सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताची वाटचाल आश्वासक - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

"सेमीकंडक्टर डिजिटल युगाचा आधार असून, या क्षेत्रात आपले जागतिक दायित्व ओळखून भारताने वाटचाल सुरू केली आहे," असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज संमेलनात केले.

"येणारा काळ तंत्रज्ञानावर आधारित असेल. लोकशाही आणि तंत्रज्ञान मिळूनच मानवतेचे कल्याण सुनिश्चित केले जाऊ शकते," असे नमूद करून मोदी यांनी सेमीकंडक्टरच्या विविध पूर्तता शृंखलेमध्ये विश्वासार्ह भागीदार होण्याची क्षमता भारतात असल्याची ग्वाही दिली. सेमीकंडक्टर उद्योग हा लवकरच आमच्या मूलभूत आवश्यकतांचा आधार होईल असेही ते म्हणाले. देशात उद्योगासाठी असलेल्या पोषक वातावरणाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. "गुंतवणुकीसाठी भारत योग्य स्थान आहे याविषयी उद्योग जगतात सहमती आहे. भारतात आज दिसत असलेल्या अपूर्व संधी यापूर्वी कधीही पाहायला मिळाल्या नाहीत," असे कौतुकोद्‌गार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले.
 
या बैठकीत सेमीकंडक्टर उपकरणे आणि सामग्री इंटरनॅशनल, मायक्रॉन, नेक्स्ट एक्स्पिरिअन्स, पॉवरचीप सेमीकंडक्टर, आयएमईसी, रेनेसा, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, टोकियो इलेक्ट्रॉन, टॉवर, सिनॉप्सिस, कॅडेंस, रॅपिडस्, जॅकब्स, जेएसआर, इनफिनॉन, एडवॉटेस्ट, टेरॉईड अप्लाईड मटेरियल्स, लॅम रिसर्च, मर्क, सीजी पॉवर, कायन्स टेक्नॉलॉजीसह विविध संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रमुख आणि प्रतिनिधींनी भाग घेतला. या बैठकीस स्टॅनफोर्ड विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन दिएगो तसेच आयआयटी भुवनेश्वरचे प्राध्यापकही उपस्थित होते.