अपघातातील जखमींना आता मिळणार 'कॅशलेस ट्रीटमेंट'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

केंद्र सरकारने रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी 'कॅशलेस ट्रीटमेंट' योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत अपघातात जखमी झालेल्यांना उपचाराकरिता दीड लाख रुपये दिले जाणार आहे किंवा जखमींचा सात दिवसांच्या उपचाराचा खर्च आता केंद्र सरकार उचलणार आहे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात माहिती दिली.

दिल्लीतील भारत मंडपममध्ये सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना त्यांनी या योजनेसंदर्भात माहिती दिली. तसेच या मुद्द्यावर राज्य आणि केंद्र सरकारांमध्ये सहकार्य वाढवणं गरजेचं आहे, असेही त्यांनी सांगितलं.

यासंदर्भात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, की ''आम्ही अपघातात जखमी झालेल्यांसाठी कॅशलेस ट्रीटमेंट योजना सुरु केली आहे. त्यानुसार महामार्गावर अपघात झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या प्रवाशांना उपाचारासाठी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे किंवा त्यांच्या सात दिवसांच्या उपाचाराचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. मात्र, त्यासाठी २४ तासांच्या आता पोलिसांना अपघाताची माहिती देणं गरजेचं आहे.''

इतकंच नाही, हिट-अँड-रन प्रकरणांतील मृतांसाठी दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचंही नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. २०२४ मध्ये रस्ते अपघातात १ लाख ८० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ३० हजार मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे झाले आहेत. तर ६६ टक्के मृ्त्यू १८ ते ३४ वयोगटातील आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.

पुढे बोलताना, शाळा आणि महाविद्यालयासमोर वाहतूक नियोजन नसल्याने दरवर्षी जवळपास १० हजार विद्यार्थ्यांचा मृत्यू होते, हेदेखील त्यांनी अधोरेखित केलं. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत सोडणाऱ्या स्कूल बस चालकांसाठीही आम्ही नवे नियम केले आहेत, एकंदरितच प्रवाशांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.