महाराष्ट्रातील लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी एम्स नागपूरने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. एम्स नागपूरच्या वायरोलॉजी संशोधन व निदान प्रयोगशाळेला अधिकृतपणे मंकीपॉक्स चाचणी प्रयोगशाला म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या मान्यतेनुसार, एम्स नागपूर आता महाराष्ट्रातील मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांची चाचणी करण्यासाठी अधिकृत केंद्र म्हणून कार्य करणार आहे.एम्सच्या व्हायरल रिसर्च डायग्नोसिस लॅबोरेटरीने या संदर्भात मोठे पाऊल उचलत, महाराष्ट्रातील नागरिकांना जलद आणि अचूक चाचणी सेवा प्रदान करण्यास मंगळवारपासून सुरुवात केली.
या चाचणीमुळे आजारावर नियंत्रण
एम्सचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत जोशी यांनी सांगितले की, चाचणी सुविधेमुळे आजाराच्या प्रसारावर जलद नियंत्रण मिळवणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे शक्य होईल. देशभरातील मंकीपॉक्सच्या संशयित प्रकरणांची चाचणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या ३५ प्रयोगशाळांपैकी नागपूर एम्स ही एक आहे.
ही नवीन सुविधा नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात मंकीपॉक्सच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे नागरिकांना वेळेवर निदान व उपचार मिळण्यास मदत होईल. प्रयोगशाळा मंकीपॉक्स चाचणीसाठी आवश्यक किट आणि अभिकर्मकांनी सुसज्ज आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे आणि सध्या मंकीपॉक्सचे संशयित नमुने स्वीकारत आहेत अशी माहिती डॉ. मीना मिश्रा यांनी दिली.