गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या अतिशय दुर्मिळ अशा आजाराची चर्चा पाहायला मिळत आहे. एका महिलेला या आजाराने ग्रासल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने तिच्यावर यशस्वीपणे उपचार केल्यामुळे तिने त्यावर मात केल्याचे वृत्तही समोर आले होते. त्यानंतर पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यात आतापर्यंत या आजाराचे २२ रुग्ण आढळले होते. परंतु आता रुग्णांच्या आकड्यात वाढ होऊन तो ५९ वर पोहचला आहे. तर बाधा झालेले १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत आणि विविध हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पुणे महापालिकेचं शीघ्र कृती दल या आजारामुळे सध्या अलर्ट मोडवर आहेत. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता आणि धायरी परिसरात गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या परिसरातले पाण्याचे नमुने महापालिकेकडून तपासले जात आहेत. गुलेन बॅरी सिंड्रोम हा दुर्मिळ आजार असला तरी नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांच मत आहे.
पाण्याचे स्त्रोत महानगरपालिकेने तपासावेत असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. ज्या भागामध्ये, कॉलनीमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत त्या भागातील पाण्याचे स्रोत महानगरपालिकेने तपासावेत असे पुलकुंडवार यांनी सांगितले. पुणे शहर आणि परिसरात जीबीएसचे रुग्ण आढळून आल्याच्या आरोग्य यंत्रणांकडून उपचार आणि उपायोजनाचा आढावा घेतला गेले.
काय आहे गुइलेन बॅरे सिंड्रोम?
गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ आजार आहे. तो दर वर्षी १ लाख लोकांमध्ये एका व्यक्तीला होतो. याचे निदान गुंतागुंतीचे असते. चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या याच्या निदानासाठी आवश्यक असतात. आयव्हीआयजी अथवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. या आजाराचे बहुतेक रुग्ण बरे होत असले, तरी २० टक्के रुग्णांना सहा महिन्यांनंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात. गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे पहिले लक्षण अशक्तपा आणि हातापायाला मुंग्या येणे हे आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये या आजाराची लागण झालेले जे रुग्ण सापडले आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने हिच लक्षणं दिसून आली आहेत.