देशभरात मंकीपॉक्सची चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. आफ्रिका आणि स्वीडनशिवाय भारतालाही याचा धोका आहे. आरोग्य विभागाचे पथक सतर्क झाले आहेत.
यातच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने घोषणा केली आहे की ते मंकीपॉक्स विरुद्ध लस विकसित करत आहेत. मंकीपॉक्सच्या उद्रेकामुळे जागतिक आरोग्य आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सध्या या रोगासाठी लस विकसित करण्यावर काम करत आहे.
सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला म्हणाले, मंकीपॉक्सच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर, आम्ही लाखो लोकांना मदत करण्यासाठी लस विकसित करण्यावर काम करत आहोत. आशा आहे की, एका वर्षाच्या आत आपल्याला यासंबंधी चांगली बातमी मिळेल. सीरम इन्स्टिट्यूटने या अगोदर कोरोनाची लस विकसित केली होती.
भारतातील मंकीपॉक्सची स्थिती
२०२२ मध्ये भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता. २०२२ पासून, जागतिक आरोग्य संघटनेने ११६ देशांमध्ये मंकीपॉक्सची ९९,१७६ प्रकरणे आणि २०८ मृत्यूची नोंद झाली आहे. २०२२ मध्ये WHO च्या घोषणेपासून भारतात एकूण ३० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतात मंकीपॉक्सचे ताजे प्रकरण मार्च २०२४ मध्ये नोंदवले गेले. मंकीपॉक्सच्या सध्याच्या उद्रेकादरम्यान, WHO ने हा जागतिक चिंतेचा विषय घोषित केला होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा विषाणू सध्या मध्य आफ्रिकेत आणि आसपास असल्याने, भारतातील सीमावर्ती भागात पाळत ठेवणे आणि तपासणी सुरू करणे आवश्यक आहे. स्वच्छता आणि सावधगिरी बाळगून हा आजार टाळता येतो.
मंकीपॉक्स कसा पसरतो?
मंकीपॉक्सचा विषाणू कुठेही पसरू शकतो. अहवालानुसार, हा आजार लैंगिकरित्या अधिक प्रसारित होत आहे. हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो, त्यामुळे निष्काळजीपणा टाळला पाहिजे.
मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत?
१. मुरुम, फोड किंवा पुरळ, वेदना आणि पू भरणे
२. ताप, थंडी वाजून येणे
३. डोकेदुखी, पाठदुखी, घसा खवखवणे आणि थकवा
४. स्नायूंमध्ये ताण येणे