ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 16 h ago
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार

 

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीत एका युगाचा अंत झाला आहे. त्यांच्या देशभक्तीने भरलेल्या चित्रपटांनी आणि ‘भारत कुमार’ या नावाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान मिळवले होते. त्यांच्या जाण्याने देशभरात शोककळा पसरली आहे.

मनोज कुमार यांच्या निधनावर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, आमचे प्रेरणास्थान आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘सिंह’ मनोज कुमार आता आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.” अशोक पंडित यांनी मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. याशिवाय, अनेक कलाकार आणि चाहत्यांनीही सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

मनोज कुमार यांचा जीवनप्रवास
मनोज कुमार यांचे मूळ नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असे होते. त्यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी ब्रिटिश भारतातील अबोटाबाद (आता पाकिस्तान) येथे झाला. भारताच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. फाळणीच्या काळात त्यांनी अनेक दुःखद अनुभव पाहिले, ज्याचा परिणाम त्यांच्या चित्रपटांवरही दिसून आला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. अशोक कुमार, दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांच्या चित्रपटांनी प्रभावित होऊन त्यांनी आपले नाव हरिकिशनवरून मनोज कुमार असे बदलले.

कॉलेजच्या काळात मनोज कुमार अनेक नाटकांमध्ये सहभागी होत. अभिनयाचे धडे गिरवून ते मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. १९५७ मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. पण १९६० मध्ये ‘कांच की गुड़िया’ या चित्रपटाने त्यांना मुख्य अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली. हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला. यानंतर ‘हरियाली और रास्ता’, ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘संन्यासी’ आणि ‘क्रांति’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांना खऱ्या अर्थाने ‘भारत कुमार’ बनवले.

मनोज कुमार यांचे चित्रपट देशभक्तीने ओतप्रोत असायचे. त्यांच्या बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांचे पात्र ‘भारत’ नावाचे असायचे, ज्यामुळे चाहत्यांनी त्यांना ‘भारत कुमार’ हे नाव दिले. १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान जय किसान’ या घोषणेवर आधारित ‘उपकार’ हा चित्रपट त्यांनी बनवला. या चित्रपटातील ‘मेरे देश की धरती’ हे गीत आजही देशभक्तीची भावना जागवते. ‘पूरब और पश्चिम’ मधील ‘भारत की बात सुनाता हूँ’ या गीतानेही प्रेक्षकांच्या मनात देशप्रेमाची भावना रुजवली. त्यांच्या चित्रपटांनी सामाजिक संदेश आणि राष्ट्रीय एकात्मतेचा विचार नेहमीच पुढे आणला.

पुरस्कार आणि सन्मान
मनोज कुमार यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना १९९२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. २०१५ मध्ये त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याशिवाय, त्यांना एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सात फिल्मफेअर पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter