जम्मू कश्मीरच्या राजोरी जिल्ह्यातील बधाल गावामध्ये गेल्या एका महिनाभरात रहस्यमय आजारामुळे १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाने यावर गंभीरपणे लक्ष केंद्रित केले आहे.
या आजारामुळे झपाट्याने मृत्यू वाढत असल्याने सरकारने तातडीने विशेष तज्ज्ञांची टीम तैनात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी आरोग्य टीम्सने नमुने गोळा करून तपास सुरू केला आहे. जम्मूतील एक रुग्णालयात सफीना कौसर या मुलीचा मृत्यू झाला होता आणि त्याच रुग्णालयात गेल्या दोन दिवसांत तिच्या इतर तीन भावंडांचे देखील निधन झाले. त्याचप्रमाणे दोन अन्य मुले अद्याप जीव वाचविण्यासाठी संघर्ष करत आहेत. या आजाराचे निदान न झाल्यामुळे गावातील लोकांमध्ये अधिक भीती निर्माण झाली आहे.
मृत्यूंची कारणे काय आहेत?
सुरुवातीच्या काळात डॉक्टरांचे असे म्हणणे होते की, मृत्यू फूड पॉइझनिंगमुळे होत आहेत. परंतु जसजसे मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे आणि इतरही ग्रामस्थांमध्ये त्याची लक्षणे दिसू लागल्याने याकडे गांभीर्याने पहिले जाऊ लागले. त्यामुळे हे फूड पॉइझनिंग नसून दुसरे काहीतरी असल्याचे लक्षात आले.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सरकारने यामध्ये हस्तक्षेप केला. जम्मू येथील सरकारी मेडिकल कॉलेज रुग्णालयातील डॉ. आशुतोष गुप्ता यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार या मृत्यूंचे कारण कदाचित वायरल इन्फेक्शन असू शकते. परंतु, त्यांनी हे देखील सांगितले की यावर अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी अधिक तपासाची आवश्यकता आहे.
तज्ञांची टीम गावात पोहोचली
या आजाराचा तपास करण्यासाठी केंद्र सरकारने विविध ठिकाणच्या प्रतिष्ठित आरोग्य संस्थांचे तज्ञ बोलावले आहेत. यामध्ये पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी, पीजीआय चंदीगड, एम्स दिल्ली आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) दिल्लीचे तज्ञांची टीम गावात तैनात केली आहे.
स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाने या परिस्थितीवर गंभीरपणे उपाययोजना केल्या आहेत. तज्ञांच्या निरीक्षण आणि अहवालांच्या आधारावर पुढील पावले उचलली जातील. स्थानिक लोकांमध्ये या आजाराविषयी जागरूकता निर्माण केली जात आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या लक्षणांना दुर्लक्ष न करण्याचा आणि त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला दिला जात आहे. सरकारने लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.