कोरोनाच्या JN.1 व्हेरियंटवर लवकरच लस?

Story by  आवाज़ मराठी | Published by  sameer shaikh • 1 Years ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

भारतात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच JN.1 या नव्या व्हेरियंटचे रुग्ण सापडत आहेत. यावर सध्या लस उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य यंत्रनेची डोकेदुखी वाढली होती. मात्र कोरोना महामारीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुन्हा एकदा मदतीला धावून आले आहे. भारत सरकारने परवाना दिल्यानंतर JN.1 नव्या व्हेरियंटवरील लस लवकरच रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी भारत सरकारकडे अर्ज केल्याचं म्हटलं आहे, मनीकंट्रोलने आपल्या अहवालात यासंदर्भात माहिती दिली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट सध्या कोविड -19 च्या XBB1 च्या प्रकारावर लस उपलब्ध करून देते. XBB1 आणि JN.1 या नव्या व्हेरियंटमध्ये फारसा फरक नाही. या व्हेरियंटवर ही लस प्रभावी ठरू शकते. तसेच येत्या महिनाभरात JN.1 वरील लस रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी भारत सरकारकडे अर्ज केला आहे, अशी माहिती सीरमच्या प्रवक्त्याने दिली आहे.

अदर पूनावाला याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लस तयार केली होती. ही लस कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान मोठ्या प्रमाणात वापरली गेली होती. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाने ही लस विकसीत केली होती. JN.1 चा व्हेरियंट सापडल्यानंतर पुन्हा एकदा सीरम इन्स्टिट्यूट वैद्यकीय क्षेत्रासाठी धावून आले आहे. शुक्रवारी देशात ६४० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या २९९७ वर पोहोचली आहे. ज्यात JN.1 च्या रुग्णांची संख्या अधिक असून सध्या यावर लस उपलब्ध नाही.

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून मृतांची संख्या ५,३३,३२८ वर पोहोचली आहे. केरमध्ये शुक्रवारी ८ पर्यंत आणखी एका मृत्यूची नोंद झाली आहे. सध्याचा मृत्यदर १.१९ टक्के असून आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. भारतात कोविड-१९ लसीचे २२०.६७ कोटी डोस देण्यात आले आहेत. दरम्यान भारत सरकार आणि तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा आणि स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला आहे. सतेच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याच्या सूचना केल्या आहेत.