आज भारतात आयटी क्षेत्रात काम करणारे लोक वेगवेगळ्या गंभीर आजारांचे शिकार होत आहेत. ९ ते १० तास एकाच जागी बसून काम करावे लागत असल्याने आणि स्ट्रेसमुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत नुकतीच धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हैदराबाद विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, भारतातील ८४% पेक्षा जास्त आयटी क्षेत्रातील कर्मचारी फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त आहेत. या लोकांमध्ये मेटाबॉलिक डिस्फंक्शन संबंधित फॅटी लिव्हर डिजीजचा धोका अधिक वाढला आहे.
काय आहे कारण?
आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक तास एकाच जागी बसून काम करावं लागते. सोबतच कामासंबंधी तणाव, कमी झोप, वेगवेगळ्या शिफ्ट, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि एक्सरसाईज न करणे या गोष्टींमुळे फॅटी लिव्हरची समस्या अधिक वाढते.
हा रिपोर्ट हैद्राबाद विश्वविद्यालयाचे वैज्ञानिक प्रोफेसर कल्यानकर महादेव आणि प्रोफेसर सी. टी. अनिथा यांनी त्यांचे काही सहकारी आणि एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंटेरोलॉजीचे सीनिअर हेपेटोलॉजिस्ट डॉ. पीएन राव व त्यांच्या टीमसोबत मिळून केला.
या रिसर्चमध्ये असे आढळून आले की, ८४ टक्के आयटी कर्मचाऱ्यांना फॅटी लिव्हर (MAFLD), ७१ टक्के लोकांना लठ्ठपणा आणि ३४ टक्के लोकांना मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या आहे. मेटाबॉलिक सिंड्रोम एक ग्रुप आहे जो फॅटी लिव्हर, लठ्ठपणा, डायबिटीस आणि हाय बीपीचा धोका वाढवतो.