सतत येणाऱ्या स्पॅम कॉल्सना असा बसणार आळा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आपण भरपूर ठिकाणी आपला मोबाईल नंबर देत असतो. शॉपिंग करताना, फूड ऑर्डर करताना किंवा अन्य ठिकाणी. यामुळे बऱ्याच कंपन्यांकडे आपला नंबर असतो. यामुळे दिवसभर सातत्याने कंपन्यांचे कॉल्स आणि मेसेजेस येत राहतात. मात्र आता TRAI ने याबाबत एक नवीन नियम लागू केला आहे. यामुळे सतत येणाऱ्या स्पॅम कॉल्सना आळा बसणार आहे.

ट्रायने यावर्षीच्या जून महिन्यातच टेलिकॉम कंपन्यांना DCA (डिजिटल कन्सेंट अक्विझिशन) नियमावर काम सुरू करण्याची सूचना दिली होती. या नियमा अंतर्गत एखाद्या यूजरला व्यावसायिक मेसेज किंवा कॉल करायचा असल्यास, कंपनीला त्या यूजरची कन्सेंट, म्हणजेच संमती घेणं गरजेचं आहे. म्हणजेच, तुमच्या परवानगीशिवाय कंपन्या तुम्हाला मेसेज किंवा कॉल्स करू शकणार नाहीत.

आतापर्यंत प्रिन्सिपल एंटीटीज (PEs) किंवा मेसेज पाठवणाऱ्या कंपन्यांना सर्व कन्सेंट मेंटेन ठेवण्याची किंवा मेसेज पाठवण्याची संमती होती. यामुळे टेलिकॉम कंपन्या हे तपासू शकत नव्हत्या की ग्राहकांनी संमती दिली आहे की नाही. तसेच, एन्ड यूजरची संमती घेण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही सिस्टीम देखील उपलब्ध नव्हती. आता यासाठी एक एसएमएस फॅसिलिटी डेव्हलप करण्यात आली आहे. 

अशा प्रकारे घेणार संमती
प्रिन्सिपल एंटीटीज आता ग्राहकांना एक कोड असलेला मेसेज पाठवतील. यामध्ये या मेसेजचा उद्देश्य, संमतीची व्याख्या, प्रमुख ब्रँडचे नाव किंवा मेसेज पाठवणाऱ्या कंपनीचे नाव इत्यादी गोष्टींचा उल्लेख करण्यात येईल. हा मेसेज वाचून यूजर्स निर्णय घेऊ शकतील, की त्यांना या कंपनीचे मेजेस किंवा कॉल्स हवे आहेत की नाहीत. याला Yes किंवा No असा रिप्लाय देऊन ग्राहक आपली सहमती किंवा असहमती नोंदवू शकतील.

या मेसेजमध्ये केवळ व्हाईट लिस्टेड यूआरएल, APK, ओटीटी लिंक, कॉल बॅक नंबर अशा गोष्टींचा उल्लेख असेल. हा नियम लागू झाल्यामुळे यापूर्वीच्या सर्व संमती रद्द होतील, आणि यूजर्सची पुन्हा एकदा परवानगी घ्यावी लागेल.

काय होणार फायदा?
  • या नियमामुळे ग्राहकांना येणारे त्रासदायक कॉल्स कमी होतील.
  • या नियमामुळे केवळ व्हेरिफाईड कंपन्याच ग्राहकांना ऑफर्स सांगणारे कॉल्स करु शकतील.
  • यामुळे फेक कॉल्समुळे होणाऱ्या स्कॅमला देखील आळा बसणार आहे.