मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानची त्याच्या गॅलेक्सी निवासस्थानी भेट घेतली
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आज (14 एप्रिल) पहाटे गोळीबार झाला. दोन अज्ञात व्यक्तींनी सलमानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेवर विविध नेते मंडळी प्रतिक्रिया देत आहेत.
या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान याच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. सलमानचे वडील ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान हेदेखील यावेळी उपस्थित होते.
या भेटीत मुख्यमंत्र्यांनी सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना सुरक्षिततेची हमी दिली. त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचेही सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल व कठोरात कठोर शिक्षा होईल, असे आश्वासनही दिले असल्याचे समजते.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, "ही दुर्दैवी घटना आहे.पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कायदा हातात घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही."
आम्ही बिश्नोईला संपवू-
सलमानच्या घरी भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे, इथे कुठलीही टोळी नसून पूर्ण ‘अंडरवर्ल्ड’ संपले आहे. आम्ही बिश्नोईला संपवू. पुन्हा कोणीही असा हल्ला करण्याची हिंमत करणार नाही अशी कारवाई करू, असा सज्जड इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
‘‘इथे मुंबई पोलिस आहेत. हा महाराष्ट्र आहे. इथे कुणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही.सलमान खान तर आमचा खूप मोठा अभिनेता आहे. त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आमची आहे. अशी कुणाचीही ‘गँग’ इथे चालणार नाही. ज्यांना पकडले आहे, त्यांचा तपास सुरू आहे. मुळापर्यंत तपास होईल. आरोपींवर कारवाई केली जाईल. नागरिकांची संरक्षण हे आमचे काम असून, आम्ही ते करणार, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचा सलमानला फोन
गोळीबार घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला फोन केला होता. सलमानसोबत झालेल्या संवादाबद्दल देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले, "सलमान खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांना सूचित करण्यात आले आहे. मी सलमान खानशीही बोललो आहे. मी त्यांना सांगितले आहे की सरकार त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी काळजी करण्याची गरज नाही."
पोलीस करायत तपास
पहाटे 5 वाजता मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमध्ये दोन बाईकस्वार दिसत आहेत.या घटनेनंतर पोलीस आणि फॉरेंन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली.
गृह खात्यावर सुप्रिया सुळेंची टीका
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी गृह खात्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, "हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण सलमान खान ज्या भागात राहतो तो भाग खूप प्रसिद्ध आहे. तिथे सकाळी लोक मॉर्निंग वॉकला जातात तसेच भाजीवाले-दुधवाले तिथे येतात, त्यांच्या सुरक्षेचं काय? हे गृह खात्याचे अपयश आहे. सलमानच्या कुटुंबावर दबाव आहे."