२०२४मध्ये 'असे' झाले विक्रमी अवयवदान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

पुणे विभागात सरत्या वर्षात ७० दात्यांनी केलेल्या अवयवांच्या दानामुळे १८१ रुग्णांचे प्राण वाचले आहेत. अवयवदानाच्या गेल्या २० वर्षांच्या तुलनेत इतिहासात सरत्या वर्षात इतर वर्षांच्या तुलनेत पुणे विभागात सर्वाधिक अवयवदानाची नोंद झाली आहे. तसेच २००४ पासून २०२४ पर्यंत एकूण ५५७ अवयवदात्यांनी केलेल्या अवयवदानाने १ हजार ३५५ जणांचे प्राण वाचले आहेत. 'झेडटीसीसी' संस्थेच्या स्थापनेपासून ग्रीन कॉरिडॉरसारखे उपक्रम राबविले गेले होते. त्यामुळे अवयवांची तातडीने वाहतूक झाल्याने लोकांचे प्राण वाचविले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात अवयवदान करण्यासाठी जागरूकता निर्माण होत आहे. 

अवयवदान करण्यात पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचा (झेडटीसीसी) मोलाचा हातभार लागला आहे. गेल्या वीस वर्षांत २०१८ आणि २०१९ मध्ये प्रत्येकी ६३ अवयवदात्यांनी अवयवदान केले होते. हा आतापर्यंतचा विक्रम होता. तो विक्रम गेल्या वर्षी मोडला आहे. गेल्या २० वर्षांत समिती स्थापन झाल्यापासून आतापर्यंत अवयवदानाबाबत समितीने जागृती केली आहे. 

गेल्या वर्षी अवयव प्रत्यारोपण कामगिरीला मोलाचा हातभार लावला तो सरकारी रुग्णालयांनी. गेल्यावर्षी सात अवयव दान हे सरकारी रुग्णालयांतून करण्यात आले आहे. त्यात ससून रुग्णालयात एक आणि कमांड रुग्णालयातून सहा अवयवदानाचा समावेश आहे. यावरून अवयवदानाला पाठिंबा देण्याबाबत सार्वजनिक रुग्णालयातील वाढती जागरूकता व बांधिलकी दिसून येत आहे. 

गेल्यावर्षी विविध क्षेत्रांतील नागरिकांनी अवयव दान करण्यासाठी पावले टाकले असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात चित्रपट, निर्माते, पत्रकार, वैद्यकीय, वैमानिक आणि उद्योजक यांचे योगदान आहे. झेडटीसीसी समितीने अवयव प्रत्यारोपाच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवत नागरिकांच्या हिताचा विचार केला आहे. त्यामुळेच गेल्या २० वर्षांत ५५७ मृत अवयवांच्या मदतीने १,३५५ नागरिकांचे प्राण वाचविण्यात यश मिळवता आले आहे. 'झेडटीसीसी'च्या समितीला पुण्यात वर्षभरात ७० अवयव प्राप्त झाले असून, पुणे विभागात प्रत्यारोपण केलेल्या अवयवांची संख्या १८१ आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter