पुण्यातून झिका विषाणूसंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. झिका रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसत आहे. राज्यामध्ये 'झिका' विषाणूचा प्रसार वेगात होतोय. एडीस डासांमुळे होणाऱ्या 'झिका' विषाणूचा पश्चिम महाराष्ट्रात वेगाने प्रसार होत आहे. रुग्णांची संख्या २८ वर पोहोचल्याची माहिती मिळत आहे. झिका विषाणूचा सर्वाधिक धोका गर्भवती महिलांना असल्याचं सांगितलं जात आहे.
झिका रुग्णसंख्येत वाढ
आरोग्य विभागाने रुग्ण आढळलेल्या तीन ते पाच किलोमीटर परिसरात स्क्रीनिंग करण्यास सुरुवात केलीय. संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार असल्याचं आरोग्य विभागाने सांगितलं आहे. शहरात झिका रुग्णांची संख्या १५ जुलै रोजी २३ वर पोहोचली होती.
राज्यावर झिकाचं सावट
राज्यात सध्या झिकाचं सावट दिसत आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचतं, त्यामुळे डास निर्माण होतात. झिका विषाणू हा मुख्यतः एडीस डासांद्वारे प्रसारित होणाऱ्या विषाणूमुळे होतो .हा डास दिवसा चावत असतो. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. एकात्मिक कीटक व्यवस्थापनअंतर्गत एडीस डास प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. झिका विषाणूचा गर्भवती महिलांना संसर्ग झाल्यास मुदतपूर्व प्रसूतीची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे.
स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं...
'झिका' विषाणूपासुन बचाव करण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणं खूप गरजेची आहे. पावसामुळे डेंग्युच्या रूग्णसंख्येत देखील वाढ होत असल्याचं दिसत आहे. नाशिकमध्ये देखील डेंग्यरूग्णसंख्येत मोठी वाढ झालीय. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १६ जुलै रोजी डेंग्युसदृश्य आजाराने एका मुलीचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज असल्याचं संबंधित प्रशासनाने सांगितलंय.