चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोचा प्रादुर्भाव बघायला मिळतो आहे. अशातच भारतातही याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. बंगळुरूमध्ये आठ महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्ही विषाणूची लागण झाली आहे. या चिमुकलीची प्रकृती सध्या बरी असल्याची माहिती आहे.
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, एका खासगी रुग्णलयाने केलेल्या चाचणीत या चिमुकलीला ह्यूमन मेटान्यूमोची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र, सरकारद्वारे अद्याप कोणतीही चाचणी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात बोलताना, खासगी रुग्णालयाच्या अहवालावर शंका उपस्थित करण्याचं कोणतंही कारण नाही, अशी प्रतिक्रिया आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक सरकारने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात विषाणूचा प्रसार रोखण्यासंदर्भात कोणती काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागाच्या अधिक्षक डॉ. वंदना बग्गा यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेतली.
काय आहेत एचएमपीव्हीची लक्षणे?
फ्लू, खोकला, ताप, नाक बंद होणे आणि श्वास घ्यायला त्रास होणे, ही एचएमपीव्हीचं सामान्य लक्षणे आहेत. तसेच गंभीर स्थितीमध्ये या विषाणूमुळे ब्राँकायटिस किंवा न्यूमोनियासारखे आजार उद्भवण्याची शक्यता आहे. संसर्गानंतर तीन ते सहा दिवसांनी याची लक्षणे आढळून येत आहेत.
या विषाणूमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण भारताच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने दिले आहे. हा विषाणू इतर श्वसन संसर्गजन्य विषाणूसारखाच आहे. यात सर्दी होते. यात लहान मुलांमध्ये तापासारखी लक्षणे दिसतात, मात्र योग्य काळजी घेतल्यास सध्याच्या परिस्थितीत घाबरण्याची काहीच गरज नसल्याचे ते म्हणाले.
पुणे आरोग्यसेवा सेवाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, "चीनमधून आलेल्या नवीन विषाणूबाबत चिंतेचे कारण नाही. आरोग्य विभागाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून, नाहक भीती बाळगण्याची गरज नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करावे. सर्दी-खोकला रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करून आरोग्य विभागाला अहवाल सादर करावा."
HMPV नवा व्हायरस नाही
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, HMPV हा नवीन व्हायरस नसल्याचं सांगितलं आहे. हा व्हायरस पहिल्यांदा २००१ मध्ये आढळून आला होता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही सेरोलॉजिकल पुराव्यांवरून असं दिसून आलं आहे की, हा व्हायरस १९५८ पासून आहे.
हे करा
खोकला किंवा शिंक येत असल्यास तोंड व नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका
साबण, पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार स्वच्छ करा
ताप, खोकला आणि शिंक येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा
संक्रमण कमी करण्यासाठी पुरेशी हवा खेळती राहील याची दक्षता घ्या
हे करू नका
हस्तांदोलन, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर तसेच आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श टाळा
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे टाळा