चीनमध्ये कोरोनाप्रमाणेच प्रसार होणाऱ्या एचएमपीव्ही (ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस) विषाणुमुळे जगावर पुन्हा एकदा काळजीचे सावट निर्माण झालेले असताना भारतात या विषाणुने प्रवेश केला आहे. देशात या विषाणुचे पाच रुग्ण आढळले असून यात कर्नाटक व तमिळनाडूतील प्रत्येकी दोन तर गुजरातेतील एका रुग्णाचा समावेश आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने या रुग्णांची पुष्टी केली असून नियमित तपासणीदरम्यान या विषाणुंचे निदान झाले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. विशेष म्हणजे यातील एकाही रुग्णाने आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
यावरुन भारतासह जगभरात एचएमपीव्ही पसरण्यास सुरुवात झाली असून विविध देशांत श्वसनाच्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या या विषाणुचे रुग्ण आढळत आहेत, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. कर्नाटकात ब्रोंकोन्यूमोनिया असलेल्या आठ महिन्यांच्या अर्भकाची या विषाणुची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याची प्रकृती आता सुधारत आहे. त्याचप्रमाणे, ब्रोंकोन्यूमोनिया असलेल्या तीन महिन्यांच्या दुसऱ्या अर्भकाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने या अर्भकालाही एचएमपीव्हीचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. तमिळनाडूतही दोन अर्भकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
गुजरातेत खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या दोन महिन्यांच्या अर्भकालाही एचएमपीव्हीची लागण झाली आहे.श्वसनाच्या संसर्गामुळे राजस्थानातील दुंगारपूरमध्ये राहणाऱ्या या अर्भकाला २४ डिसेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची एचएमपीव्हीची चाचणी पॉझिटिव्ह आली, अशी माहिती अहमदाबाद महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी भाविन सोळंकी यांनी दिली. त्याच्यावर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयाने याबाबतची माहिती उशिरा दिली. या अर्भकाला विलगीकरणात ठेवले आहे, असेही त्यांनी सांगितले.
असामान्य वाढ नाही!
भारतीय भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा डेटा आणि एकीकृत रोग देखरेख कार्यक्रमाच्या डेटाच्या आधारे देशात इन्फ्लुएंझासारख्या किंवा श्वसनाच्या गंभीर आजाराच्या रुग्णांमध्ये असामान्य वाढ झालेली नाही, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सर्व उपलब्ध स्रोतांच्या माध्यमातून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे, अशीही माहिती देण्यात आली. एचएमपीव्हीच्या चीनमधील उद्रेकाबाबत जागतिक आरोग्य संघटनाही वेळोवेळी माहिती देत आहे. नुकत्याच केलेल्या रंगीत तालमीमधून भारत संभाव्य परिस्थिती हाताळण्यास सज्ज असल्याचे दिसले, असेही मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
यंत्रणा सज्ज
चीन आणि मलेशियामध्ये फैलावलेल्या एचएमपीव्ही विषाणूंच्या संभाव्य संसर्गावर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) वर्षभर नजर ठेवणार असून त्याचा प्रसार रोखण्यासाठी देश सज्ज आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशभरात श्वसनाशी संबंधित आजारांवर देखरेख करीत असलेल्या ‘आयसीएमआर’ने कर्नाटकात ब्रोंको न्यूमोनियाचा आजार झालेल्या एचएमपीव्हीची दोन प्रकरणे शोधून काढली आहेत.
त्यापैकी तीन महिन्यांची मुलगी उपचारांनंतर बरी होऊन घरी परतली आहे, तर आठ महिन्यांच्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्यापैकी कोणाचाही परदेश प्रवास झालेला नाही किंवा परदेशातून आलेल्या प्रवाशांशी संबंध आला नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच देशभरात केलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे.
श्वसनसंबंधातील आजारांमध्ये होणाऱ्या कोणत्याही संभाव्य प्रसारावर मात करण्यासाठी भारत उत्तम प्रकारे सज्ज असून गरज पडेल तेव्हा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात तत्काळ हस्तक्षेप केला जाईल. असे मंत्रालयाने म्हटले आहे.
एचएमपीव्हीशी संबंधित श्वसनाचे आजार भारतासह जगभरात आधीच निदर्शनास आले आहेत. आयसीएमआर आणि एकिकृत आजार देखरेख कार्यक्रमाने (आयडीएसपी) गोळा केलेल्या माहितीनुसार इन्फ्ल्युएंझासारखे आजार किंवा गंभीर श्वसनाच्या आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली नाही. आयसीएमआर संपूर्ण वर्षभर एचएमपीव्हीच्या संभाव्य संसर्गावर नजर ठेवणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
घाबरण्याची गरज नाही
HMPV व्हायरसच्या धोक्याबाबत माहिती देताना अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. राकेश जोशी सांगतात की, "सध्याची परिस्थिती पाहता आणि या व्हायरसबाबत सुरु असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर खरंतर घाबरण्याची गरज नाही. पण निश्चितच आपल्याला लक्ष ठेवावं लागेल, हा व्हायरस नवीन नाही अनेक वर्षांपासून तो अस्तित्वात आहे.
विशेषतः आत्ताच्या हिवाळात्यातल्या थंडीच्या दिवसात या व्हायरसच्या संसर्गाच्या केसेस पाहायला मिळतात. या व्हायरससाठी कुठलीही लस आपल्याकडं उपलब्ध नाही किंवा कुठंलही औषध नाही. पण जशी रुग्णांमध्ये लक्षण दिसतील त्यानुसार रुग्णांवर उपचार केले जातात. जर आपण व्यवस्थित सगळ्या प्रतिबंधात्मक गोष्टींचं आपण पालन केलं तर सात-आठ दिवसांत रुग्ण बरा होतो.
या लोकांनी काळजी घ्यावी
पण या व्हायरल संसर्गाचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त होऊ शकतं ज्यांच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी आहे. ज्या लोकांची स्वतःची शक्ती कमी असते जसं की, लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती. तसंच जे लोक कॅन्सरच्या आजारानं पीडित आहेत. त्याचबरोबर जे लोक अशी औषधं घेतात ज्यामुळं त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळं अशा प्रकारचे व्हायरल संसर्ग होत असतात.
बचाव कसा कराल?
त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगतो की, तुम्हाला जर सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही बाहेर जाऊ नका. स्वतः ला आयसोलेट करुन घ्या, म्हणजे इतरांच्या संपर्कात येणार नाही अशा बंद खोलीत राहा. तसंच जर तुम्हाला अशा ठिकाणी जायचं आहे जिथं खूप लोक एकत्र येणार आहेत. त्यामुळं जर आपल्याला खोकला किंवा शिंका येत असतील तर आपलं तोंड मास्कनं झाकून घ्या. यामुळं हा व्हायरस इतरांपर्यंत पसरण्यापासून तुम्ही रोखू शकता. एकूणच जर आपण सतर्कता ठेवली तर या व्हायरसचा संसर्ग पसरण्यापासून, स्वतःला होण्यापासून आपण बचाव करु शकतो.
सरकारच्या नियमांचं पालन करा
पुन्हा एकदा सांगतो की खरंच घाबरण्याची काहीही गरज नाही. पण जर भारतात सध्या एक रुग्ण या व्हायरसचा संसर्गबाधित आढळलेला असल्यानं सरकार याबाबत ज्या पद्धतीचे दिशानिर्देश देईल त्याचा जर आपण योग्य प्रकारे पालन केलं तर घाबरण्याचं काहीच कारण नाही.