सदाबहार अभिनेत्री झीनत अमान यांनी आपल्या बोल्ड आणि दमदार भूमिकांमुळे चित्रपटसृष्टीत अढळ स्थान मिळवले. 'सत्यम शिवम सुंदरम', 'हरे रामा हरे कृष्णा' आणि 'डॉन' सारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले. आपल्या काळातल्या वेतन विषमतेविषयी त्या नेहमीच स्पष्ट मत मांडत आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या 'द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया वूमन इन एंटरटेन्मेंट अवॉर्ड्स' मध्ये त्यांना 'आयकॉनिक आर्टिस्ट' पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सन्मान अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर झीनत अमान यांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, "मी पन्नास वर्षांपूर्वी सेटवर एकटीच महिला असायचे, मात्र आता प्रत्येक क्षेत्रात महिलांनी स्वतःची जागा निर्माण केली आहे, हे पाहून अभिमान वाटतो." त्यांनी समान वेतनासाठी महिलांनी ठामपणे आवाज उठवण्याचे आवाहन केले. चित्रपटसृष्टीत अनेक दशकं कार्यरत राहूनही समान वेतनाचा प्रश्न आजही कायम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कामाच्या आघाडीवर झीनत अमान लवकरच 'नेटफ्लिक्स'वरील 'द रॉयल्स' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत, याशिवाय त्या फराझ आरिफ अन्सारी दिग्दर्शित 'बन टिक्की' चित्रपटातही झळकणार आहेत, ज्यामध्ये शबाना आझमी आणि अभय देओल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. झीनत अमान यांचा हा ठाम आणि निर्भीड आवाज नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे, यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.