मुंबईत कॉक्ससॅकी हा संसर्गजन्य आजार वेगाने पसरत आहे. या विषाणूमुळे चिकनपॉक्सप्रमाणे हात, पाय आणि तोंडावर पुरळ उमटत असल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
साधारणपणे लहान मुलांना होणाऱ्या कॉक्ससॅकी व्हायरसमध्ये अनेकवेळा बाधित मुलांना चिकनपॉक्ससारखी लक्षणे दिसून येतात, मात्र प्रत्यक्षात हा विषाणू लहान मुलांना अधिक प्रभावित करतो. आजारादरम्यान ताप, घसा खवखवणे आणि हात, पायासह तोंडावर लहान फोड किंवा पुरळ येतात. हे फोड वेदनादायक अल्सरमध्ये बदलत असल्याने मुलांना खाण्यापिण्यातही त्रास होतो, तसेच खोकला, शिंकणे किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा आजार पसरत असल्याने गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत लहान मुले आणि वृद्धांना लागण होत आहे. खासगी रुग्णालयात दररोज तीन ते चार रुग्ण आढळून येत आहेत, मात्र पालिकेच्या रुग्णालयांत एकही रुग्णांची नोंद झाली नसल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
आजाराची प्रमुख लक्षणे
व्हायरसची लक्षणे दिसण्यासाठी सुमारे ३६ दिवस लागतात. बऱ्याचदा विषाणूमुळे रुग्णाला पुरळ आणि ताप येतो. चिकनपॉक्समध्ये रुग्णाच्या छाती, पाठीवर फोड येतात, तसेच अतिसार आणि पोटात अस्वस्थता ही लक्षणे आढळतात, तर कॉक्ससॅकीमुळे बोटे, तळवे, गुडघे, नितंब, हात आणि शरीराच्या सांध्यामध्ये फोड येतात. पीसीआर चाचणीनंतर आजाराचे निदान होते. बर्फ किंवा सिरपने अस्वस्थता कमी करू शकते, तसेच नियमित हात स्वच्छ केल्याने संसर्ग टाळता येतो.
बालरोगतज्ज्ञ डॉ. बी. श्रीकांत म्हणाले, "सहा वर्षांखालील मुलांपुरता पूर्वी हा आजार मर्यादित होता, पण आजकाल ६ ते १२ वयोगटातील मुलांनाही याचा फटका बसतो. संक्रमित मुलांमुळे हा आजार इतरांना होऊ शकतो. अशा परिस्थितीत पालकांनी बाधित मुलाला किमान आठवडाभर तरी शाळेत पाठवू नये."