कर्करोग रुग्णालयाला जागा द्यावी, यासाठी आयुक्त रवींद्र जाधव यांना निवेदन देताना खासदार डॉ. शोभा बच्छाव, दिनेश बच्छाव, शेजारी हाजी युसूफ नॅशनलवाले
शहरात महिला, लहान मुले व सर्व सामान्यांसाठी विविध रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा आहे. येथे कर्करोगाचे रूग्णालय नसल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी नाशिक, मुंबई आदी ठिकाणी जावे लागते.
खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रयत्नातून शहरात दोनशे खाटांचे रूग्णालय मंजूर झाले आहे. या रुग्णालयासाठी तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी तसेच रूग्णालयाच्या खर्चाचे बजेट सादर करावे यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचित केले आहे. यासंदर्भात खासदार डॉ. बच्छाव यांनी आयुक्त रवींद्र जाधव यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे.
मालेगावात मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक रुग्णांना कर्करोगावरील उपचाराचा खर्च परवडत नाही. अनेक रुग्णांना वेळेवर व पुरेसा उपचार मिळत नाही. यातून अनेकांना उपचाराअभावी जीव गमवावा लागतो. शहरात महिला व बाल रुग्णालय, सामान्य रुग्णालय, वाडिया, अली अकबर, हारून अन्सारी रुग्णालय, कॅम्प रूग्णालय आहे.
वाडिया, अली अकबर, द्याने येथे रुग्णालयाच्या नवीन इमारतींचे काम सुरु आहे. शहरात आता कर्करोग रुग्णालयाची भर पडणार आहे. कर्करोग रुग्णालय झाल्यास त्याचा शहर व परिसरातील रुग्णांना फायदा होईल. रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी डॉ. दिनेश बच्छाव, हाजी युसूफ नॅशनलवाले आदी उपस्थित होते.