रमजान : आत्मिक उन्नतीसोबतच शारीरिक आरोग्याचीही हमी

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

रमजान म्हणजे इस्लामी कालगणनेनुसार नववा महिना. हा महिना जगभरातील मुस्लिमांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण काळ. हा पाक (पवित्र) महिना केवळ अन्न-पाण्याविना रोजा (उपवास) करण्यासाठी नाही, तर शरीर, मन आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक असतो. रमजानचे रोजे हे व्यक्तिगत विकास आणि आध्यात्मिक वृद्धीत महत्त्वाची भूमिका बजावतात.

धर्मग्रंथ कुराणमध्ये रमजानच्या महत्त्वावर विशेष भर देण्यात आला आहे. कुराणमध्ये म्हटलय, “श्रद्धावंतांनो! तुमच्यासाठी रोज़ा अनिवार्य करण्यात आले आहे, जसे तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांसाठी अनिवार्य करण्यात आले होते. जेणेकरून तुम्ही परहेजगार व्हावे.” (कुराण, २:१८३) या श्लोकातून म्हणजेच आयतीतून हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय की उपवास हा केवळ इस्लामपुरता मर्यादित नसून इस्लामपूर्वीच्या विविध धार्मिक परंपरांमध्येही ही प्रथा अस्तित्वात आहे. ईश्वराप्रती सखोल जाणीव निर्माण करणे आणि स्वतःला एक उत्तम व्यक्ति बनवणे हा उपवासाचा मुख्य उद्देश आहे. 
 

रमजान महिन्यात मुस्लिम सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न, पाणी आणि अन्य शारीरिक गरजांपासून लांब राहतात. उपवासाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अनेक फायदे आहेत. शारीरिक दृष्टिकोनातून पाहता उपवास वजन कमी करण्यास, पचन सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. 

उपवासाच्या काळात शरीरातील अन्न पचवण्याची प्रक्रिया थांबलेली असते. त्यावेळी आपले शरीर पेशी दुरुस्तीवर आणि विषारी पदार्थांचा निचरा करण्यावर लक्ष केंद्रित करते. काही अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की उपवासामुळे काही विशिष्ट रोगांपासून रक्षण होते, आणि एकंदर आरोग्य सुधारते.

उपवासचा मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. उपवासादरम्यान अनेकजण मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढल्याचे सांगतात. उपवासाचे काटेकोरपणे पालन केल्याने इच्छाशक्ती तर वाढतेच परंतु ताणतणावही कमी होतो. धर्मग्रंथ कुराण आत्मचिंतन करण्याची प्रेरणा देते. त्यात म्हटले आहे की, “तुम्ही माझे स्मरण करा आणि मीही तुमचे स्मरण ठेवीन, आणि माझ्याप्रति (नेहमी) कृतज्ञ असा व माझ्याप्रति कृतघ्न होऊ नका.” (कुराण,२:१५२) 

उपवास आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्याला सुधारण्यास मदत करते. कुराणात आणखी एके ठिकाणी असे म्हटले आहे की, “जेव्हा (एखाद्या कृती योजनेविषयी) निर्णय घ्याल तर अल्लाहवर (दृढ) विश्वास ठेवा. आणि ते लोक अल्लाहला प्रिय आहेत, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात.”(कुराण, ३:१५९)
 

आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले असता, रमजान हा अल्लाहशी अतूट नाते प्रस्थापित करण्याचा आणि त्याची भक्ती करण्याचा सर्वोत्तम काळ आहे. त्यामुळे मुस्लिम या महिन्यात प्रार्थना, कुराण वाचन आणि दान करण्यावर अधिक भर देतात. कुराणवर  विश्वास ठेवणाऱ्यांसाठी रमजान हा अल्लाहशी जवळीक साधण्याचा काळ असल्याचे म्हटले आहे. “जेव्हा माझे भक्त तुम्हाला माझ्या विषयी विचारतात, तेव्हा तुम्ही त्यांना असे सांगा की, मी (त्यांच्या) जवळच आहे. आणि हाक देणाऱ्याच्या हाकेला मी प्रतिसाद देत असतो, ज्या-ज्यावेळी तो मला हाक मारतो. तर (माझ्या भक्तांसाठीही) आवश्यक आहे की, त्यांनीही माझ्या आदेशाला प्रतिसाद द्यावा, आणि माझ्यावर विश्वास ठेवावा, म्हणजे ते सदाचरणी बनतील.” (कुराण, २:१८६) 

रमजानच्या काळात अध्यात्माकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याने शांती आणि समाधानाची भावना निर्माण होते. त्याचे संपूर्ण आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतात. “लोकांनो! (आता) तुझ्या पालनकर्त्याकडून तुझ्याकडे उपदेश आलेला आहे, व (हा उपदेशपूर्ण ग्रंथ), अंतःकरणामध्ये जे काही (विकार) आहेत, त्यावर एक उपाय आहे. आणि विश्वास ठेवणाऱ्यांसाठी मार्गदर्शन व कृपा आहे.” (कुराण, १०:५७)

रमजानचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे समाजातील एकता आणि बंधुत्व मजबूत करणे. उपवास काळात मुस्लिम 'इफ्तार'साठी एकत्र येतात. यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक संबंध घट्ट होतात. याविषयी कुराणमध्ये म्हटले आहे की, “लोकांनो! आम्ही तुम्हा (सर्वांना) एक नर व एक नारी पासून निर्माण केले आहे. मग तुम्हाला एकमेकांना ओळखता यावे यासाठी, तुमच्या विविध जाती व कबिले बनविले. (पण) अल्लाहच्या नजरेत तोच सर्वाधिक सन्माननीय मनुष्य आहे, जो त्याची सर्वाधिक जाण ठेवून (जीवन व्यतीत करणारा) आहे. निश्चितच अल्लाह सर्व काही जाणणारा, सर्वप्रकारे जाणीव असणारा आहे.” (कुराण, ४९:१३). 

या आयतीत अल्लाह सर्व मानव जातीला एकत्र येण्याचा संदेश देत आहे. अल्लाहने कुराणात म्हटले आहे की, मानवांमध्ये विविधता ठेवण्यामागचा हेतू भेदभाव निर्माण करणे नसून उलट परस्पर सामंजस्याला चालना मिळावी आणि लोकांना एकमेकांची खरी ओळख व्हावी हे यामागचे प्रयोजन आहे.

उपवासाचे शारीरिक फायदे केवळ धार्मिक संदर्भापुरते मर्यादित नाहीत. त्याचे शारीरिक फायदे वैज्ञानिक संशोधनातूनदेखील सिद्ध झाले आहेत. उपवासामुळे ‘ऑटोफॅजी’ नावाची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे शरीरासाठी घातक असलेल्या पेशी नाहीशा होऊन नवीन पेशींच्या निर्मितीला चालना मिळते. यामुळे अनेक रोगांना प्रतिबंध करता येतो. 

उपवासामुळे हृदयाचे आरोग्यही सुधारते. त्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रणात राहते. डायबिटीस असलेल्या किंवा होण्याचा धोका असलेल्या लोकांसाठी रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. उपवासामुळे इन्सुलिन निर्मितीला चालना मिळते, तसेच या निर्मितीत अडथळा ठरणारे घटक क्षीण होतात. यामुळे मधुमेह नियंत्रणात मोठी मदत मिळते. मात्र आरोग्य संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही इष्ट.

रमजानमध्ये किंवा अन्य वेळी उपवास करताना अधिक श्रम टाळणे अत्यंत गरजेचे असते. उपवासाच्या काळात शक्यतो हलक्या कामांना प्राधान्य द्यावे आणि कठोर परिश्रम टाळावेत. उपवास सोडताना शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. सहज पचणाऱ्या पदार्थांनी हळूहळू उपवास सोडल्याने पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते आणि अस्वस्थता येत नाही.

रमजानचा प्रभाव तो संपल्यानंतरही तसाच राहतो. रमजानमध्ये कालावधीत विकसित झालेल्या चांगल्या सवयी तशाच टिकून राहतात. सात्विक अन्नाचे सेवन, वाढलेली आत्म-जागरूकता आणि इतरांबद्दल वाढलेली सहानुभूती ही रोजेदारांच्या दैनंदिन जीवनात टिकून राहतात.

रमजानचा समारोप 'ईद अल-फित्र' या सणाने होतो. जो उपवासाच्या समाप्तीला मोठ्या श्रद्धेने आणि आनंदात साजरा केला जातो. कुराणमध्ये त्याविषयी सांगितले आहे की, “तुम्ही हजचे विहित करण्यात आलेले विधी पूर्ण केल्यानंतर अल्लाहचे गुणगान करा, जसे गुणगान तुम्ही आपल्या पूर्वजांचे करीत आलात; तर त्याहीपेक्षा अधिक अल्लाहचे गुणगान करा.” (कुराण, २:२००).

रमजानचा महिना सर्वांगीण परिवर्तनाची संधी उपलब्ध करून देतो. रोजा शारीरिक, मानसिक आणि आत्मिक परिवर्तनासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. याचे अनेक शारीरिक फायदे तर आहेतच पण हे उपवास मानसिकदृष्ट्या एकाग्रता आणि शिस्त वाढवून मनाला शांत करतात. या उपवासाचे इस्लामिक परंपरेत मुळ असले तरी, त्याचे फायदे सर्वांसाठीच आहेत. जो कोणी मनापासून उपवास करतो त्याचे आरोग्य सुधारणे आणि वैयक्तिक विकासाच्या दृष्टीने मोठे फायदे मिळू शकतात.
 

कुराणमध्ये म्हटले आहे की, “अल्लाह तुम्हाला सुविधा देऊ इच्छितो आणि तो तुम्हाला कष्ट देऊ इच्छित नाही.”(कुराण, २:१८५) त्यामुळे कुराणातील उक्ती हा संदेश देते की, उपवासादरम्यान आपल्यासमोर अनेक आव्हाने आली तरी त्यातून आपल्याला वैयक्तिक आणि सामुदायिक फायदे नक्कीच होतात.धार्मिक किंवा शारीरिक कारणांसाठी हे उपवास केले तरी त्याचे आरोग्याच्यादृष्टीने अनेक फायदे होतात. आजच्या आधुनिक जगात उपवास हा आत्म-सुधारणा आणि आध्यात्मिक वाढीसाठी एक शक्तिशाली साधन आहे. 

डॉ. उझमा खातून 
(लेखिकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले आहे.)

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter