बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तब्बू, आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या तब्बूने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सध्या तिच्या करिअरशी संबंधित एक मोठा खुलासा समोर आला आहे. चित्रपट निर्माते रवी चोप्रांची पत्नी रेणू चोप्राने एका मुलाखतीत सांगितले, की 'बागबान' चित्रपटासाठी तब्बूला अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका ऑफर केली होती.
स्क्रिप्ट ऐकल्यानंतर तब्बू भावुकही झाली होती, आणि तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यामुळे निर्मात्यांना वाटले, की ती या भूमिकेसाठी होकार देईल; मात्र आश्चर्यकारकपणे तिने चित्रपट नाकारला. यामागचे कारण स्पष्ट करताना तब्बू म्हणाली, "ही कथा खूप सुंदर आहे; पण मला चार मुलांच्या आईची भूमिका करायची नाही. माझे करिअर अजून सुरूच आहे, त्यामुळे मी ही भूमिका स्वीकारू शकत नाही." अखेर ही भूमिका हेमा मालिनी यांनी साकारली आणि 'बागबान' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तब्बू कुटुंबासोबत तो पाहायला गेली.
तेव्हा तिच्या मावशीने आश्चर्याने विचारले, की तिला ही भूमिका ऑफर झाली होती का ? तब्बूने होकार दिल्यावर मावशी रागावली आणि म्हणाली, "तू हा चित्रपट का नाकारलास?" तब्बूचा हा निर्णय तिच्या कुटुंबालाही पटला नव्हता; मात्र आजही ती आपल्या निवडीवर ठाम आहे आणि तिच्या अभिनयाने इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.