मंकीपॉक्स संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स विरोधी पहिल्या लसीला मंजुरी दिली आहे. Bavarian Nordic या कंपनीच्या लसीला ही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता मंकीपॉक्सचा धोका कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'रॉयटर्स'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
लस बवेरियन नॉर्डिक किंवा एमवीए-बीएन लस १८ वर्षांपुढील प्रौढांना देण्यात येणार आहे. या लसीला चार आठवड्यांच्या अंतराने २ असे इंजेक्शन दिले जाणार आहेत. WHO ने सांगितल्यानुसार, सदर लस मंकीपॉक्सपासून वाचण्यासाठी ७६ टक्के प्रभावी आहे. तर, दोन खुराक घेतले तर लस ८२ टक्के प्रभावी ठरेल.
सध्या आफ्रिकेमध्ये मंकीपॉक्सचा कहर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर डब्ल्युएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस एननोम घेब्रेसेस म्हणाले की, आफ्रिकेमध्ये मंकीपॉक्सचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या आजाराविरोधात लढण्यासाठी लसीला मिळणारी मंजुरी ही महत्त्वाचं पाऊल आहे. आता लसीची खरेदी आणि वाटप यावर लक्ष द्यावे लागणार आहेत. याशिवाय संक्रमण रोखण्यासाठी इतर उपाय देखील अत्यावश्यक आहेत.
आफ्रिकेमध्ये आपात्कालीन स्थिती घोषित
मंकीपॉक्सचा आफ्रिकेमध्ये धोका निर्माण झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या देशामध्ये जागतिक आपात्कालीन स्थिती घोषित केली होती. त्यानंतर मंकीपॉक्स विरोधात लस निर्मितीचा वेग वाढला होता. यात बवेरियन नॉर्डिकने आघाडी घेतली. या कंपनीने दिलेल्या माहितीच्या आधारावर WHO ने वितरणास मंजुरी दिली आहे.
२०२२ मध्ये १२० पेक्षा जास्त देशांमध्ये एमपॉक्सचे १ लाख तीन हजारपेक्षा अधिक प्रकरणं आढळली होती. २०२४ मध्ये एकट्या आफ्रिकी खंडातील १४ देशांमध्ये २५,२३७ रुग्ण आढळली होते. यात आतापर्यंत ७२३ लोकांचा मृत्यू झाला आहे. एमवीए-बीएन लसीला अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर, कॅनाडा आणि युरोपीयन युनियनने हिरवा कंदील दाखवला आहे.