बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री तब्बूने नेहमीच तिच्या भूमिकांमधून तिचे वेगळेपण सिद्ध केले आहे. एकाच धाटणीचे चित्रपट न करता वेगवेगळया भूमिका करुन तिनं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. तब्बूला राष्ट्रीय पुरस्कारानं देखील गौरविण्यात आले आहे.मात्र सध्या ती एक वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
तब्बू हिच्यावर एका ऑनलाईन लेखात तिच्या विवाह आणि नातेसंबंधांबद्दल एक वादग्रस्त विधान केल्याचा आरोप लावण्यात आला होता. तथापि, तिच्या व्यवस्थापन टीमने तातडीने हे आरोप फेटाळून लावले असून, संबंधित वेबसाईट्स आणि सोशल मीडिया हँडल्सनी हे खोटे विधान तात्काळ हटवावे आणि माफीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
एका ऑनलाईन पोर्टलने तबू हिने "नो मॅरेज, जस्ट वॉन्ट अ मॅन इन बेड" असे विधान केल्याचा दावा केला होता. मात्र, तब्बूच्या टीमने स्पष्ट केले की, अभिनेत्रीने असे कोणतेही विधान कधीही केलेले नाही.
त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “STOP PRESS! काही वेबसाईट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी तब्बू यांचे चुकीचे आणि असभ्य वक्तव्य प्रसारित केले आहे. आम्ही स्पष्ट करतो की, त्यांनी असे कोणतेही विधान केलेले नाही. हा मोठा नैतिक उल्लंघनाचा प्रकार आहे. आम्ही संबंधित वेबसाईट्सना या खोट्या विधानांची तात्काळ दुरुस्ती करून जाहीर माफी मागण्याची मागणी करतो."
कामाच्या आघाडीवर तब्बू सध्या ‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तब्बू सोबत अक्षय कुमार आणि परेश रावल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तब्बू आणि अक्षय कुमार तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. याआधी त्यांनी ‘हेरा फेरी’मध्ये स्क्रीन शेअर केली होती.
तब्बू नुकतीच हॉलिवूडच्या ‘Dune: Prophecy’ वेब सिरीजमध्ये झळकली होती, ज्यामध्ये तिने सिस्टर फ्रान्सेस्का ही भूमिका साकारली. तसेच, २०२४ मध्ये तब्बूने करीना कपूर खान आणि क्रीती सेनॉनसोबत 'Crew' या चित्रपटात काम केले होते. तब्बू लवकरच अजय देवगणसोबत ‘Auron Mein Kahan Dum Tha’ या प्रेमकथेवर आधारित चित्रपटात झळकणार आहे.
तब्बूच्या व्यवस्थापनाची कडक भूमिका
तब्बूच्या टीमने स्पष्ट केले की, अभिनेत्रीच्या नावाने खोट्या गोष्टी पसरवणे हा गंभीर प्रकार असून, हे वृत्त वाहिन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी तत्काळ दुरुस्त करावे. अन्यथा, कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अभिनेत्री तब्बूवरील हे खोटे आरोप आणि त्यावर तिच्या टीमने घेतलेली ठाम भूमिका यामुळे बॉलिवूडमध्ये या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू आहे.