WHO ने आणीबाणी म्हणून घोषित केलेल्या 'एमपॉक्स'वर भारताची करडी नजर

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 3 Months ago
नरेंद्र मोदी, पीके मिश्रा
नरेंद्र मोदी, पीके मिश्रा

 

सध्या जगभरात मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत ११६ देशांमध्ये या विषणूचा प्रसार वेगाने झाला आहे. यामुळे शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मंकीपॉक्सची साथ ही आरोग्यासाठीची आणीबाणीची स्थिती असून जागतिक चिंतेचा विषय आहे असे जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) सांगण्यात आले आहे. या आजाराशी लढण्यासाठी भारतही सज्ज झाला आहे. 

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली राजधानी दिल्लीत उच्चस्तरीय बैठकी पार पडली. या बैठकीमध्ये मंकीपॉक्स च्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीतून डॉ. पी.के. मिश्रा यांनी देशात एमपॉक्स या आजारासंदर्भात सज्जतेच्या स्थितीचा आणि संबंधित सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांचा आढावा घेतला. 

जागतिक आरोग्य संघटनेने १४ ऑगस्ट २०२४ रोजी मंकीपॉक्सला आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले. WHO च्या २०२२ च्या निवेदनानुसार ११६ देशांमध्ये या आजाराचे ९९,१७६ रुग्ण आढळले,  त्यापैकी २०८ जणांचा मृत्यू झाल. त्यानंतर या आजाराच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.

२०२२ मध्ये WHO ने आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर केल्यावर भारतात ३० रुग्णांची नोंद झाली होती. मार्च २०२४ मध्ये एमपॉक्सचा एक रुग्ण आढळल्यानंतर अद्याप या आजाराच्या रुग्णाची नोंद नाही.

यावर बोलताना आरोग्य सचिव म्हणाले,“सध्या भारतात एमपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. देशभरात मंकीपॉक्सच्या सातत्याने होणाऱ्या फैलावाचे प्रमाण कमी असल्याने मोठ्या प्रादुर्भावाचा धोका कमी आहे. मात्र या आजारची तीव्रता लक्षात घेऊन गेल्या आठवड्यातच पुढील पावले उचलण्यात आली आहेत. राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्राद्वारे (NCDC) १२ ऑगस्ट २०२४ रोजी भारतासाठी असलेल्या धोक्याचे मूल्यमापन करण्यासाठी तज्ञांची एक बैठक बोलावण्यात आली होती.” 

पुढे ते म्हणाले, “नवीन घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी NCDC द्वारे यापूर्वी जारी केलेल्या एमपॉक्सविषयी एक संसंर्गजन्य रोग (CD) हा इशारा नव्याने दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळांवर (पोर्ट ऑफ एन्ट्री) आरोग्य पथकांना या रोगाबाबत जागरुक करण्याचे उपक्रम हाती घेण्यात आले आहे.” 

शेवटी ते म्हणाले,"आरोग्य सेवा महासंचालकांनी(DGHS) २०० हून अधिक सहभागींसोबत एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यामधून राज्यांमधील एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) युनिट्ससह राज्य स्तरावरील आणि पोर्ट्स ऑफ एन्ट्रीवरील आरोग्य अधिकारी आदींना याबाबत माहिती देऊन जागरुक करण्यात आले आहे." 

या बैठकीतून एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी,”या आजारासंदर्भात देखरेख वाढवावी आणि त्याची लागण झालेल्या रुग्णांचा तातडीने शोध घेण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात असे आवाहन केले. तसेच आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच निदान करण्यासाठी चाचणी प्रयोगशाळांचे जाळे सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले. “ 

"या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि उपचार या संदर्भात एक नियमावलीचा प्रसार व्यापक स्तरावर करावा. तसेच या रोगाबाबत प्रतिबंधात्मक सार्वजनिक उपाययोजनांसंदर्भात जागरुकता अभियान राबवा," अशा सूचना देखील त्यांनी अधिकारी वर्गाला दिल्या. 

या बैठकीला नीती आयोगाचे सदस्य  डॉ.व्ही.के. पॉल, सदस्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव अपूर्व चंद्रा, आरोग्य संशोधन सचिव डॉ राजीव बहल, (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) सदस्य सचिव कृष्ण एस वत्स, माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू आणि श्री गोविंद मोहन, नियुक्त गृह सचिव, आणि इतर मंत्रालयांचे अधिकारी उपस्थित होते.

Mpox काय आहे?
  • Mpox हा मंकीपॉक्स व्हायरसमुळे होणारा - विषाणुजन्य आजार आहे.
  • हा Zoonosis Disease म्हणजे प्राण्यांमधून माणसांकडे येणारा संसर्ग आहे. विविध प्रजातींची माकडं, उंदीर, खारींकडून हा विषाणू माणसांमध्ये येतो.
  • Smallpox म्हणजे देवी पसरवणाऱ्या विषाणूंच्या गटामधलाच हा विषाणू आहे, पण त्या तुलनेत कमी घातक आहे.
  • डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोसारख्या आफ्रिका खंडातल्या उष्णकटीबंधातल्या देशांच्या जंगलांमधल्या दुर्गम गावांमध्ये हा विषाणू सर्रास आढळतो.
  • या भागांमध्ये दरवर्षी या विषाणू संसर्गाच्या हजारो केसेस आढळतात आणि दरवर्षी शेकडो मृत्यूही होतात. 15 वर्षांखालच्या मुलांना या संसर्गाचा सर्वाधिक धोका असत
मंकी पॉक्सची लक्षणे
मंकी पॉक्समुळे ताप, पुरळ, डोकेदुखी, अंगाला सूज येणे,पाठदुखी, अंगदुखी अशी लक्षणे दिसून येतात. 

मंकी पॉक्सचा संसर्ग कसा पसरतो?
संसर्गग्रस्त रुग्णाचे कपडे वापरले किंवा स्पर्श केला. 
संसर्गाने आलेले फोड किंवा खपलीला स्पर्श केला.
बाधित व्यक्तीचा खोकला किंवा शिंकेतून.
बाधित व्यक्तीसोबत शरीरसंबंध ठेवले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter