देशात मंकीपॉक्स आजाराचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलंय. मंकीपॉक्सची जगभरातील वाढती रूग्णसंख्या पाहता केंद्र सरकारने पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेसह देशातील सर्व बंदरे, विमानतळांवर अलर्ट जारी केलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मंकीपॉक्सची जगभरातील वाढती रूग्णसंख्या
आरोग्य मंत्रालयाने दिल्लीतील राम मनोहर लोहिया, सफदरजंग आणि लेडी हार्डिंज या तीन मोठ्या केंद्रीय रुग्णालयांमध्ये नोडल सेंटर तयार केलंय. मंकीपॉक्स रुग्णांवर उपचार आणि काळजी घेण्यासाठी या रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेत. केंद्राने सर्व राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातील रुग्णालयांमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांसाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेत.
केंद्र सरकार अलर्ट मोडवर
भारतात अद्याप मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही, पण खबरदारी म्हणून केंद्र सरकारने सर्व तयारी केलीय. आफ्रिकेतून उद्भवलेला धोकादायक एमपॉक्स विषाणू आपल्या शेजारील पाकिस्तानामध्ये पोहोचला आहे. अशा परिस्थितीत जागतिक स्तरावर एमपीओएक्सची सद्यस्थिती लक्षात घेता भारत सरकार सतर्कतेच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बांगलादेश आणि पाकिस्तान विमानतळ, बंदरे आणि सीमेवरील अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर रूग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यास रूग्णालयांना सांगण्यात आलंय.
रूग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड
जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स आफ्रिकेच्या अनेक भागांमध्ये पसरल्यामुळे आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलीय. या आजारावर त्वरीत उपचार करण्यासाठी चाचणी प्रयोगशाळा तयार असल्याची खात्री करण्याचे आदेश आरोग्य मंत्रालयाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. सध्या देशातील ३२ प्रयोगशाळा मंकीपॉक्सची चाचणीसाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत.यावेळी विषाणू अधिक विषारी आणि संसर्गजन्य असल्याची माहिती मिळतेय.