ड्रोनच्या पंखामध्ये सौरशक्ती

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
drone
drone

 

बंगळूर: ड्रोन स्टार्टअप गरुडा एरोस्पेस’ने बुधवारी ‘एरो इंडिया-२०२३’ या विशेष शोमध्ये सौर ऊर्जेवरील ‘सुरज’ या ड्रोनचे सादरीकरण केले. ‘डीआरडीओ’चे माजी प्रमुख आणि संरक्षणमंत्र्यांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. सतीश रेड्डी यांनी त्याचे अनावरण केले. ‘सुरज’ हे ड्रोन आयएसआर (बुद्धिमत्ता, देखरेख आणि टेहळणी) या प्रणालीवर काम करते. उंचावर उड्डाण करणारे हे ड्रोन साधारणपणे शत्रू प्रदेशाची टेहळणी करण्यासाठीच वापरण्यात येते. या ड्रोनच्या माध्यमातून लष्कराच्या मुख्य कमांडला रिअल टाइम माहिती पुरविण्यात येते. त्यामुळे मैदानावर लढणाऱ्या आपल्या जवानांचा बचाव करता येऊ शकतो. या ड्रोनची अनोखी क्षमता पाहून संशोधक आणि प्रक्षेकही भारावून गेले होते.
 
पंखामध्ये सेल
या ड्रोनचे पंख ‘जे’ आकाराचे असून त्यामध्ये सौरऊर्जेवर चार्ज होणारे सेल असतात, या माध्यमातून त्या ड्रोनला इंधन पुरवठा होतो. एक जादा बॅटरी देखील त्यामध्ये बसविलेली असून यामुळे अतिरिक्त इंधन पुरवठा तर होतोच पण त्याचबरोबर गरजेनुसार या ड्रोनचा वेग देखील कमी जास्त करता येतो.
 
उच्च दर्जाचा कॅमेरा
हे ड्रोन दहा किलोग्रॅमपर्यंतची सामग्री वाहून नेऊ शकते. त्यामध्ये थर्मल इमेजरीसह हाय रिझॉल्यूशनचा कॅमेरा, फॉलीएज पेनेट्रेटिंग लिडार सेन्सरचा समावेश आहे. यामुळे रिअल टाइम फोटो आणि व्हिडिओ मुख्य यंत्रणेला मिळू शकतात. त्याचा लष्कराच्या मुख्यालयास पुढील रणनीती आखण्यासाठी वापर करता येऊ शकतो.
 
सर्वांनाच उपयोग
हे ड्रोन ३००० फुटांवरच्या उंचीवर सलग बारा तास उड्डाण करू शकते. लष्कर, नौदल, हवाई दल, सीमा सुरक्षा दल, ‘सीआरपीएफ’, ‘सीआयएसएफ’, ‘आयटीबीपी’, ‘डीआरडीओ’, ‘एमओडी’ आणि गृहमंत्रालय या ड्रोनचा वापर करू शकते. गरुडा एअरोस्पेसने ड्रोन क्षेत्रात २२ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे.
 
या संदर्भात गरुडा एरोस्पेस चे संस्थापक- सीईओ, अग्नीश्वर जयप्रकाश  यांनी याविषयी माहिती देत असताना, यंदाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत या ड्रोनचा १ः१ अन्य एक उपप्रकार तयार झालेला असेल. या ड्रोनच्या निर्मितीमध्ये एनएएल, डीआरडीओ आणि अन्य महत्त्वाच्या संरक्षण संस्थांची मदत घेण्यात आली आहे, असे सांगितले.