देशात मंकीपाॅक्सचा पहिला रुग्ण सापडल्याने आरोग्य विभाग अलर्टवर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 Months ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

देशात 'मंकीपॉक्स'चा पहिला संशयित रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत. या विषाणूची लागण झालेल्या पहिल्या संशयित रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. मंकीपॉक्सचे संशयित रुग्ण तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. परदेशातून आलेल्या एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली होती. संबंधित व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांचाही शोध घेण्यात आला आहे.

'मंकीपॉक्स'च्या संशयित रुग्णांची चाचणी घेण्यासाठी केंद्राने राज्यांना प्रयोगशाळांची सूची पाठविली आहे. 'क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल' तसेच संक्रमण रोखण्यासाठी करायच्या आवश्यक बाबींचा ऊहापोह या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये करण्यात आला आहे. राज्य आणि जिल्हास्तरावरील आरोग्य सुविधा तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या तयारीचा आढावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावा, मंकीपॉक्सच्या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण तसेच संशयितांची देखभाल करण्यासाठी रुग्णालयांमध्ये विलगीकरणाची व्यवस्था करावी, पुरेशा संख्येने कर्मचारी नियुक्त करावेत, संपर्कात आलेल्या लोकांच्या शोधासाठी राज्यांच्या आरोग्य खात्यांनी 'आयडीएसपी' (इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलान्स प्रोग्रॅम) योजनेअंतर्गत आपले युनिट मजबूत करावेत, असे निर्देशही केंद्राकडून देण्यात आले आहेत.

डॉक्टरांवर हवे विशेष लक्ष
'आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले कर्मचारी, विशेषतः त्वचा आणि एसटीडी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष दिले जावे, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेमार्फत निश्चित करण्यात आलेल्या मध्यस्थता केंद्रावर सर्व संशयित रुग्णांची स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करण्याची व्यवस्था करावी,'असेही या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. मंकीपॉक्सची लोकांना माहिती दिली जावी त्याचा प्रसार होण्याच्या पद्धती, डॉक्टरांशी कथी संपर्क साधावा? ती वेळ तसेच या रोगापासून स्वतःचा कसा बचाव करावा ? आदींची माहिती प्रसारित करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत.
 
केंद्र सरकारच्या सूचना 
  • स्थानिक अधिकाऱ्यांनी तयारीचा आढावा घ्यावा
  • संबंधित रुग्णालयामध्ये पुरेसे कर्मचारी नेमावेत
  • 'आयडीएसपी' अंतर्गत युनिट मजबूत केले जावे
  • संशयित रुग्णांचे तातडीने विलगीकरण करावे
  • एचआयव्हीची बाधा झालेल्या रुग्णांवर लक्ष ठेवावे

    'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

    Awaz Marathi WhatsApp Group 
    Awaz Marathi Facebook Page

    Awaz Marathi Twitter