेही औषध नाही. जगभरात कॅन्सरग्रस्तांची संख्या वाढत आहे. दरवर्षी लाखों नागरिक या आजाराने जीव गामावत आहे. मात्र, आता कॅन्सरवर रशियाने रामबाण उपाय शोधला आहे. नागरिकांना कॅन्सरची लागण होऊ नये यासाठी खास कॅन्सरवरील लस रशियन शास्त्रज्ञांनी तयार केली आहे.
रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने या बाबत जाहीर केले असून ही लस पुढील वर्षांपासून देशातील सर्व नागरिकांना मोफत दिली जाणार आहे. रशियन सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर आंद्रे काप्रिन यांनी या बाबत रशियन रेडिओ चॅनेलवर माहिती दिली आहे.
गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीचे संचालक अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी लसीबाबत रशियाच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून माहिती दिली. लसीची प्री क्लीनिकल ट्रायल झाली आहे. यात अशी माहिती समोर आली की, लस ट्यूमरची वाढ आणि संभाव्य मेटास्टेसिसला रोखते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी याआधी सांगितलं होतं की, रशियाचे संशोधक कॅन्सरवर लस तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. ही लस लवकरच रुग्णांसाठी उपलब्ध होईल.
ही लस कोणत्या प्रकारच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरेल याबद्दल स्पष्टता नाही. याशिवाय या लसीचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. इतरही अनेक देश अशाच लसीवर काम करत आहेत. उदाहरणार्थ, यूके सरकारने वैयक्तिकृत कर्करोगाच्या उपचारांसाठी जर्मनीस्थित बायोएनटेकशी करार केला आहे.
गिंट्सबर्ग यांनी म्हटलं होतं की, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कचा वापर करून पर्सनलाइज्ड कॅन्सर लस बनवण्यासाठीचा वेळ हा एका तासापेक्षा कमी होऊ शकतो. फार्मास्युटिकल कंपन्या मॉडर्ना आणि मर्क अँड कंपनी एक प्रायोगिक कॅन्सर लस तयार करत आहे. तीन वर्षांपर्यंत लसीच्या उपचारामुळे मेलेनोमा सारख्या गंभीर त्वचारोगामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण ५० टक्के इतकं कमी होतं असा दावाही केला गेला होता.