राज्यात बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. उरण, लातूर पाठोपाठ आता नांदेडमध्ये बर्ल्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. रायगडमधील उरणमध्ये हजारो कोंबड्या दगावल्याची घटना ताजी असताना आता लातूरमध्येही जवळपास ४००० कोंबड्याचा मृत्यू झाला आहे. या कोंबड्यांचे सॅम्पल पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत.
मुंबई परिसरातही बर्ड फ्लूची दहशत पसरली आहे. ठाण्यातही जवळपास २१ कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली असून या परिसरात रहाणाऱ्या १७५ जणांची आरोग्य तपासणीही करण्यात आली आहे. बर्ड फ्लूचं संक्रमण आटोक्यात येईपर्यंत ज्याठिकाणी पादुर्भाव झाला आहे. त्याठिकाणी कोंबड्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदीही घालण्यात आली असून चिकनची दुकानंही बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
काय आहे बर्ड फ्लू
हा इन्फ्लूएंझा विषाणू सध्या मोठ्या चिंतेचे कारण ठरत आहे. २०२ मध्ये यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, असे आरोग्य संस्थांकडून सांगितले जात आहे. हा इन्फ्लूएंझा ए उपप्रकार H5N1 आहे, ज्याला बर्ड फ्लू म्हणूनही संबोधले जाते. हा विषाणू कुक्कुटपालनासारख्या जंगली आणि पाळीव पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरतो. हा विषाणू प्रामुख्याने संक्रमित पक्ष्यांच्या लाळ, नाकातील स्राव किंवा घाणीच्या संपर्कातून पसरतो.
पुण्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत वाढ
महाराष्ट्रात बर्ड फ्लूने थैमान घातलेले असताना पुणे शहरात राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची संख्या १११ वर पोहोचली आहे. राज्यात सर्वाधिक १०३ रुग्ण पुण्यात असून, १३ जण व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्णसंख्येत वाढ सुरूच असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने बाधित भागात रुग्ण सर्वेक्षण करण्यावर भर दिला आहे.
पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून बाधित भागांमध्ये तातडीने रुग्ण सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. जीबीएसची लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांचा शोध आरोग्य विभागाची पथके घेत आहेत. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून ४५ हजार ५२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. महापालिका आणि आरोग्य विभागाने यासाठी ८६ पथके तैनात केली आहेत. याचबरोबर खासगी डॉक्टरांनी जीबीएसचे रुग्ण आढळल्यास तातडीने आरोग्य विभागाला कळविण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.